पोलिसांनी चौकशी करावी : मंत्री रोहन खंवटे
म्हापसा : रामा काणकोणकरवर झालेल्या हल्ल्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. रामाने पोलिसांना दिलेल्या जबानीत कोणाही राजकीय नेत्याचे नाव नव्हते, मग इस्पितळातून डिस्चार्ज दिल्यानंतरच त्याने आपले व मुख्यमंत्र्यांचे नाव कसे घेतले? शेवटच्या क्षणी रामाला कुणी बोलण्यास लावले? रामाचा बोलविता धनी कोण? याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केली आहे. रामा काणकोणकर यांचा पोलिसांवर, वकिलांवर, न्यायदेवतेवरही विश्वास नाही, मग आहे तरी कुणावर? मुख्यमंत्री स्वत: रामाला इस्पितळात भेटायला गेले होते. त्यांनी सविस्तर विचारपूस केली. रामाच्या मागणीनुसार त्याच्या घरी पोलिस पहारा ठेवला.
तेव्हा का त्याने कोणाची नावे सांगितली नाहीत? यामागचे कारण पोलिसांनी शोधणे गरजेचे आहे, असेही खंवटे म्हणाले. ज्या दिवशी रामावर हल्ला झाला, त्या दिवशी पोलिस तक्रार झाली. 24 तासाच्या आत जे आरोपी त्यात गुंतले होते त्या सर्वांना पकडण्यात आले. त्यावेळी रामाने आपली तक्रार दिली, व्हिडिओग्राफी झाली. जे काही आहे ते रामाला विचारण्यात आले. जबानीत त्याने कोणाचेही नाव घेतले नाही आणि शनिवारी डिस्चार्जवेळी रामाने मुख्यमंत्री आणि आपले नाव घेतले. यामुळे सर्वत्र खळबळ माजली. रामाला विरोधी नेते, उच्च स्थानावरील लोक भेटले. रामाने इस्पितळातच केक कापून तो खाल्ला. यातून त्याचे आरोग्य कसे आहे ते कळत होते, असे खंवटे यांनी सांगितले.









