भाग्यनगर येथील या कॉलनीकडे मनपाचे साफ दुर्लक्ष
बेळगाव : भाग्यनगर नववा क्रॉसजवळ असलेल्या सुखकर्ता कॉलनीमध्ये समस्यांचा अक्षरश: डोंगरच उभा ठाकला आहे. ना रस्ते, ना गटारी, ना पथदीप. यामुळे खेड्यापेक्षाही अत्यंत दुर्लक्षित झालेल्या या सुखकर्ता कॉलनीचा दु:खहर्ता ठरणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सुखकर्ता कॉलनी तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी रस्ते, गटारी करण्यात आल्या नाहीत. महानगरपालिकेला या परिसरातील नागरिक सर्व कर भरत आहेत. पण रस्ते व गटारी नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात ये-जा करणे अवघड जात आहे. काही ठिकाणी विजेचेखांब उभारण्यात आले आहेत तर काही ठिकाणी नाही. पथदीपही नेहमीच बंद असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी ये-जा करणे अवघड जात आहे. महापालिकेचे आयुक्त याकडे लक्ष देणार का? याचबरोबर नगरसेवकही ही समस्या सोडविणार का? असा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. नाव सुखकर्ता मात्र या परिसरातील नागरिकांना समस्या नेहमीच दु:खदायक ठरत आहेत. तेव्हा तातडीने या समस्या सोडवाव्यात आणि साऱ्यांनाच दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.









