इंग्लंड आणि श्रीलंका हा सामना दोन्ही संघासाठी फारच महत्त्वाचा. रुळावरून जी गाडी घसरली होती तिला जाग्यावर आणण्याचे काम दोन्ही संघांना करायचं होतं. मी मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे या विश्वचषकात क्रिकेट इंद्रधनुष्यासारखे आपले रंग दाखवत आहे. इंग्लंडसारख्या बलवान व अष्टपैलूंचा भरणा असलेल्या संघाची जी वाताहत झाली आहे, ती पाहून मला वेस्ट विंडीजची आठवण येते. ज्या संघाने मागच्या विश्वचषक स्पर्धेत रुबाब दाखवला होता तोच संघ विजयासाठी भीक मागताना दिसत आहे. नियती क्रिकेटमध्ये एखाद्या दादा संघाविरुद्ध एवढ्या क्रूरतेने कशी वागू शकते, हे बऱ्याच दिवसांनी बघितलं. इंग्लंडचे सुरुवातीचे फलंदाज हे धावांचे रनमशीन होते. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर ऑफिसमधील एखादा कर्मचारी सुट्टीचा अर्ज जेवढ्या तत्परतेने आपल्या बॉसकडे देतो, तेवढ्यात तत्परतेने इंग्लंडचे फलंदाज खेळपट्टीवर येत चेंडूवर स्वाक्षरी करत माघारी परतले. मधल्या फळीतल्या फलंदाजांना प्रत्येक धाव शंभर धावासारखी वाटत नसेल तरच नवल. कसोटी क्रिकेट असो वा झटपट क्रिकेट डाव जर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत असेल तर त्या खेळपट्टीवर नांगर हा खोलवर रुजवावच लागतो. परंतु कुठल्याही फलंदाजांना बॅटरुपी नांगर उचलताच आला नाही, हे इंग्लंडचे दुर्दैव. क्रिकेटमध्ये प्रत्येक सामना नवीन सामना असतो. मागच्या पराभवातून काहीतरी नवीन शिकणं गरजेचं असतं. दक्षिण आफ्रिका व अफगाणिस्तान यांच्याकडून स्वीकारलेला पराभव त्यांना या सामन्यात वारंवार दिसत होता. किंबहुना त्याचच भूत त्यांच्या मानगुटीवर बसलं होत, हेच दृश्य दुर्दैवाने या सामन्यात बघायला मिळालं.
आज इंग्लंडच्या फलंदाजांचा खऱ्या अर्थाने फलंदाजी करताना ब्रेक फेल झाला. परंतु ब्रेक फेल झाल्यानंतर गिअरमध्ये गाडी कंट्रोल करता येते हे ते विसरूनच गेले. त्यामुळे क्रिकेटरुपी गाडी झाडावर कधी आदळली हे त्यांना समजलंच नाही. भारतीय खेळपट्टीवर विशेषत: बेंगलोरसारख्या मैदानावर सुरुवातीच्या काही षटकात चेंडू हेलकावे घेतात. त्यानंतर स्विंग 2000 च्या नोटा प्रमाणे हद्दपार होतो. अर्थात त्याचे कारणही तसेच आहे की आजकाल दोन नवे चेंडू वापरले जातात. कदाचित ही बाब क्रिकेटचे जन्मदाते विसरले असावेत. खराब सुरुवातीनंतर सुद्धा डावाला आकार कसा द्यावा, हे तुम्ही भारतीय संघाकडून शिकले पाहिजे. संकट आले की सर्वांना सोबत घेऊन येतात अर्थात त्याला क्रिकेटही अपवाद नाही. परंतु संकटाला सामोरे जाताना अनुभवाची भलीमोठी शिदोरी तुमच्याकडे असताना, गतविश्वचषकातील विजेतेपदाचा काटेरी मुकुट डोक्यावर असताना पाचपैकी चार सामन्यात तुमचे झालेले पराभव, ही गोष्ट इंग्लंडसाठी सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशातलाच प्रकार होता. प्रत्येक विश्वचषक स्पर्धेत गतविजेता ठरलेला विश्वचषक संघ स्पर्धेतून बाहेर जाताना कित्येकदा बघितले आहे. परंतु एखाद्या संघाची रस्त्याची जशी चाळण व्हावी तशी चाळण झाली तर ती त्या संघासाठी निश्चितच शोकांतिका. सुरुवातीपासूनच लंकन गोलंदाजांनी प्रत्येक चेंडूचा जमा खर्च मांडला. काल खऱ्या अर्थाने इंग्लंडच्या संघाला 11 खेळाडू कमी पडलेत की काय असे वाटू लागले. क्रिकेटमध्ये खेळपट्टीवर 400 धावा जमल्या की ती खेळपट्टी नायक वाटू लागते. (अनिल कपूरच्या चित्रपटासारखी नव्हे) आणि दीडशे ते 200 च्या आत गडगडली की ती खलनायक वाटते. (संजय दत्तच्या त्या चित्रपटासारखी नव्हे) आणि सर्व काही घडले ते सपाट पीचवर (पाटा खेळपट्टी) श्रीलंकेने मात्र जी चूक इंग्लंडने केली होती, त्या चुकीची री मात्र ओढली नाही. निसांका आणि सदिरा यांनी या खेळपट्टीवर कशी फलंदाजी करावी लागते हे दाखवून दिले या पराभवामुळे साहेबांचे स्पर्धेतील परतीचे तिकीट जवळपास निश्चित झालंय. शेवटी हा स्तंभ संपवताना मला एका गाण्याची ओळ गुणगुणावीशी वाटते, ती म्हणजे, कोण होतास तू काय झालास रे!
विजय बागायतकर, क्रेकेट समालोचक









