चिंचेच्या पानावर देऊळ रचिले
आधी कळस मग पाया रे
एका कीर्तनचक्रीच्या कार्यक्रमात ही रचना ऐकायला मिळाली आणि कै. दत्तदास घागबुवा यांच्या स्वरातील ऐकलेली रचना सारखी सारखी आठवायला लागली. एकतर कोणत्याही ठिकाणचं, कोणत्याही विषयावर असलेलं कोणतंही आणि कोणाचही कीर्तन असो, कै. घागबुवांची आठवण झाली नाही असं होत नाही. कितीतरी अभंग आणि आख्यानं ऐकताना ते त्यांनी कसं मांडलं असतं किंवा होतं हे मनात एका बाजूला चालूच राहतं, पण कित्येकदा असं होतं की समोरचं आख्यान सुरू असतानाच आपली मात्र भलतीकडेच तंद्री लागते आणि मनातल्या मनात आपण कै. घागबुवांनाच ऐकत असतो.
वस्तुत: हे विचित्र आहे, पण सत्य आहे. अगदी त्यांचेच चिरंजीव आदरणीय शरदबुवा घाग यांना जरी ऐकत असलो तरी हे मनातलं आठवणींचं आवर्तन काही संपत नाही. मग प्रश्न असा पडतो की गाणं ऐकताना आपण नक्की काय ऐकत असतो? गाणं ऐकता ऐकता आपण आठवणींची दारं उघडून स्वत:च्याच मनात इतस्तत: भटकत राहतो. जेव्हा सुप्रसिद्ध गायकांनी गायलेलं काही नवख्या माणसांकडून ऐकतो तेव्हा काहीवेळा दाद ही त्या गायकाच्या मेहनतीला, रियाजाला असते. पण बऱ्याचदा असं होतं की ते ऐकून आपल्याला एकदम मूळ चीज आठवते आणि नकळत दाद जाते ती त्या मूळ कलाकाराला. प्रामाणिक कलाकार जेव्हा अशा ठेवणीतल्या गोष्टी पेश करतात तेव्हा त्यांना आपल्याला दिलेली टाळी आणि त्या चिजा घडवणाऱ्यांच्या आठवणीने आलेली टाळी, यातला फरक अगदी अचूक कळतो. आणि ते श्रेय ते त्यांना जाहीरपणे देतातही. त्यावर आलेली दाद मात्र त्यांच्या प्रामाणिकपणाला असते.
अशी कितीतरी गाणी कितीतरी आठवणी जाग्या करतात. प्रत्येकवेळी प्रत्येक गाणं वेगळं बोलतं. प्रत्येक सादरीकरणात काय घडेल हे कलाकारालाही ठाऊक नसतं. पण असे अमृतयोग जमून येतात आणि त्या मैफिलीची झिंग कायमस्वरूपी मनात वस्तीला उतरते.
काहीवेळा प्रत्यक्ष कार्यक्रमात सूर असे काही लागतात की ते श्रोत्यांच्या मनालाही तितकेच लागतात. आणि अन्य कोणत्याही कार्यक्रमात ते गाणं कोणाकडूनही ऐकलं की आठवण अक्षरश: भळभळायला लागते. ती आठवण म्हणजे सुरांनी केलेली जखम असते. सुरेल असते म्हणून सुगंधी असते. एखाद्या नवख्या कलाकाराने इतक्या तयारीनिशी काही सादर केलेलं असतं की तेच कायम आठवत राहतं आणि मग दुसऱ्याने कुणी ते गायलेलं ऐकलं की काळीज थरथरत राहतं. कुठेतरी काहीतरी दुखतं. फक्त होते ती अवस्था
बूँद ना गिरी एक लहू की
कुछ ना रही निसानी
मन घायल पर तन पे छाई
मीठी टीस सुहानी
अशी असते. नादब्रह्माची करामत अशी असते की ते कधी, कोणत्या क्षणी कोणाच्या स्वरात उतरेल, कुणाच्या कंठावर तर कुणाच्या बोटांवर कधी कृपा करील हे सांगता येत नाही. त्यामुळे नादब्रह्म ज्या क्षणी प्रसन्न होतं तो क्षण अमृताचा घन होऊन बरसतो. त्या बरसण्याने मनात जे सुखाचे अंकुर उगवून येतात त्यांची आठवण अशी पुढच्या कैक वेळांना येते.
