एकीकडे मुंबई महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागलेले असताना मात्र दुसरीकडे मुंबईत सगळ्याच ठिकाणी अचानक रस्त्यांची कामे, नालेसफाई आणि दुरूस्तीची कामे सुरू केल्याने, मुंबईकरांना जीव मुठीत धऊन जगावे लागत आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टने देखील 8 मे पासून दुप्पट भाडेवाढ केली आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना वाली कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. खुदा (खोदकाम) कहा नही है मुंबई मै तो हर जगह खुदा (खोदकाम) ही खुदा है, इस खुदाई मै गिरकर कहा आम नागरिक खुदा के पास ना जा बैठे असे आता मुंबईकर बोलताना दिसत आहेत.
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, त्याबरोबरच देशातील एक महत्त्वपूर्ण आर्थिक, राजकीय आणि सामाजिक घडामोडीचे केंद्र आहे. मुंबईत घडणाऱ्या घटनेचे पडसाद देशात उमटतात. मुंबई महापालिका ही देशातील सगळ्यात मोठी महापालिका आहे. जसे मुंबईचा महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त होण्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे स्वप्न असते, तसेच मुंबई महापालिकेवर सत्ता मिळविणे ही सगळ्याच राजकीय पक्षांची महत्वकांक्षा असते, त्यासाठी आता सगळेच राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत.
दरवर्षीप्रमाणे मान्सूनपूर्व नालेसफाई करण्याची कामे जोरात सुरू आहेत, मात्र पालिकेच्या काही कामांना 31 मे ची डेडलाईन असल्याने एकाच ठिकाणच्या अनेक मार्गांवर खोदकाम सुरू असल्याने मुंबईकरांची नाकेबंदी झाली आहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठी जाणाऱ्या छोट्या छोट्या गल्ल्या एकाच वेळी खोदल्याने नागरिकांना दोन मिनिटाच्या अंतरासाठी अर्धा कि.मी वळसा घालुन जावे लागत आहे.
एकाच भागातील कामे करताना ती टप्प्याट्प्याने करावीत, ज्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही, तसेच नागरिकांना आधी पूर्वसुचना द्यावी. मात्र रात्री सुरू असलेला रस्ता अचानक सकाळी बंद केला जातो, किमान लोकांना जाण्या-येण्यासाठी पायवाट ठेवावी मात्र सरसकट रस्ता बंद केल्याने ना कचरा गाडी येत आहे, ना अग्निशमन दलाची गाडी, ना रूग्णवाहिका. गेल्या आठवड्यात उपनगरात मोकळ्या मैदानात ठेवलेल्या पाईपला अचानक आग लागली, या आगीने काही क्षणात रौद्रऊप धारण केले, मात्र आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहचण्यासाठी प्रयत्नांची मोठी शिकस्त करावी लागली. काही प्रमुख रस्ते रस्ता ऊंदीकरण तर काही नवीन बनवण्यासाठी खोदले आहेत, त्यामुळे बेस्टच्या ताफ्यात नव्याने आलेल्या अत्याधुनिक बेस्ट बसेस भल्या मोठ्या असल्याने बेस्ट चालकांनाही गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यात रस्याच्या दुतर्फा गाड्या अनधिकृतपणे पार्क केल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होताना दिसत आहे.
ढिसाळ कारभार त्यात कोणत्याही प्रकारे नियोजन नसल्याने पालिकेच्या कामांचा मोठा त्रास मुंबईकरांना होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याच्या आदेशामुळे पालिका निवडणूकीची केव्हाही घोषणा होऊ शकते, त्यामुळे पालिका आणि पालिकेच्या कामाचा सपाटा लावला आहे. 31 मे पर्यंत कामे पूर्ण करून आपली बिले काढण्यासाठी कंत्राटदारांचा आटापिटा चालला आहे, मात्र यामुळे जी कामे सुरू आहेत, त्या कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे. मुंबई महापालिकेची मुदत 7 मार्च 2022 ला संपल्याने गेली 3 वर्षे मुंबई महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. नगरसेवक नसल्याने पालिका अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात सध्या कामे सुरू आहेत. मान्सूनपूर्व नालेसफाई आणि नालाऊंदीकरणाच्या कामांमुळे काही ठिकाणी नाल्याचे पाणी परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात घुसल्याने नागरिकांना आपले घर सोडून इतरत्र स्थलांतर करावे लागले आहे. विशेषत: मिठी नदीच्या संदर्भाचा प्रश्न दरवर्षी चर्चेला येतो, मंत्री अधिकारी यांचा मोठा लवाजमा घेऊन नालेसफाईच्या कामांची पाहणी केली जाते. मात्र पहिल्याच पावसात सगळं पाण्यात जातं. शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री यांनी मिठी नदीत कारंजे फुलवण्याची घोषणा केली होती, कारंजे दूर राहिले मात्र इतक्या वर्षात मिठी नदीतील गाळ काढता आलेला नाही.
मिठी नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाअंतर्गत बनावट करार आणि मशिनरी भाडे तत्वावर घेऊन वाढीव दराने 65 कोटी 54 लाखांचा आर्थिक गैर व्यवहार झाल्याप्रकरणी दोनच दिवसापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने ठपका ठेवत, पालिका अधिकाऱ्यांसह, कंत्राटदार कंपनीच्या मालकासह काही लोकांवर गुन्हा दाखल केला आहे तर दुसरीकडे मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी मुंबईतील नालेसफाईच्या कामाची पाहणी केल्यानंतर कामाबद्दल असमाधान व्यक्त करीत गेल्या सव्वा महिन्यात काही ठिकाणी 10 टक्के तर काही ठिकाणी 20 ते 30 टक्केपेक्षा जास्त काम झालेले दिसत नाही, एकूण कामे ही बेभरवशाची असल्याचे धक्कादायक विधान केले. तर संबंधित अधिकारी वर्ग नाल्यातील गाळ काढल्यावर भरतानाचा आणि नंतर भरलेल्या डंपरचा तसेच रिकाम्या होणाऱ्या डंपरचा व्हिडिओ दाखवू शकले नाहीत. त्यामुळे नालेसफाईची व्हिडिओग्राफी प्रत्यक्षात किती होते याची माहिती व्हिडिओ वरून मिळाली नाही आणि तंत्रज्ञानाचा नक्की कसा आणि कुठे उपयोग केला जातो याची माहिती पर्जन्य जलवाहिनी खात्याचे अधिकारी देऊ शकले नाहीत. ज्या अॅपवर माहिती देणार असे सांगितले जाते तेही अधिकाऱ्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला पण तेही अपडेट नसल्याचे दिसून आले. त्यामुळे एकूणच बेभरवशाची कामे सुऊ असल्याचे चित्र खुद्द पालकमंत्र्यांनी सांगितले.
काही ठिकाणी नाल्यात प्रचंड गाळ आणि प्लॅस्टिकचे ढिगारे पहायला मिळाले. तसेच या नाल्याच्या भिंतीही बांधण्यात आलेल्या नसल्याचे शेलार यांनी सांगितले, पालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यात पालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदार हे आचारसंहितेच्या भीतीपोटी इतर कामे पूर्ण कऊन, बिले काढण्याच्या तयारीत असल्याने यावर्षी नालेसफाईच्या कामाकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पालिकेने किती गाळ काढला आणि किती नालेसफाई झाली हे पहिल्या पावसातच कळेल अन्यथा मुंबईकर पहिल्या पावसात दरवर्षीप्रमाणे गाळात गेल्याचे बघायला मिळेल.
प्रवीण काळे








