राहुल गांधींची पदयात्रा, बी.बी.सी डॉक्मयुमेंटरी, हिंडेनबर्गने अदानी उद्योग समूहाचा केलेला पर्दाफाश आणि नरेंद्र मोदी यांनी संसदेत विरोधकांवर, विशेषतः काँग्रेसवर केलेला ‘हल्ला बोल’ यातून आगामी काळातले देशाचे राजकारण कसे असेल याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. भाजपला प्रादेशिक पक्षांची फारशी भीती नाही कारण जे आज विरोधात आहेत ते बदलू शकतात, जहाल हे मवाळही होऊ शकतात याची पूर्णच खात्री मोदी यांना आहे. आणि ज्यांना हे जमणार नाही असे पक्ष हे नेहमी कुंपणावर असतात हा भारतातल्या राजकीय पक्षांचा इतिहास, वर्तमान आहे आणि असेच भविष्यही असेल. पण मग प्रश्न असा आहे काँग्रेस मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा 2024 मध्ये पाडाव करू शकेल काय? तेवढी ऊर्जा, तेवढी यंत्रणा, तेवढे तरुण, मध्यमवर्ग व फ्लोटिंग वोटर्स यांना आपल्याकडे आकर्षित करू शकेल काय?
मोदी यांच्या दहा वर्षाच्या सत्तेची अँटी इनकबन्सी, विखुरलेले विरोधी पक्ष, राहुल गांधींचे भाजपच्या विरोधात शड्डू ठोकणे या साऱयातून राजकारण साकारत आहे. प्रत्यक्ष निवडणूक, त्यातले मुद्दे, डावपेच वेगळे असतात, इतिहासाची पुनरावृत्ती नेहमी होत नसते. हे लक्षात घेतले तर पुढचे महिने राजकीयदृष्टय़ा विलक्षण गतिमान असतील. लोकसभा निवडणुकीला 13-14 महिने उरले असतानाच पुढील ‘़हिंदकेसरी’ कोण होणार? हा लाखमोलाचा प्रश्न आहे. नरेंद्र मोदी यांच्यासमोर टिकेल असा माईचा लाल जन्मायचा आहे असे सत्ताधारी आघाडीतील मंडळी दावा करत आहेत. अदानी घोटाळय़ावर संसदेमध्ये विरोधकांनी नुकतेच रान उठवले तरी त्याच्याकडे डोळेझाक करत ‘आपण एकच कसे सगळय़ांना भारी आहोत’ असे पंतप्रधानांनी सांगितले खरे आता पुढील काळात कसा पट उलगडणार हे उत्कंठावर्धक ठरणार आहे.
2024 चे खरे मल्ल कोण हा कळीचा प्रश्न आहे. 2014 पासून मोदींचा अश्वमेघ दौडत आहे आणि त्याला पकडण्याची अजून कोणीही हिम्मत दाखवू शकलेलं नाही. हिम्मत दाखवली नाही अशातला प्रश्न नाही. पण ती दाखवणारे तोंडावरच आपटले. मोदींनीच त्यांना आस्मान दाखवले. याला कारणही तसेच आहे. पंतप्रधानानी स्वतःच एकदा म्हटले होते की ‘मोदी को समझना हो तो मोदी का दिमाग समझना होगा’. म्हटले तर अगदी सोपे आहे. म्हटले तर अतिशय अवघड.
ज्यादिवशी विरोधी पक्षांना मोदींना ‘डिकोड’ कसे करावयाचे हे समजेल तेव्हापासून त्यांची सरशी होईल असेच साक्षात पंतप्रधान सुचवत आहेत. मोदींच्या विजयाचे श्रेय हे त्यांच्या चिकाटीला आहे तसेच त्यांच्या अथक प्रचाराला. स्वच्छ भारताचा प्रसार असो कोविड महामारी विरुद्ध लढाई असो की जी-20 देशांच्या बैठका असोत, सगळीकडे मोदींचा जयजयकार होईल त्यांची प्रतिमा सगळीकडे दिसेल याची व्यवस्था सत्ताधारी पक्षाने केलेली आहे. एव्हढेच नव्हे तर दुसरा कोणताच चेहरा मग तो भाजपचा असो की विरोधी पक्षांचा कोणाला जास्त दिसणार नाही याची व्यवस्था केली गेली आहे. म्हणतात ना की प्रेम आणि युद्धात सारे काही क्षम्य असते तद्वतच निवडणुकीच्या राजकारणातदेखील असा मोदींचा सिद्धांत दिसत आहे.