पंडिता मालिनीबाई राजूरकर यांनी गायलेला केदार यूट्यूबवर उपलब्ध आहे.(प्ttज्s://ब्दल्tल्.ंा/ञ्श्ँw6Qग्2क्इळ) यामध्ये द्रुतलयीतल्या चिजेत त्यांनी एके ठिकाणी तीव्र मध्यम असा काही लावला आहे की जणुकाही केदार रागाचा बीजमंत्रच! त्या एका मध्यमात त्या पूर्ण सादरीकरणाचं सारसर्वस्व असल्यासारखं वाटतं. असं काही ऐकल्यावर अस्वस्थता येणार नाही का? तो अमूर्त मध्यम हृदयाशी असा घट्ट धरून ठेवावा अशी एरवी वेडपट वाटावी अशी इच्छा होते. पण रतिसुखाचे दुर्मिळ क्षण, समाधिसुख प्रथमच गवसल्याचा क्षण किंवा नादब्रह्माचे अमृतक्षण हे
आनंद वोसंडे बहुळ । परि अस्तित्त्व जयाचे क्षणकाळ
परतोनी न ये गेला पळ । म्हणौनीच पृथ्वीमोली?
अशाच जातकुळीतले असतात. ते हातात धरता येत नाहीत. अगदी आताच्या अत्याधुनिक माध्यमांवर लेखले जाऊनही त्यांची येणारी पहिली अनुभूती ही अनन्वय असते. कदाचित म्हणूनच ती फार छळते. अमुक गाण्यातला एखादा सूर हा एखाद्यानेच लावावा असं वाटायला लावण्याइतपत हा वेडा भाव पोहोचतो. कधीकधी ते खरंही असतं. आणि अतिशय महान, पूज्य असलेल्या एखाद्या कलाकाराच्या गाण्यांची जेव्हा आधुनिक प्रयोगापायी वाट लावली जाते तेव्हा या वेडेपणाचं रूपांतर सात्त्विक संतापात होऊन जातं. कारण ज्या कलाकाराचं गाणं ऐकताना आपल्याला ते गाणं पूर्वी ऐकल्याच्या सुखद स्मृती जाग्या होत असतील तर निदान तो कलाकार आपल्याला आनंद नक्कीच देत असतो. पण ज्याचं गाणं ऐकल्यावर हे अत्याचार आहेत असं वाटतं तो तर त्या पात्रतेचाही नसतो. यावर सूज्ञांस अधिक काय सांगणे?
पण असं होत असतं. समोर गाणं सुरू असतं. त्याचा पहिला आलाप कानावर पडला रे पडला की डोळ्यांतून खळ्ळकन पाणी येतं. प्रत्येक सुराबरोबर आपल्या आवडत्या कलाकृतींची, कलाकारांची आठवण जागी होत राहते. दर जागा तिने/ त्याने कशी गायली आहे किती भावपूर्ण, सुरस गायली आहे याची आठवण सुरू राहते. बाहेरही सुरांचा पाऊस असतो आणि आतही आठवणींचा पाऊस सुरू असतो. आवरणं कठीण असतं. खऱ्या अर्थाने अभिजात असणारं हे स्वराभिसंधान असतं. यामुळे होतं असं की या जखमा असतात पण सुगंधी असतात. कारणकेलेत वार ज्याने तो मोगरा असावा!
अॅड अपर्णा परांजपे-प्रभु








