शस्त्रसंधीसाठी पाकिस्तानने त्यांच्यासमोर केल्या विनवण्या
पाकिस्तानसोबत संघर्षविरामावरून झालेल्या सहमतीमागे भारतीय सैन्याचे डीजीएमओ म्हणजेच डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन्स लेफ्टनंट जनरल राजीव घई आहेत. पाकिस्तानी डीजीएमओ मेजर जनरल कासिफ अब्दुल्लांनी लेफ्टनंट जनरल घई यांना शनिवारी दुपारी हॉटलाइनवर फोन करत हल्ले रोखण्याची विनंती केली होती. खास बाब म्हणजे भारतीय सैन्याकडून पाकिस्तान विरोधात हल्ल्यांची पूर्ण रणनीति आखण्याची जबाबदारी देखील घई यांच्याकडेच होती.
मागील वर्षी ऑक्टोब महिन्यात घई यांनी साउथ ब्लॉक येथील सैन्य मुख्यालयात डीजीएमओचे पद सांभाळले होते. यापूर्वी ते दीड वर्षांपर्यंत श्रीनगर येथील चिनार कोरचे कमांडिंग इन चीफच्या पदावर कार्यरत होते. अशा स्थितीत एलओसी आणि काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांशी दोन हात करण्यात लेफ्टनंट जनरल घई यांना मोठा अनुभव आहे.
डीजीएमओंनीच केले होते लिस्टिंग
सैन्याच्या ऑपरेशन्सवरून डीजीएमओला सैन्यप्रमुखांचा उजवा हात मानले जाते. ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीनच्या 5 तळांना नष्ट करण्यात आले, त्यांची ओळख चिनार कोर कमांडरसोबत डीजीएमओंनी पटविली होती.
दर मंगळवारी हॉटलाइनवर चर्चा
2021 मध्ये एलओसीवर शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी शस्त्रसंधी झाली होती, या संबंधीच्या करारावर दोन्ही देशांच्या डीजीएमओंनी स्वाक्षरी केली होती. दर मंगळवारी दोन्ही देशांचे डीजीएमओ हॉटलाइनवर चर्चा करतात. परंतु शांतताकाळात दोन्ही देशांच्या डीजीएमओंच्या अंतर्गत येणारी अधिकारीही परस्परांमध्ये फोनवरून चर्चा करत असतात.
दोन्ही देशांच्या डीजीएमओंची आज चर्चा
पहलगाम हल्ल्यानंतर लेफ्टनंट जनरल घई यांनी पाकिस्तानी समकक्ष मेजर जनरल कासिफ यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. तर आता संघर्षविरामावरून दोन्ही देशांचे डीजीएमओ आज फोनवरून चर्चा करणार आहेत. यादरम्यान शनिवारी संध्याकाळी 5 वाजल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितींची समीक्षा दोन्ही डीजीएमओ करणार आहेत. भारतात डीजीएमओ एक थ्री-स्टार लेफ्टनंट जनरल रँकचा अधिकारी असतो. तर पाकिस्तानात टू-स्टार म्हणजेच मेजर जनरल रँकचा अधिकारी असतो.