पंतप्रधानांसमोर इतर नेते म्हणजे कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे शाम भटाची तट्टाणी असाच प्रकार. मोदींच्या पासंगाला कोणी पुरुच शकत नाही असे जबर प्रचारतंत्र. बहुतेक प्रसारमाध्यमे, मग त्या वृत्तवाहिन्या असोत की वर्तमानपत्रे, ही सरकार आणि सत्ताधारी पक्षाच्या ओंजळीने पाणी पितात असा विरोधी पक्षांचा ठाम समज. तो किती बरोबर अथवा चूक ते ज्याचे त्याने ठरवावे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढून त्यांच्या ‘पप्पू’ या प्रतिमेला प्रभावीपणे पंक्चर केले आहे. गेल्या आठवडय़ातील त्यांचे लोकसभेतील भाषण कन्याकुमारी ते काश्मीरच्या पदयात्रेने त्यांच्यात जबरदस्त आत्मविश्वास आला आहे असे दाखवते असे त्यांचे काही विरोधकदेखील म्हणत आहेत. आता बाहेरचे लोक काहीही म्हणोत पण या यात्रेमुळे पक्षात राहुल हे एकमेव नेते झाले आहेत असे आता पक्षातील टीकाकारदेखील मानू लागले आहेत. ज्या पद्धतशीर रीतीने त्यांनी गुलाम नबी आझाद यांना जम्मू आणि काश्मीरच्या राजकारणात देखील निष्प्रभ केले त्यातून पक्षातील असंतुष्टदेखील आश्चर्यचकित झाले आहेत. भाजपचा खासदार असलेल्या आपल्या चुलत भावाला वरूण गांधींना राहुलनी ज्याप्रकारे वाटाण्याच्या अक्षता लावल्या त्याने त्यांना राजकारणातील डावपेचदेखील येऊ लागले आहेत असे दिसत आहे.
गौतम अदानी यांच्या उद्योगसमूहाच्या घोटाळय़ात केंद्र सरकारदेखील कशी मोठय़ा प्रमाणे लिप्त आहे हा राहुल यांचा आरोप फारसा कोणाला खोडता आलेला नाही. वा तसे करण्याची कोणी तसदी घेतली नाही. काहीही असो या घोटाळय़ाबाबत प्रथमपासून आवाज उठवणारे राहुलच आहेत. गेली नऊ वर्षे सतत टिंगलटवाळी आणि कुचेष्टेचा सामना करायला लागलेल्या राहुल यांची भीतीच संपली आहे आणि ‘घाबरू नका’ हा त्यांचा मंत्र फार भारी पडला आहे असे दिसत आहे. यात्रेनंतर राहुल यांना त्यांचे समर्थक ‘तेजस्वी’ म्हणू लागले आहेत, पण त्यांच्या विरोधकांना देखील हे आता पूर्वीचे प्रकरण राहिलेले नाही याची जाणीव होत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची गोष्टच निराळी. उत्तर भारताचे राजकारण चांगले अवगत असल्याने त्यांनी हिंदुत्वाच्या राजकारणाला छेद कसा द्यायचा याबाबत गहिरे मंथन चालवले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी जर त्यांनी तेजस्वी यादव यांना पुढे करून जर राष्ट्रीय राजकारणात उडी मारली तर बरेच बदल बघायला मिळणार आहेत. मुलायम सिंग यादव यांच्या निधनाने आणि लालू प्रसाद यांच्या आजारपणाने विरोधी पक्षातील नितीश हे एक आघाडीचे शिलेदार झालेले आहेत. मागासवर्गीय समाजाचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील वेळोवेळी आपले नेतृत्व कसे मोठे आहे हे दाखवायचा प्रयत्न करत असले तरी त्यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. केजरीवाल यांना दिल्लीचा नवीन मेयर निवडून आणणे कठीण झाले आहे तर ममतादीदींना केंद्राने नवीन खिंडीत पकडलेले दिसत आहे. बंगालचे नवीन राज्यपाल ममतादीदींशी प्रेमाने वागत आहेत याचा अर्थच काहीतरी समझोता झाला आहे.
अशावेळी संसदेत नुकताच झालेला सामना बघितला तर राहुलच मोदींचे खरे प्रतिस्पर्धी म्हणून पुढे आले आहेत असे दिसत आहे. हे शिवधनुष्य त्यांना कसे पेलणार हे येत्या काळात दिसणार आहे. मोदींचा काँग्रेसवरील जोरदार हल्ला बघितला तर केवळ राहुलच आपल्या विजयपथाचा मार्ग अडवून उभे आहेत असे त्यांना वाटत आहे हे स्पष्ट आहे.
सुनील गाताडे








