मिरज / प्रशांत नाईक :
शहराच्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी मिरज शहर वाहतूक शाखेने महत्त्वाच्या चौकातील रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वांवर एकेरी वाहतूक सुरू केली आहे. मात्र, वाहतुक नियमाला बगल देऊन सर्रास वाहनधारक विरोधी दिशेने बाहने चालवित आहेत. एकेरी मार्गावर बहुतांशी रस्ते बेकायदेशीर पार्किंगमध्ये फसले असून, वाहनधारकांनाही रस्ता मिळत नाही. त्यातच नियम धाब्यावर बसवून वाहने चालविणाऱ्या वाहनधारकांची संख्या अगणित आहे. वाहतूक शाखेनेही सुरूवातीचे दोन दिवस नियमाची अंमलबजावणी केली. त्यानंतर दुर्लक्ष केल्याने प्रतिबंधित मार्गावर फलक लावूनही अनेक वाहने नियम मोडत आहेत. प्रयोगिक तत्वावरील नियमाचाच फज्जा उडाल्याने मिरजेच्या वाहतुकीला शिस्त लावणार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.
शहरात गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक, पार्किंग आणि सिग्नल व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. मुळात रस्ते खराब व अरुंद असल्याने वाहतूक खोळंबा नित्याचाच होता. त्यामुळे सिग्नल यंत्रणाही बंद करावी लागली होती. सिग्नलचे साहित्य गंजून गेले तरी वाहतूक व्यवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष नव्हते. काही दिवसांपासून पुन्हा मिरज शहरातील वाहनधारकांना शिस्तीचे धडे शिकवण्याचा प्रयत्न वाहतूक शाखेकडून सुरू आहे. लाखो रुपये खर्चुन सर्वच चौकांमध्ये नव्याने सिग्नल यंत्रणा उभारली जात आहे. तत्पूर्वी वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी लक्ष्मी मार्केट, दत्त चौक, गाडवे चौक, किल्ला भाग, गणेश तलाव, गुरूवार पेठ या प्रमुख चौकांमध्ये एकेरी वाहतूकीचा नियम प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आला आहे. गेल्या आठ दिवसांपासून या नियमाची अंमलबजावणी सुरू असून, वाहनधारकांकडून मात्र त्याला कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.
प्रायोगिक तत्त्वावरील वाहतूक बदलाच्या अंमलबजावणीसाठी वाहतूक शाखेकडून वाहनधारकांमध्ये कोणतीही जनजागृती करण्यात आली नाही. केवळ प्रसार माध्यमांवर जाहीरनामा प्रसिध्द करुन एकेरी वाहतूक सुरू केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सर्वच चौकांवर बॅराकेटींग उभारुन एकेरी वाहतूक सुरू ठेवली. येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांना काही ठिकाणी प्रवेश बंदी करण्यात आली. एकेरी वाहतूक नियम लागू केल्याच्या पहिल्याच दिवशी वाहनधारकांसोबत वाहतूक पोलिसांचे खटके उडाले. दुचाकी वाहनांना एकेरी मार्गावरुन प्रवेश दिला. मात्र, चारचाकी वाहनांना बंदी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे वाहनधारकांना असा वेगवेगळा नियम का? असा सवाल करण्यात आला.
बॅराकेट लावूनही सर्रास वाहनांची बेशिस्त वाहतूक सुरूच होती. त्यामुळे वाहतूक शाखेने ठिकठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करुन वाहनधारकांची अडवणूक सुरू केली. ही कामगिरी केवळ दोन-तीन दिवसांसाठीच होती. त्यानंतर केवळ रस्त्यावर बोर्ड लावून वाहतूक पोलिसही गायब झाले. त्यामुळे वाहने पुन्हा बेशिस्तपणे सुसाट झाली आहेत. अनेक ठिकाणी प्रवेश बंदीचा बोर्ड असूनही चारचाकीसह सर्रास वाहने एकेरी मार्गावरुन घुसवली जात आहेत. परिणामी वाहतुकीचा खोळंबाही होताना दिसत आहे.. ११ ऑगस्टपर्यंत एकेरी वाहतुकीची प्रयोगिक अंमलबजावणी असताना चारच दिवसात नियमाचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे. मिरजकर जनतेला वाहतुकीचे धडे शिकविण्यासाठी वाहतूक शाखेने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. पण बेशिस्त वाहनधारकांकडून नियमाचे वाभाडे काढले जात आहेत. मिरजेच्या वाहतुकीला शिस्त लावणार कोण? असा सवाल आहे.
- बेशिस्त वाहतुकीचा कळस
मैदान दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक, फुलारी कॉर्नर ते मैदान दत्त चौक, महाराणा प्रताप चौक ते किल्ला भागातील न्यायाधीश निवासस्थान, न्यायाधीश निवास्थान मार्गे जवाहर चौक मार्गे किसान चौक अशी एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. दुचाकी, चारचाकी वाहने, रिक्षा व माल वाहतूक वाहने यांना एकेरी वाहतुकीचा जणू नियमच माहित नसल्याचे दिसते. प्रशासनाने लावलेली शिस्त वाहनधारकांना मानवत नाही. शिवाय याच मार्गावर रस्त्यावर वाहनांची बेशिस्त पार्किंग वाहतूक कोंडीत भर घालते. अशावेळी लहान मोठे अपघात होत आहेत. नियम मोडून बेशिस्त वाहतुकीचा कळस गाठणाऱ्या वाहनधारकांवर आता दंडात्मक कारवाईशिवाय पर्याय नाहीत. तसे केले तरच वाहतुकीला शिस्त लागू शकते असे बोलले जात आहे.








