पुणे / प्रतिनिधी :
कोण संजय राऊत? त्यांना मी ओळखत नाही आणि मी कोणाचे नाव घेतलेले नाही. मी माझ्या पक्षासंदर्भात बोललो होतो. त्यामुळे कोणाच्या अंगाला लागण्याचे कारण नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी संजय राऊत यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले. अदानी व पवार साहेब हे परस्परांना ओळखत असल्याने या भेटीत काहीच गैर नाही, असे उत्तरही त्यांनी दिले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित बैठकीत अजित पवार बोलत होते. या वेळी आमदार दत्ता भरणे, अशोक पवार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष व संचालक उपस्थित होते.
पवार आणि अदानी भेटीबाबत विचारले असता पवार म्हणाले, हिंडेनबर्ग अहवालाबाबत गौतम अदानी यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. अदानी हे पवारांना भेटले आहेत. ते दोघेही एकमेकांना ओळखतात. अदानींवरील आरोप सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे या भेटीत गैर काहीच नाही. या भेटीचे चुकीचे अर्थ लावू नयेत.
पुणे विद्यापीठ परिसरात चित्रीत केलेल्या वादग्रस्त रॅप साँगबाबत ते म्हणाले, झालेला प्रकार हा गंभीर आहे. याबाबत मी स्वत: प्रभारी कुलगुरूंकडे विचारणा केली आहे. मी कुलगुरू कारभारी काळे यांच्याशीही मोबाईलवरून चर्चा केली आहे. त्यांनी हा प्रकार सुट्टीच्या दिवशी झाल्याचे सांगितले. यामध्ये दोषी आढळणाऱयांवर कठोर कारवाई व्हायला हवी. ही कारवाई इतकी कठोर असावी, की भविष्यात विद्यापीठात असे रॅप साँग करण्यास कुणीही धजावणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.








