नरेंद्र मोदी यांचा येत्या लोकसभा निवडणुकीत कडवा मुकाबला करावयाचा असेल तर विरोधी पक्षांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण हा लाखमोलाचा प्रश्न आहे. याचे उत्तर मोदी विरोधक जेवढ्या एकदिलाने आणि चातुर्याने देऊ शकतील त्यावर भाजपचा 2024 मध्ये पाडाव होणार की नाही ते ठरणार आहे.

यामुद्यावर सत्ताधारी जेव्हढे संभ्रमात राहतील तेव्हढे मोदी आणि भाजप यांचे बळ कमी होणार आहे. ते अजूनही राणा भीमदेवी गर्जना करत असले तरी कर्नाटकमधील पराभवाने ते अर्धमेले झाले आहेत हे सत्य त्यांना लपवता आलेले नाही. यातच संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरने राज्यकर्त्यांना एक प्रकारे जमालगोटाच दिलेला आहे. फक्त मोदींच्या करिष्म्यावर आणि हिंदुत्वाच्या बळावर निवडणूक जिंकता येईल अशा भ्रमात भाजपने राहू नये, असे स्पष्ट करून त्याने दुधात मिठाचा खडा टाकण्याचेच काम केले आहे. राज्यांमध्ये प्रभावी नेतृत्वाचा अभाव आणि विकासोन्मुख दृष्टी नसेल तर भाजपला पुढील काळ कठीण आहे. कर्नाटकमधील विजयाने विरोधी पक्षांच्या शिडात बळ आले आहे. त्या राज्यातील परिस्थिती राष्ट्रीय स्तरावर आहे असे जर मानले तर भाजपला 2024ला खरोखरंच मोठ्या धाडसानेच सामोरे जावे लागेल असा निर्वाळा ऑर्गनायझरने दिलेला आहे. या म्हणण्याचा अर्थ असा की एखादे योगी आदित्यनाथ आणि हिमंत बिस्व शर्मा सोडले तर भाजप आणि मित्रपक्षांचे इतर राज्यातील मुख्यमंत्री हे गुळाचे गणपती आहेत आणि त्यांच्यामुळे भाजपला फायदा होण्याऐवजी नुकसानच संभवते. आपला प्रभाव निर्विवाद राहावा म्हणून श्रेष्ठींनी लाईटवेट नेत्यांना मुख्यमंत्री केले तेच भाजपच्या अंगलट येऊ शकते असेच हे सांगणे होय. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस या उदयोन्मुखी नेत्याला काटण्यासाठीच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले ते आता आपले प्रताप दाखवू लागले आहेत. थोडक्यात काय तर भाजपराज्यात सारा सावळागोंधळ आहे असेच या मुखपत्राला सुचवायचे दिसते आहे. पण मोदी सरकार दहाव्या वर्षात पदार्पण करत असताना संघाने भाजपचे कान टोचल्याने विरोधी पक्षांनी फारसे हुरळून जाण्याचे काम नाही. कारण पुढील आठ-दहा महिन्यात काँग्रेस आणि इतर विरोधकांना मान खाली घालून काम करावे लागणार आहे. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर अशातला प्रकार. मोदींबरोबर अटीतटीची लढाई झाली तर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये त्यांना जेरीला कसे आणावयाचे याचा साधकबाधक विचार केला तरंच काहीतरी हाती लागणार आहे.
23 जूनची विरोधी पक्षांची बैठक
पाटणा येथे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत ‘मला पंतप्रधानपदामध्ये स्वारस्य नाही. मला विरोधी पक्षांना सत्तेत आणायचे आहे’ अशी जर राहुल गांधी घोषणा करतील तर विरोधी पक्षांचे ऐक्य एकीकडे लवकर घडेल तर दुसरीकडे मोदी आणि भाजपला तो एक धक्का असेल. याचा अर्थ असा होईल की पंतप्रधानपदाचा प्रश्न खुला आहे असा संदेश जाईल आणि प्रत्येकजण भाजपचा पराभव करण्याच्या कामाला लागेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भारतीय जनमानसात सत्तेचा त्याग करणाऱ्याविषयी एक आदराची भावना असल्याने असे काही घडले तर राहुल यांचे रेटिंग अजूनच वाढून मोदींना मिरच्या झोंबवण्याचे काम करेल. काहीजण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याचा पुरस्कार करत आहेत. असे झाले तर देशातील सारा दलित वर्ग काँग्रेसला मदत करेल असा या गटाचा होरा आहे. 28 डिसेंबर 2003 रोजी सोनिया गांधीनी मुंबईत एक जंगी रॅली केली होती. त्यात त्यांनी समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याची गोष्ट करून एक नवीन डाव खेळला होता. पुढे काय घडले तो ताजा इतिहास आहे. त्यामुळे पाटण्यात राहुल काही बार उडवणार काय यावर पुढील सारीपाट कसा रंगणार ते अवलंबून आहे. राजदचे लालूप्रसाद यांना नितीश कुमार यांना पंतप्रधान बनवण्याची घाई झालेली आहे कारण तसे घडले तरच त्यांचा मुलगा तेजस्वी बिहारचा मुख्यमंत्री बनू शकेल. अलीकडील काळात राहुल आणि नितीश यांचे मेतकूट जमले आहे अशी चर्चा काँग्रेसमध्ये आहे. अरविंद केजरीवाल हे सतत घोड्यावर बसलेलेच असतात. पण सध्या मात्र केंद्राने दिल्लीतील प्रशासनाबाबत जो वादग्रस्त अध्यादेश आणला आहे त्याने पुरे बैचेन झालेले आहेत. या अध्यादेशाचे जर कायद्यात रूपांतर झाले तर केंद्र केजरीवाल यांच्या डोक्यावर मिरे वाटेल. या अध्यादेशाचा राज्यसभेत पाडाव व्हावा यासाठी केजरीवाल दिवसरात्र एक करत आहेत. हा अध्यादेश पराभूत करणे म्हणजे 2024 ची सेमी फायनल उत्तीर्ण करणे राहील असा युक्तिवाद ते करत आहेत. ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय महत्वाकांक्षा आहे पण सध्या त्या आपल्या राज्यातच पार अडकल्या आहेत. एकीकडे भाजपची वाढ होत आहे तर दुसरीकडे काँग्रेस आणि डावे पक्ष मिळून तृणमूलला जेरीला आणत आहेत.
