दिग्गज मल्ल आखाडय़ात. आज पासून रंगणार थरार. कुस्ती शौकिनांची उत्सुकता शिगेला
फिरोज मुलाणी / औंध
65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार आजपासून रंगणार आहे. अनेक चुरशीच्या नेत्रदीपक लढती पहायला मिळणार असल्या तरी कुस्ती शौकीनांचे लक्ष खुल्या गटातील लढतीकडे लागले आहे. महाराष्ट्र केसरी किताबाची गदा खांद्यावर घेण्यासाठी राज्यातील अव्वल दर्जाचे मल्ल आखाडय़ात उतरले आहेत. मानाचा किताब जिंकून महाराष्ट्र केसरीच्या आखाडय़ात कोण बाहुबली ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
65 व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेस आता काही तास उरले आहेत. विविध गटात ही स्पर्धा होत असली तरी कुस्तीशौकिनांचे लक्ष खुल्या गटातील महाराष्ट्र केसरी गटातील लढतीकडे असते. अव्वल दर्जाचे तुफानी मल्ल महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढतात. अतिशय चुरशीच्या लढतीचा रंगतदार थरार पहायला मिळत असल्याने कुस्तीशौकिनांना देखील या स्पर्धेची आस लागलेली असते. स्पर्धेला कुस्तीशौकिनांचा अभूतपुर्व प्रतिसाद मिळेल अशी सध्या कुस्तीक्षेत्रात चर्चा सुरू आहे.
गतसालचा विजेता पृथ्वीराज पाटील पुन्हा मैदानात उतरणार आहे. अनेक डावाची अस्त्रs त्याच्या भात्यात आहेत. निर्णायक क्षणी बाजी मारण्यात तरबेज असलेल्या प्रुथ्वीराजला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव आहे. त्याचा विजयी वारु रोखणे प्रतिस्पर्ध्या समोरचे तगडे आव्हान आहे. 2018 सालचा महाराष्ट्र केसरी नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यंदा देखील गादी गटातून उतरणार आहे. राज्यस्तरीय, आणि राष्ट्रीय स्पर्धेत उत्तम कामगिरी करून आपण भरात असल्याचे त्याने सिध्द केले आहे. योग्यवेळी गियर बदलून निकाल बदलण्यात तो माहीर आहे. सोलापूरचा जागतिक पदक विजेता तुफानी ताकदीचा महेंद्र गायकवाड याने वर्षभरात चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन घडवले आहे. गतवर्षी नवखा असताना अनेक अनुभवी मल्लांना त्याच्या पट्टीवर पराभवाची धूळ खावी लागली होती. मोठा अनुभव आणि नवीन डावपेच त्याच्याकडे आहेत.
मैदानी कुस्तीत महाराष्ट्रासह उत्तर भारतातील दिग्गज मल्लांना पराभवाची धूळ चारणारा कुस्तीशौकिनांच्या गळ्यातील ताईत असलेला तगडा मल्ल सिंकदर शेख हिंगोली जिह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. मैदानी कुस्तीत विजयी घौडदौड सुरू असलेला सिकंदर गदा जिंकण्याच्या इराद्याने यंदा उतरला आहे. तो धाडसी आणि लढवय्या आहे. त्याचे तगडे आव्हान स्पर्धेत असणार आहे. मात्र मैदानी कुस्ती आणि स्पर्धेच्या कुस्तीतील लढण्याचे तंत्र आणि डावपेच वेगवेगळे आहेत दोन्हीचा मेळ घालून सिकंदर लढल्यास प्रतिस्पर्ध्याला त्याला रोखणे अवघड होईल. जिद्दीने लढणारा आणि दमाखसाने भारी असलेल्या उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकरने मैदानी कुस्तीत सातत्य राखले आहे. साईड साल्तो त्याचे खास अस्त्र आहे. यंदा पदकाचा रंग बदलून किताब जिंकण्याचे आव्हान त्याच्यापुढे आहे.
सातारला दोन दशकापासून गदेची प्रतिक्षा लागली आहे. भुगावला गदेने हुलकावणी दिली असली तरी यंदा सातारला गदा मिळवून देण्यासाठी तुफानी ताकदीचा मोहिचा सुपुत्र किरण भगत माती गटातून उतरला आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर ही त्याची पहिलीच स्पर्धा आहे. त्याच्या कामगिरीवर सगळेच लक्ष ठेवून आहेत. मोठा अनुभव असल्याने स्पर्धेत त्याचे तगडे आव्हान निश्चित असणार आहे. गादी गटात मात्र नवख्या तुषार ठोंबरेवर जिह्याची मदार आहे.
