डास मारण्याचेही आहे काम : जिल्हाधिकाऱ्यांनी मागविली निविदा
► प्रतिनिधी / बेळगाव
जेथे धान्य तेथे उंदीर, मात्र आता उंदीरही सरकारी कार्यालयात धुडगूस घालताना दिसू लागले आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क उंदीर व डासांचे निर्मूलन करण्यासाठी निविदा मागितल्याने हा एक चर्चेचा विषय बनला आहे. एरव्ही धान्याच्या गोडावूनमध्ये किंवा शेतकऱ्यांच्या घरामध्ये धान्य खाण्यासाठी धडपडणाऱ्या उंदरांनाही अन्न शोधण्यासाठी सरकारी कार्यालयांचा आधार घ्यावा लागत आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी याबाबत उंदीर पकडणे व डास निर्मूलन करण्यासाठी निविदा काढली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात उंदीर शिरून संगणकाच्या वायरी कुरतडत आहेत. कागदपत्रेदेखील कुरतडून खराब करत आहेत. अनेक महत्त्वाची कागदपत्रे खराब होत असल्यामुळे शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना उंदीर पकडण्यासाठी निविदा काढावी लागली आहे. कार्यालयामध्ये डासांचाही उपद्रव वाढला असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. उंदीर आणि डासांचे निर्मूलन करण्यासाठी अखेर जिल्हा प्रशासनाला निविदा मागवावी लागली आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये डास व इतर कीटक वाढले आहेत. तसेच कार्यालयातील फायली व संगणकांच्या वायरी उंदरांकडून कुरतडल्या जात आहेत. यामुळे अनेकवेळा समस्या निर्माण होत आहे. याचा त्रास कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. कार्यालयातील बहुतांश कामकाज संगणकांवर अवलंबून आहे. त्यामुळे बहुतांश कामकाज संगणकांच्या माध्यमातूनच केले जाते. उंदरांकडून वायरी तोडल्या जात असल्याने वारंवार कामात व्यत्यय निर्माण होऊन वायर जोडणीसाठी अधिकाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. ही नित्याचीच बाब बनल्याने प्रशासनाला उंदीर व डासांचा बंदोबस्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक वर्षांपासून कागदपत्रे साठविण्यात आली आहेत. तसेच सदर इमारत जुनी असून त्यावर नवीन इमारत बांधण्यात आली आहे. असे असले तरी जुन्या इमारतीमध्ये असणाऱ्या उंदरांचा शिरकाव सर्वत्र झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कोणत्याच प्रकारचे धान्य नसले तरी उंदरांचा वाढता उपद्रव अधिकाऱ्यांना डोकेदुखीचा ठरला आहे. यामुळे बंदोबस्तासाठी निविदा मागवाव्या लागल्या आहेत.
उंदीर पकडणे–डास मारण्याच्या कामाबद्दल आश्चर्य
उंदीर व डासांच्या बंदोबस्तासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून एक वर्षाकरिता निविदा मागविण्यात आल्या आहेत. याचा बंदोबस्त करणाऱ्यांना दरपट्टीसह तीन दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील उंदीर कोण पकडणार? हे पहावे लागणार आहे. उंदीर पकडण्याचे व डास मारण्याचेही काम असते, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.









