नागरिकांचा सवाल : पिरनवाडी नगरपंचायतीचे दुर्लक्ष
वार्ताहर /किणये
रामदेव गल्ली, पिरनवाडी येथील गटारीच्या साफसफाईकडे नगरपंचायतीचे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत. गटारीत केरकचरा साचला आहे. तसेच सांडपाणीही साचले असल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. याचा गल्लीतील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पिरनवाडी येथील रामदेव गल्लीमधील गटारीची साफसफाई गेल्या काही महिन्यापासून करण्यात आली नाही. गटारीत सांडपाणी साचले आहे. तसेच दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. पिरनवाडी ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून चांगली बाब आहे. मात्र या नगरपंचायतीकडून सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडविण्यात येत नाहीत. अशा तक्रारी अधिक प्रमाणात वाढू लागल्या आहेत. रामदेव गल्लीतील गटारीची साफसफाई करण्याची वास्तविक जबाबदारी नगरपंचायत कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची आहे. मात्र याकडे अधिकारीच कानाडोळा करत असतील तर जनतेने कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गटारीच्या ठिकाणी सांडपाणी साचले आहे. या ठिकाणी दुर्गंधी पसरून आजूबाजूच्या नागरिकांना रोगराई होऊ लागली आहे.
गटारींची साफसफाई त्वरित करावी
गटारींची साफसफाई करून घेण्याकडे नगरपंचायत अधिकाऱ्यांना वेळ मिळत नाही का? गटारीची साफसफाई करण्यास इतका विलंब होत असेल तर गावचा विकास कशा पद्धतीने करणार? याची चिंता गावकऱ्यांना आहे. रामदेव गल्लीतील गटारीत सांडपाणी व कचरा अडकला आहे.नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करून या गटारीची साफसफाई त्वरित करावी.
– विठ्ठल मुचंडीकर









