चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत भारत आणि न्यूझिलंड या दोन तुल्यबळ संघातील अंतिम लढतीकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष असेल. टीम इंडियाइतकाच न्यूझिलंडचा संघही परिपूर्ण मानला जातो. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही पातळ्यांवर हा संघ सरस आहे. हे बघता टीम इंडियासमोर त्यांचे कडवे आव्हान असेल. केन विल्यमसन हा न्यूझिलंडच्या फलंदाजीचा कणा मानला जातो. सातत्यपूर्ण खेळी, हे त्याचे वैशिष्ट्या. या स्पर्धेतही तो चांगल्या लयीत असल्याचे बघायला मिळते. दक्षिण अफ्रिकेविऊद्ध विल्यमसनने सजवलेली शतकी खेळी अविस्मरणीयच. साखळी सामन्यातील भारताविऊद्धची त्याची अर्धशतकी खेळी तो फॉर्मात असल्याचेच दाखवून देते. स्वाभाविकच अंतिम सामन्यात विल्यमसनला रोखण्यासाठी भारतीय गोलंदाजांना नवी रणनीती आखावी लागेल. मूळचा भारतीय असलेला राचिन रवींद्र हा न्यूझिलंडला मिळालेला कोहिनूर हिराच म्हणावा लागेल. 2023 चा वर्ल्ड कपही या पठ्ठ्याने गाजवला होता. चॅम्यियन ट्रॉफीतही त्याने दोन शतके झळकवली असून, त्यातून त्याचा निसर्गदत्त दर्जाच सिद्ध होतो. बांग्लादेशबरोबरच आफ्रिकेच्या कसदार गोलंदाजीसमोर त्याने ज्या पद्धतीने शतकी तडाखा दिला, तो अफलातूनच होय. सलामीवर विल यंगही फॉर्मात असून, त्याने पाकिस्तानविऊद्ध ठोकलेले शतक बघता त्याच्यावरही संघाची भिस्त असेल. तर यष्टीरक्षक लॅथमनेही चॅम्पियन करंडक स्पर्धेत आपली लौकिकास साजेशी कामगिरी केल्याचे दिसून येते. त्यानेही पाकिस्तानविऊद्ध सेंच्युरी केली असून, अंतिम सामन्यातील त्याच्या कामगिरीकडेही लक्ष असेल. कॉन्वे, मिचेल हेदेखील दमदार फलंदाज असून, कोणताही सामना फिरवण्याची क्षमता ते बाळगतात. न्यूझिलंड संघाचे सर्वांत मोठे बलस्थान म्हणजे त्यांच्याकडे असलेला अष्टपैलू खेळाडुंचा भरणा. अगदी तळाच्या गोलंदाजांपर्यंत त्यांची बॅटिंग लाईन. ग्लेन फिलिप, ब्रेसवेल यांच्याशिवाय राचिन रवींद्र, यंग हेही पार्टटाईम गोलंदाजी करू शकतात. कर्णधार सँटनर फलंदाजी, गोलंदाजीशिवाय कुशल कर्णधार म्हणूनही ओळखला जातो. संपूर्ण स्पर्धेत आपल्या नेतृत्वाचे कौशल्य त्याने दाखवून दिले आहे. परिस्थितीनुसार फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करणे, गोलंदाजांचाही प्रसंगानुरूप उपयोग करणे, त्याचबरोबर क्षेत्ररक्षणाचा चक्रव्यूह लावणे यात सँटनरने दाखवलेली चतुराई वाखणण्याजोगी होय. हे पाहता सँटनरची रणनीती समजून घ्यावी लागेल. तर एम हेन्री, ओरूके, जॅमिसन हे द्रुतगती गोलंदाजीची कमान सांभाळत आहेत. हे पाहता न्यूझिलंडचा संघ सर्वार्थाने समतोल वाटतो. अर्थात भारतीय संघही तोडीस तोड म्हणता येईल. रोहित शर्मा आणि शुभमन गील ही भारताची सलामीची जोडी धोकायदायक म्हणून ओळखली जाते. हिटमॅन रोहित काही षटके खेळला, तरी सामन्याचे गणित कसे पालटते, याचा अनुभव अनेक संघांनी वारंवार घेतला आहे. त्यामुळे रोहितला रोखण्यासाठी न्यूझिलंडला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. शुभमन गिल याने या स्पर्धेत चांगली कामगिरी केल्याचे पहायला मिळते. बांग्लादेशविऊद्ध शतकी मजल मारल्यानंतर पाकविऊद्धही त्याने चांगली खेळी केली. तर विराट कोहली याने एक शतक व एका