शासकीय जागा ताब्यात घेणे गरजेचे : सरकारी जागा,वापरात न असलेल्या इमारतींची अवस्था दयनीय : लोकप्रतिनिधी-शासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
खानापूर : खानापूर शहराच्या आसपास आणि शहरातील सरकारी जागा, सरकारी इमारतींचा मालक कोण अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील सरकारी जागा, न वापरात असलेल्या इमारतींची दयनीय अवस्था झाली आहे. या इमारती तालुका पंचायतीच्या मालकीच्या आहेत. तर सरकारी पड जागा या महसूल खात्याच्या मालकीच्या आहेत. मात्र या जागेवर होणारे अतिक्रमण रोखण्यात सरकारी यंत्रणा सपशेल कुचकामी ठरली आहे. त्यामुळे शहरासह आसपासच्या सरकारी अस्थापणाचा मालक कोण अशी म्हणण्याची वेळ आली आहे. याबाबत लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून या जागा आणखी काही दिवसांनंतर अतिक्रमण करणाऱ्यांच्याच मालकीच्या होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. शहर आणि आसपासच्या परिसरात सरकार मालकीच्या अनेक इमारती आणि सरकार पड जागा आहेत. यापूर्वी तहसीलदार कार्यालयासह इतर कार्यालय असलेले जुने तहसीलदार कार्यालय पूर्णपणे मोडकळीस आले आहे. या इमारतीची गेली 15 वर्ष अजिबात देखभाल न झाल्याकारणाने इमारत जीर्ण झाली आहे. तसेच पोलीस निरीक्षक कार्यालयही याच परिस्थितीतून जात आहे. जुन्या कोर्ट आवारातील कोर्टाच्या इमारतीचीही तीच दशा झालेली आहे. या जुन्या कोर्ट आवारात अनेकांनी अतिक्रमण करून आपला व्यवसाय थाटला आहे. ही जागा तालुका पंचायतीच्या मालकीची आहे. मात्र तालुका पंचायतीकडून या कोर्टच्या जागेबाबत कायमच कानाडोळा करण्यात येत आहे.
आवाज उठवूनही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
मागील तालुका पंचायत सदस्यांनी याबाबत वेळोवेळी बैठकातून आवाज उठविला होता. मात्र अधिकाऱ्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केल्याने ता. पं. अधिकारी आणि व्यापाऱ्यांचे हितसंबंध गुंतल्याचे बोलले जात आहे. जुन्या कोर्ट आवारात मोठी जागा असून या जागेत जर नियोजन करून व्यापारी गाळे निर्माण केल्यास तालुका पंचायतीला मोठ्या प्रमाणात महसूल मिळू शकतो. आणि अनेक बेरोजगाराना या ठिकाणी व्यवसायासाठी जागाही उपलब्ध होऊ शकते. सध्या या जागेत अनेकांनी अतिक्रमण करून आपापली दुकाने थाटली आहेत. तर अनेकांनी दुकानाचे शेड उभारुन दुसऱ्यांना भाड्याने दिले आहे. त्यामुळे या जागेचा उपभोग घेणारे आर्थिक दृष्टीने गब्बर होत आहेत. सदर जागा शहरातील वाहन पार्किंगसाठी उपलब्ध करून दिल्यास शहरातील रहदाराची समस्या सुटू शकेल.
रस्त्यावरच बेशिस्तपणे वाहने पार्किंग
सध्या राजा छत्रपती चौक ते लक्ष्मी मंदिर रहदारीची समस्या गंभीर बनली आहे. राजा छत्रपती चौक ते लक्ष्मी मंदिरापर्यंत रस्त्यावरच बेशिस्तपणे वाहने पार्किंग करण्यात येतात. त्यामुळे अनेक वेळा वाहतूक समस्या निर्माण होते. यासाठी या दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी नियोजन करणे गरजेचे आहे. जुन्या तहसीलदार कार्यालयातील ब्रिटिशकालीन इमारत पूर्णपणे मोडकळीस आली आहे. या इमारतीची डागडुजी करून तलाठी कार्यालय तसेच इतर शासकीय कार्यालय केल्यास नागरिकांची मोठी सोय होणार आहे. यासाठी तालुका पंचायतीने याबाबत तातडीने क्रम घेणे गरजेचे आहे.
अतिक्रमण हटवून जागेचा सामाजिक उपक्रमासाठी वापर केल्यास समस्या मार्गी
शहरात लगत असलेल्या अनेक सरकारी पड जागेत काही राजकीय हितसंबंध असलेल्या काहींनी अतिक्रमण केलेले आहे. या सर्व सरकारी जागांची पडताळणी करून मोजणी करणे गरजेचे आहे. या जागा महसूल खात्याच्या मालकीच्या असल्याने या ठिकाणी झालेले अतिक्रमण हटवून जागेचा सामाजिक उपक्रमासाठी वापर केल्यास अनेक समस्या मार्गी लागू शकतात. यासाठी लोकप्रतिनिधी आणि शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा प्रश्न गांभीर्याने घेऊन स्वत:च या जागेची मालकी प्रस्तापित करणे गरजेचे आहे. यासाठी महसूल अधिकाऱ्यांनी आपल्या जागा व्यवस्थितपणे आपल्या अधिपत्याखाली घेणे गरजेचे आहे. शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण होत असताना याकडे नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे कानाडोळा केलेला आहे. काही ठिकाणी बांधकामांची परवानगी न घेता मोठ्या इमारती उभारण्यात आलेल्या आहेत. तर काही ठिकाणी रस्त्यावर बांधकामे आलेली आहेत. तसेच 40-50 वर्षापूर्वी असलेल्या बोळात तसेच काही ठिकाणी खुल्या जागेत अतिक्रमण करून दुकान गाळे निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे हे अतिक्रमण करणारेच मालक होऊन बसलेले आहेत. याकडेही नगरपंचायतीने दुर्लक्ष केल्याने अनेक ठिकाणी मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
कागदपत्रांची पडताळणी करून खुल्या जागेतील अतिक्रमण हटवा
शहरासह आसपासच्या सरकारी जागांची महसूल, तालुका पंचायत, नगरपंचायतीने आपल्या जागा मोजमाप करून आपल्या ताब्यात घेणे गरजेचे आहे. यासाठी कागदपत्रांची पडताळणी करून खुल्या जागेतील अतिक्रमण हटवावे आणि या जागा सामाजिक उपक्रमासाठी, सार्वजनिक उपयोगासाठी आणाव्यात, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.









