इंग्लंड-अमेरिकेत लोकांनी तेरा तारखेचा धसका घेतलेला आहे. त्याला कारण काय ते फारसे माहित नाही. पण तेरा आकडा कमनशिबी, अतिशय खराब व टाकाऊ असा समज जनमानसात असल्याने तेथील भल्याभल्या
हॉटेल्समधूनदेखील ‘13’ ला हद्दपार केलेले आहे. जर 13 वाळीतच टाकला जाणार असेल तर ठेवायचा कशाला असा व्यावहारिक निर्णय केला गेला आहे. तिकडे 13 तारखेला कोणते शुभारंभ होत नाहीत. थोडक्यात काय तर अपशकुनी 13चे बारा वाजवण्यात आले आहेत.
आता कर्नाटकमधील चुरशीच्या निवडणुकीत पुढील महिन्याच्या तेरा तारखेला निकाल असल्याने त्यात हा ‘अशुभ’ आकडा कोणाचे पानिपत करणार आणि कोणाचे कल्याण याबाबत उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. आपल्यावर कोणतीच अशुभ छाया पडू नये म्हणून सत्ताधारी भाजप सगळीच पावले सावधगिरीने उचलत आहे. उमेदवारांची यादी जाहीर करायला त्याने लावलेला वेळ बघून कमनशिबी काँग्रेसचीच सावली त्याच्यावर पडलेली आहे काय असे विचारले जात आहे.
याउलट नेहमी शेवटच्या क्षणी अभ्यास करणाऱ्या मुलासारखा वागणारा काँग्रेस कर्नाटकात एका नव्या उत्साहात काम करीत आहे. कर्नाटकात भाजपची घालमेल वाढत आहे हे इतर ठिकाणी काँग्रेसअंतर्गत वा त्याच्या भोवताली ज्या घटना घडत आहेत त्याने दिसत आहे असे राजकीय निरीक्षकांना वाटते. राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनी केलेले उपोषण देखील भाजपने पाठिंबा दिलेले होते. त्यातून एकीकडे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना कमजोर करण्याचा डाव होता तर दुसरीकडे भाजपच्या माजी मुख्यमंत्री राहिलेल्या वसुंधरा राजे यांना. भाजपश्रेष्ठींना राजे यांना खच्ची करायचे आहे कारण तसे झाल्याशिवाय नवीन नेता मूळ धरू शकणार नाही. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांना पुढे करून गेहलोत आणि राजे यांना शह द्यायचा प्रयत्न फसला आहे. केंद्रातील हाय प्रोफाइल मंत्रालये सांभाळणारे अश्विन वैष्णव हे लो प्रोफाइल मंत्रीअसले तरी सध्या श्रेष्ठींचे लाडके दिसत आहेत. ज्यापद्धतीने गुलाम नबी आझाद आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासारखे पूर्वाश्रमीचे काँग्रेसी राहुल यांच्या विरोधात सक्रिय झाले आहेत त्याचा अर्थ कर्नाटकच्या लढाईत काँग्रेसला कमजोर करण्याचे प्रयत्न वाढत आहेत. आझाद आणि शिंदे यांचा बोलविता धनी कोण हे सगळ्यांना माहित आहे. भाजपची उमेदवार यादी जाहीर झाल्यावर माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी केलेली बंडखोरी बरेच काही सांगून जाते. वादग्रस्त ईश्वरप्पानी निवडणूक लढवायचे ठरवले नसले तरी ‘कमिशन’च्या मुद्यावर विरोधक आक्रमक राहणार आहेत. भाजपमधील वाढती बंडखोरी प्रसारमाध्यमे दाबून ठेवत आहेत, असे आरोप होत आहेत. मुख्यमंत्री बोम्मई हे कर्नाटक भाजपचा ‘चेहरा’ बनू शकलेले नाहीत ही पक्षापुढील मोठी अडचण आहे. ये•ाrयुराप्पा गटाला झुकते माप दिले तर दुसरा गट रागावतो तर त्यांच्या विरोधकांना जागा दिल्या तर माजी मुख्यमंत्री बिथरतात असे चित्र म्हणजे ‘सोडले तर पळते व धरले तर चावते’ अशा परिस्थितीला श्रेष्ठींना सामोरे जावे लागत आहे. काँग्रेसमध्येदेखील अडचणी नाहीत असे नाही. सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यातील प्रतीस्पर्धा जगजाहीर आहे.
