तक्रार केल्यास निलंबित करण्याचा आयुक्तांचा इशारा : नगरसेवक स्वच्छता कर्मचाऱयांची हजेरी घेत असल्याची तक्रार
प्रतिनिधी /बेळगाव
शपथविधी होण्यापूर्वीच नगरसेवकांनी आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी महापालिका कारभारात हस्तक्षेप चालविला असल्याची तक्रार महापालिका नोकर संघटनेकडे करण्यात आली होती. मात्र याबाबत लेखी तक्रार देण्यात आली नाही. तक्रार कोणता विभाग देणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळे नगरसेवकांविरोधातील कामगारांची तक्रार हवेत विरली आहे.
महापालिका निवडणूक होऊन वर्ष झाले, पण नगरसेवकांचा शपथविधी झाला नसल्याने नागरिकांच्या तक्रारींचे निवारण कसे करायचे, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. तसेच प्रादेशिक आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन महापौर-उपमहापौर निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली होती. पण शासनाच्या आदेशानंतर महापौर-उपमहापौर निवडणूक घेतली जाणार असल्याने नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी नगरसेवकांच्या सूचनांची दखल घेण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी अधिकारी व कर्मचाऱयांना दिला होता. त्यामुळे महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांची वर्दळ वाढली होती. मात्र अलीकडे नगरसेवकांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप वाढला असून काही नगरसेवक थेट स्वच्छता कर्मचाऱयांची हजेरी घेत असल्याची मौखिक तक्रार महापालिका नोकर संघटनेकडे करण्यात आली होती. तसेच विविध कामे करण्यासाठी दबाव टाकत असल्याची तक्रार करण्यात आली होती. पण याबाबत लेखी तक्रार करण्यात आली नव्हती.
त्यामुळे लेखी तक्रार देण्याची सूचना नोकर संघटनेच्या पदाधिकाऱयांनी केली होती. मात्र लेखी तक्रार करण्यात आली नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पण महापालिका नोकर संघटनेच्या पदाधिकाऱयांची आणि कर्मचाऱयांची बैठक झाल्याबाबतचे वृत्त वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाले. त्यामुळे संतापलेल्या महापालिका आयुक्तांनी नोकर संघटनेच्या पदाधिकाऱयांना बोलावून याबाबत चांगलेच खडसावले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
नगरसेवकांच्या विरोधात चर्चा करण्यासाठी बैठक का घेतली? असा मुद्दा उपस्थित केला. तसेच कोणत्याही प्रकारच्या तक्रारी केल्यास निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा दिला असल्याचे समजते. त्यामुळे नगरसेवक व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात तक्रार कोण करणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. परिणामी कर्मचारी तक्रार करण्यास घाबरत असल्याचे निदर्शनास आले असून महापालिका आयुक्तांच्या इशाऱयामुळे नगरसेवकांच्या विरोधातील तक्रार हवेत विरली असल्याची चर्चा होत आहे.









