ऑनलाईन टीम / तरुण भारत :
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार स्थिर असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी सरकारच्या हालचाली सुरू झाल्या असून, अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दरम्यान, या मंत्रिमंडळ विस्तारात पुणे जिल्ह्यातून आ. माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, सुनील कांबळे, महेश लांडगे आणि राहुल कुल यांची नावे चर्चेत आहेत.
पुण्यातून पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आ. माधुरी मिसाळ, खडकवासलाचे आ. भीमराव तापकीर आणि कॅन्टोन्मेंटमधील आ. सुनील कांबळे यांची नावे मंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. तर पिंपरीमधून आ. महेश लांडगे आणि जिल्ह्यातून दौंडचे आ. राहुल कुल यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये पुणे आणि पिंपरीसह जिल्ह्यातील आमदार उत्सुक असले तरी मंत्रिमंडळ विस्तारात धक्कातंत्र वापरले जाणार की, आगामी निवडणूक लक्षात घेऊन मंत्रीपद आणि राज्यमंत्रीपद दिले जाणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांपैकी 12 मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदार आहेत. तर उरलेल्या 9 मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार, शिक्षण, संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे वर्चस्व आहेत. त्यामुळे भाजप जिल्ह्यात आपली ताकद वाढविण्यासाठी यातील काही नावांचा मंत्रिमंडळात समावेश करणार आहे.