अर्धशतकाच्या बळावर चॅम्यियन ट्रॉफीमध्ये आपला जलवा दाखवून दिला आहे. याशिवाय श्रेयस अय्यर, के. एल. राहुल हेही उत्तम फॉर्ममध्ये दिसतात. अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या हे अष्टपैलू म्हणून आपली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडत आहेत. आत्तापर्यंत एकाही सामन्यात हार्दिक आणि अक्षरने निराशा केलेली नाही. रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वऊण चक्रवर्ती यांच्या फिरकीच्या चक्रव्यूहाने तर कमालच केली असून, हा व्यूह कसा भेदायचा, याचे आव्हान न्यूझिलंडच्या गोलंदाजांसमोर असेल. मोहम्मद शमी हा तर गोलंदाजीत भारताचा हुकमी एक्का मानला जातो. त्याने या स्पर्धेत अत्यंत जबरदस्त गोलंदाजी केली असून, भारतीय संघाला फायनलपर्यंत पोहोचविण्यात त्याचा मुख्य वाटा राहिला आहे. त्याच्या कामगिरीमुळे अजूनपर्यंत तरी भारताला जसप्रीत बुमराहची उणीव भासलेली नाही. हे बघता अंतिम सामन्यातही त्याच्याकडून अपेक्षा असतील. तशी पाहिली, तरी भारतीय फलंदाजीही खोलवर आहे. त्यात सर्वच फलंदाज फॉर्मात पहायला मिळतात. शिवाय दुबईतील खेळपट्ट्या व भारतीय खेळपट्ट्या जवळपास सारख्या म्हणजेच फिरकीला साथ देणाऱ्या आहेत. अशा खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजी आणि गोलंदाजीकरिता पोषक वातावरण दिसते. न्यूझिलंड संघाला लाहोरला खेळून पुन्हा दुबईला यावे लागले. तशी भटकंती भारतीय संघाला करावी लागली नाही. टीम इंडिया दुबई सोडून कुठेही हललेली नाही. त्यामुळे संघाला पुरेसा आरामही मिळाला आहे. ही बाबही संघाकरिता फायद्याची ठरू शकते. 25 वर्षांपूर्वी म्हणजे 2000 साली या दोन संघांमध्येच अंतिम लढत रंगली होती. त्या वेळी न्यूझिलंडने भारताला पराभवाचा धक्का दिला होता. आता इतक्या वर्षांनतर हे संघ पुन्हा आमनेसामने आहेत. हे बघता त्या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी भारतीय संघाकडे नक्कीच असेल. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका यांसारख्या तगड्या संघांना चॅम्पियन ट्रॉफीमधून या वेळी गाशा गुंडाळावा लागला. पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तान यांचेही आव्हान संपुष्टात आले. मात्र, या साऱ्यात अफगाणिस्तान संघाची कामगिरी चांगलीच उठून दिसली. त्यांच्याकडून भविष्यात निश्चितपणे आशा असतील. भारत आणि न्यूझिलंड सामन्यातही नेहमी चुरस पहायला मिळते. अगदी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतही ही चुरस बघायला मिळाली होती. या स्पर्धेत किवींकडून झालेला पराभव भारतीय संघ अजूनही विसरला नसेल. किवी संघात जागतिक दर्जाचे अनेक खेळाडू आहेत. त्यांची जिद्दही अफाट आहे. हे बघता कर्णधार रोहित शर्मा याला सर्वच आघाड्यांवर सरस कामगिरी करावी लागेल. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षणाखेरीज व्यूहनीतीतही त्याला आपले कौशल्य पणाला लावावे लागेल. या चारही स्तरावर उजवी कामगिरी झाली, तरी न्यूझिलंडला आपण नक्कीच पराभवाचा धक्का देऊ शकतो.
Previous Articleविधानपरिषद निवडणूकीसाठी माधव भंडारींना संधी मिळणार ?
Next Article जागतिक अर्थव्यवस्थेस पर्याय देणारी भागीदारी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