भारत जोडो यात्रेला राज्यात मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाचा अर्थ लोकांना बदल हवा आहे असे दाखवत आहे. सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षात बरेच नेतेमंडळी येत आहेत असे अजब चित्र आहे. जर भाजप कर्नाटक हारले तर दक्षिण भारतात त्याच्या हाती एकदेखील राज्य राहणार नाही. एवढेच नव्हे तर पुढील वर्षी होणाऱ्या तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या निवडणुकात भाजप विरोधकांना बळ येईल. गमतीची गोष्ट अशी की 1996 साली भाजपचे केंद्रात आलेले पहिले सरकार अवघे 13 दिवसांचे होते. त्यानंतर 1998 साली आलेले 13 महिन्याचे ठरले. 13 व्या लोकसभेत अटल बिहारी वाजपेयी परत तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा मात्र ते सरकार जवळजवळ पूर्णकाळ चालले. काँग्रेसला अलीकडील काळात तेरा तारीख फार शुभ लाभली. 1996पासून आठ वर्षे राजकीय वनवासात असलेल्या काँग्रेसला 2004च्या 13 मे ला निकाल लागले आणि संयुक्त प्रगतिशील आघाडीच्या माध्यमातून सत्ता मिळाली. केंद्रात सत्तेसाठी आघाडीचा डाव सोनिया गांधी यांनी पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच खेळला आणि त्याला यश आले. ‘इंडिया शायनींग’ च्या फसव्या प्रचारात भाजप वाहून गेले. अदानी घोटाळा पुढे आल्यावर कर्नाटकातील निवडणूक ही पहिली आहे. विरोधी पक्षांनी या घोटाळ्याबाबत उठवलेले रान जनताजनार्दनापर्यंत कसे पोहोचले आहे ते 13 मे ला कळणार आहे. या घोटाळ्यावर संसदेत चर्चा होऊ न दिल्याने आणि हा घोटाळा देशाच्या ऐरणीवर ठेवणाऱ्या राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्वच रद्दबातल केल्याने सरकार आणि विरोधक यातील संघर्ष पेटला असताना या निवडणुका होत आहेत. संसदेत ‘गुजरात मॉडेल’ लागू करून विरोधकांची मुस्कटदाबी सुरु आहे असा प्रचारदेखील वाढला आहे. विरोधकांच्या अशा या हल्ल्यातच जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामामधील 40 जवानांच्या मृत्यूकरिता सरकारचा हलगर्जीपणा जबाबदार आहे असा सनसनाटी आरोप करून सत्ताधाऱ्यांना स्तब्ध केले आहे. पुलवामामध्ये 300 किलो आरडीएक्स कोठून आले हा कळीचा मुद्दा गेली पाच वर्षे अनुत्तरित राहिलेला आहे असे जाणकारांचे मत आहे. ‘भ्रष्टाचाराने बरबटलेले विरोधक माझी कबर खोदण्याचा वेडा प्रकार करत आहेत’ असे आरोप करून पंतप्रधानांनी जनतेच्या भावनेला हात घालायचा प्रयत्न चालवला आहे तो किती यशस्वी होणार ते येत्या काळात दिसणार आहे. कर्नाटकातील निवडणुकीची ही कुस्ती ही स्थानिक प्रश्नांवर लढवली जात आहे. तिचा प्रचार जितका स्थानिक मुद्यावर राहील त्यावरच ती फिरणार आहे. भाजपमधील बंडखोरी ही श्रेष्ठीच्याकरिता चिंतेचा विषय झाली आहे. आगीच्या बंबाचे काम त्यांच्यावर येऊन पडलेले आहे. शिस्तबद्ध पक्ष अशी कधीकाळी ख्याती राहिलेल्या पक्षातून लहानथोरांचे पलायन सुरु झाले आहे.
या निवडणुकीचे परिणाम राष्ट्रव्यापी असल्याने पंतप्रधान मोदी असोत अथवा गृहमंत्री अमित शहा वा राहुल गांधी अथवा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, हे रान ढवळून काढत आहेत. राष्ट्रीय स्तरावरून बघताना कर्नाटक हे एक आव्हान बनले आहे असे दिसत आहे. विरोधी ऐक्याच्या सुरु असलेल्या कवायतीमध्ये प्रमुख पक्ष म्हणून काँग्रेसला स्वत:चा मान राखायचा असेल तर कर्नाटक जिंकणे महत्त्वाचे आहे. पडेल पक्षांना कोणीच विचारत नसते. उत्तरेत आणि पश्चिम भारतात लीलया मैदान मारणाऱ्या भाजपची बंगळुरूमध्ये दमणूक सुरु आहे. यातून सत्ताधारी कसा मार्ग काढतात हे पुढील महिन्याभरात दिसणार आहे. कठीण प्रसंग येतो तेव्हा कणखर नेतृत्व कामाला लागते. मोदी-शहा हे आव्हान कसे पेलणार त्यावर ‘तेरा’ ला कोणाचे बारा वाजणार ते ठरणार आहे.
सुनील गाताडे