कालपरवापर्यंत विरोधी ऐक्याच्या गप्पा मारणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आता आपण तिसऱ्यांदा मुख्यमंत्री कसे बनतो त्यावरच लक्ष केंद्रित केले आहे. प्रियंका गांधी या मेदकमधून लोकसभेला उभ्या राहणार अशी पुडी काँग्रेसने गुपचूप सोडून सत्ताधारी भारत राष्ट्र समितीला हैराण केलेले आहे. काँग्रेस तेलंगणात सत्तेत येऊ शकतो असे दावे वाढत असतानाच राज्य भाजपमध्ये विधानसभा निवडणुकीतील रणनीतीवरून फूट पडली आहे. काँग्रेसशी आपले काहीही देणेघेणे नाही असा दावा दोनचार महिन्यापूर्वीपर्यंत केलेले समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव हे उत्तरप्रदेशमधील मुस्लिम समाज काँग्रेसकडे सरकू लागल्याने अस्वस्थ झाले आहेत. अखिलेश यांचे उत्तर प्रदेशमधील प्रस्थ काँग्रेसला बरोबर घेतले तरच टिकू शकते असे त्यांचे समर्थक सांगत आहेत. मायावती या भोपळ्याच्या बी प्रमाणे अलगद आहेत. भाजपने त्यांना पुरते घेरल्याने त्या विरोधी पक्षांच्या ऐक्यापासून दूर राहिल्या आहेत. पण आपल्या पायाखालची वाळू सरकत आहे हे त्यांना जाणवत आहे. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री असताना त्यांनी आणि त्यांच्या परिवाराने निम्म्या दरात 261 सरकारी फ्लॅट लाटले आहेत असा नवीन घोटाळा पुढे आला आहे.
काँग्रेसने खर्गे यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार बनवले तर एका झटक्यात मायावतींची दलित मतपेढी ‘स्वगृही’ परतेल या भीतीने त्या हैराण आहेत. कर्नाटकमधील विजयाने काँग्रेसला स्वर्ग दोन बोटे उरला आहे असं दिसत आहे. हे बरोबर नव्हे. लोकसभा जिंकायची असेल तर काँग्रेसला गाफील राहून चालणार नाही, असा घरचा आहेर शशी थरूर यांनी दिला आहे. देशातील वातावरण बदलत आहे याची चुणूक एका वेगळ्याच घटनेने दिसून आली. ज्याला भारताचा सर्वात जवळचा मित्र समजले जाते त्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी यावर्षी आंब्याच्या पेटीची भेट केवळ मोदींना न पाठवता सोनिया गांधींनादेखील पाठवली आहे. याचा अर्थ ज्याचा त्याने जसा तसा काढावा. गेले दोन आठवडे दिल्लीत भाजप श्रेष्ठींनी बैठकांचा सपाटा सुरु लावल्याने लोकसभेची निवडणूक येत्या चार राज्यांच्या निवडणूकांबरोबर पंतप्रधान घेणार अशी चर्चादेखील राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणातून उत्साहवर्धक बातम्या येत नसल्याने लोकसभा निवडणूकच अगोदर घेऊन विरोधकांना मोदी खिंडीत पकडू शकतात असे म्हटले जाते. भाजपमधील एक गट मात्र अयोध्येतील मंदिराच्या उद्घाटनानंतरच लोकसभा निवडणूक होणार असे ठामपणे सांगत आहे. तसे झाले तर एप्रिल-मे मध्ये ठरल्या वेळीच त्या होतील. दुसरीकडे नितीश यांचा दावा आहे की विरोधकांच्या ऐक्यप्रक्रियेनं मोदी यांच्या तोंडचे पाणी पळाले असून लवकर लोकसभा निवडणूक घेण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. घोडामैदान जवळच आहे.
सुनील गाताडे








