नगरिकांतून संताप : प्रशासनाचे दुर्लक्ष, आंदोलनाचा इशारा
वार्ताहर /किणये
बाकनूर-इनाम बडस गावातील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या पंधरा वर्षापासून या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहे. आम्ही या रस्त्यासाठी दाद मागायची कोणाकडे? आणि रस्त्याला वाली कोण? असा सवाल या भागातील नागरिक करीत आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागातील इनाम बडस क्रॉस ते बाकनूर या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहेत. बहुतांश ठिकाणी रस्ता पूर्णपणे उखडून गेलेला आहे. एखाद्या जंगल भागात जाणाऱ्या कच्च्या रस्त्याचे स्वरुप या रस्त्याला प्राप्त झाले आहे. त्यामुळे इथली वाहतूक धोकादायक बनली आहे. वाहनधारकांना रात्रीच्यावेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक अपघात घडलेले आहेत. बरेच दुचाकीस्वार पडले आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्याआधीच या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे. इनाम,बडस, बोकनूर, बेळवट्टी, बिजगर्णी, राकसकोप, कावळेवाडी, यळेबैल, सोनोली, बेळगुंदी या भागातील वाहनधारकांची या रस्त्यावरून रोज मोठ्या संख्येने वर्दळ असते. खड्डेमय रस्त्यामुळे वाहनधारक अक्षरश: वैतागून गेलेले आहेत. सध्या प्रशासनामार्फत अनेक गावातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येत आहे. मात्र इनाम बडस-बाकनूर या रस्त्याकडे प्रशासनाचे अधिकारी कधी लक्ष देणार? असा सवाल सर्वसामान्य नागरिक करू लागले आहेत.
लोकप्रतिनिधींचा रस्त्याकडे कानाडोळा- विनोद कांबळे
बाकनूर ते इनाम बडस क्रॉस रस्ता दुर्लक्षित झालेला आहे. लोकप्रतिनिधींनी या रस्त्याकडे कानाडोळा केला आहे. माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या कालावधीत या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर या रस्त्याकडे साफ दुर्लक्ष झालेले आहे. या रस्त्यासाठी आता इनाम बडस, बाकनूर आणि बेळवट्टी भागातील आम्ही सर्व नागरिक आंदोलन छेडणार आहे.









