कोल्हापूर / विनोद सावंत :
रंकाळा तलावामध्ये श्याम सोसायटीसह परिसरातील अन्य नाल्यातील सांडपाणी थेट मिसळते. याचबरोबर पर्यटकांकडूनही प्लास्टिक कचरा तलावात टाकला जातो. बंदी असतानाही जनावरे, धुणी धुण्याचे प्रकार सुरू आहेत. यामुळे रंकाळा तलावाचे भवित्वय धोक्यात आले आहे. तर तलावाची जबाबदारी असणारे महापालिका आणि प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाईचे अधिकार असणारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ गंधारीची भूमिका घेत आहे. तलावात मासे मृत आढळल्यानंतर त्यांना जागे येते. त्यामुळेच रंकाळा तलाव दूषित होण्याचे पाप नेमके कोणाचे आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
एक वेळ अशी होती की रंकाळा तलावातील पाणी परिसरातील नागरीक पिण्यासाठी वापरत होते. आता पिण्यासाठी सोडाच वापरासाठीही येथील पाणी घेताना नागरीक विचार करत आहेत. परिसरातील सांडपाणी थेट रंकाळ्यात मिसळत असल्याने ही स्थिती झाली आहे. प्रदूषित पाण्यामुळे तलावातील पाण्यास हिरवा तवंग आला आहे. यामध्येच मत्स्य बिज केंद्र परिसरात मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याचे नुकतेच दिसून आले. नेहमीप्रमाणे यानंतर मनपा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून पाण्याचे नमुने तपासणीसाठी चिपळूनला पाठविले. परंतू तलावात सांडपाणी मिसळूच नये, यासाठी कायम स्वरूपी उपाय योजनाबाबत कोणतीच ठोस कार्यवाही होत नाही. या उलट रंकाळा तलाव प्रदूषित होऊ नये यासाठी निधी खर्च न करता बाह्या रूप उजळण्dयावरच कोटयाधीचा चुरडा केला जात आहे.
सांडपाणी मिसळत नाही मग मासे मृत कसे
श्याम सोसायटी येथून केवळ पावसाळ्यामध्येच बंधारा काढल्याने रंकाळा तलावात सांडपाणी जाते. सध्या तलवात नाल्यातून सांडपाणी जात नसल्याचा दावा केला जात आहे. सांडपाणी मिसळत नाही मग मासे मृत कसे होतात, असाही सवाल उपस्थित होत आहे.
कोट्यावधीचा निधी पाण्यात
नदी, सरोवर संवर्धनमधून कोट्यावधीच्या निधीतून श्याम सोसायटी नाल्यासह रंकाळा तलावाच्या परिसरातील सांडपाणी तलावाच्या बाजुने पाईपलाईन टाकून दुधाळी एसटीपीकडे वळविले आहे. परंतू काहीवेळेस पाईपलाईन तुंबल्याने नाल्यातील पाणी रंकाळा तलावात जाते.
परिसरात 100 टक्के ड्रेनेजलाईन नसल्याचाही फटका
तलावा लगंत असणाऱ्या 70 ते 80 टक्के परिसरात अमृत योजनेतून ड्रेनेजलाईन टाकली आहे. परंतू काही परिसरात अद्यपी ड्रेनेजलाईन नसल्याने येथील सांडपाणी ओव्हरफ्लो होवून रंकाळा तलावात मिसळते. 100 टक्के ड्रेनेजलाईन झाल्यास तलाव प्रदूषण मुक्त होण्यास मदत होणार आहे.
हर्बल ट्रीटमेंट ‘रामभरोसे’
11 कोटींच्या निधीतून रंकाळा तलावातील प्रदूषित पाण्यावर हर्बल ट्रीटमेंट करण्याचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाबाबत विचारले असता मनपाचा पाणीपुरवठा विभाग प्रकल्प विभागाकडे तर पर्यावरण विभाग पाणी पुरवठा विभागाकडे बोट दाखवित आहे.
‘एमपीसीबी’चे काम नमुने, नोटीस पुरतेच
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) प्रत्येकवेळी दुषित पाण्याचे नमुने घेवून तपासणीसाठी पाठवते. यानंतर ठोस कार्यवाही काही होत नाही. वारणा नदी आणि पंचगंगा नदीमध्ये नुकतेच मृत मासे सापडले. संबंधित कारखान्यावर कारवाई न करता नोटीस पाठवून सुनावणी सुरू केली. रंकाळा तलावाबाबतही असेच काहीसे होणार यात शंका नाही.
मत्स्य बीज केंद्रालगत असणाऱ्या घाण पाण्याने मासे मृत होत आहेत. मनपाने तत्काळ देवकर पाणंद येथील बांध काढून साचून राहिलेले घाण पाणी शाहू स्मृती गार्डनच्या बाजूने वळवून निर्गत केल्यास ही समस्या निकाली निघू शकेल.
अमर जाधव, रंकाळा प्रेमी, शिवाजी पेठ
मासे मृत झालेल्या ठिकाणचे पाण्याचे नमुने घेतले असून त्याच्या अहवालानंतर नेमके कारण स्पष्ट होईल. यानंतर पुढील उपाय योजना केल्या जातील. परिसरातून सांडपाणी तलावात मिसळते का याचीही पाहणी करू.
हर्षजित घाटगे, जल अभियंता, महापालिका