पुणे शहरातून बलदंड ताकदीचा पृथ्वीराज मोहोळ आणि माऊली कोकाटे नवखी जोडी पुन्हा एकदा मैदानात उतरली आहे. गतवर्षी माऊलीने अनेकांचे अंदाज चुकीचे ठरवून गादी गटात अंतिम फेरीत धडक मारली होती. यंदा देखील चांगल्या कामगिरीची पुणेकरांना त्यांच्या कडून अपेक्षा आहे. उपमहाराष्ट्र केसरी संतोष गरुड यांचे महाराष्ट्र केसरीचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी पुण्याच्या अक्षय गरुडवर आहे. (मुंबई शहर पश्चिम) चे प्रतिनिधित्व करणारा अक्षय घराण्याला गदा मिळवून देण्यासाठी स्पर्धेत उतरला आहे. सर्वच बाबतीत तो सरस आहे पुणेकरांच्या मोठय़ा अपेक्षा त्याच्या खांद्यावर आहेत. नांदेड जिह्याचे प्रतिनिधित्व करणारा उंचपुरा शिवराज राक्षेची अद्याप किताबासाठी झुंज सुरू आहे.
मुंबई जिह्याकडून आखाडय़ात उतरलेला बिलवा मल्ल आदर्श गुंड स्पर्धेत धोकादायक ठरू शकतो उंचीने कमी असला तरी तो वजनाने भारी आहे भारंदाज धोबीपछाड सारख्या डावावर त्याची हुकुमत आहे. नव्या दमाचा पुण्याचा महारुद्र काळेल कुठपर्यंत मजल मारणार हे स्पर्धेतील कामगिरी वरुन निश्चित होईल. प्रदिर्घ अनुभव असलेला जालन्याचा उपमहाराष्ट्र केसरी विलास डोईफोडे महाराष्ट्र केसरीची गदा मिळवण्यासाठी यंदा परत मैदानात उतरला आहे. नव्या दमाच्या मल्लाचे आव्हान त्याला पेलावे लागणार आहे. सोलापूरचाच जुना मल्ल प्रतिस्पर्ध्याला दमवून निर्णायक विजय मिळवणारा गणेश जगताप तयारीनिशी नशीब अजमावणार आहे.पदकाने हुलकावणी दिली तरी आखाडय़ात वारंवार नशिबाची परिक्षा देणारा माऊली जमदाडे यंदा महाराष्ट्र केसरीची गदा आणणार काय याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली आहे.
कुस्ती पंढरीतून आहे. 2018 साली सैन्यदलातील संग्राम पाटील याने उपउपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. यंदा त्याच्या कामगिरीवर कोल्हापूरकर लक्ष ठेवून आहेत. विद्यापीठ पदक विजेता शुभम सिदनाळे वजन उंचीने भारी आहे. सोबतीला नवीन दमाच्या अरुण बोंगार्डेने खुल्या गटातून दंड थोपटले आहेत.
सांगलीतील सुबोध पाटील (गादी) आणि सतिश मुडे (माती) हे दोन नवीन चेहरे खुल्या गटात आपली कामगिरी दाखवणार आहेत. दोघांची पाटी कोरी आहे. कसलेही दडपण नसल्याने सुबोधचा चमत्कार आखाडय़ात समजणार आहे.
दुखापतीतून सावरल्यानंतर मैदानी कुस्तीत विजयी घौडदौड चालू असलेला भारत मदने याने (मुंबई शहर) प्रतिस्पर्ध्यासमोर आव्हान उभे करण्याच्या इराद्याने स्पर्धेत उडी घेतली आहे. लातूरचा डार्कहॉर्स उप महाराष्ट्र केसरी शैलेश शेळके दुखापतीतून सावरल्यानंतर पुन्हा आखाडा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. ग्रीकोरोमन प्रकारात तरबेज असलेला शैलेश धोकादायक ठरू शकतो हे त्याने सिध्द करून दाखवले आहे.
बुलढाण्याचे नेतृत्व करणारा महाराष्ट्र केसरी बालारफिक शेख डबल महाराष्ट्र केसरी किताब जिंकण्यासाठी लढणार आहे. जय पराजयाची पर्वा नसलेला बालाची धक्कादायक निकालाची ख्याती आहे. अलीकडे नवीन मल्लांबरोबर मैदानी कुस्तीत तो सातत्याने दोन हात करीत आहे. स्पर्धेत नवीन डावपेच घेऊन बालारफिकला चमत्कार घडवावा लागेल. मूळचे सोलापरचे मात्र मुंबई शहराकडून महाराष्ट्र केसरी साठी यंदा देखील अनुभवी समाधान पाटील, दत्ता नरळे नशीब अजमावणार आहेत.रत्नागिरीचा लढवय्या संतोष दोरवड माती गटातून लढणार आहे. अनेक धक्कादायक निकाल आणि चुरशीच्या लढती आखाडय़ात रंगणार आहेत. दावेदार सज्ज झाले असले तरी बाजी कोण मारणार हे 14 जानेवारी रोजी समजणार आहे.








