सातारा :
सातारा नगरपालिकेच्यावतीने शहरातील रस्ते अतिशय चांगल्या स्वरुपाचे करण्यात येत आहे. परंतु काही ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण केल्या जात आहेत. त्यामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून जरंडेश्वर नाका ते सैनिकनगर या दरम्यानचे रस्ता रुंदीकरणाचे काम पालिकेच्यावतीने हाती घेतले आहे. या कामात दोन्ही बाजूकडून रेटारेटी सुरु असून काम बंद पाडण्याची भाषा होत आहे. त्यामुळे हे काम गेल्या चार दिवसापासून ठप्प आहे.
सातारा शहरात एन्ट्री करणारा महत्वाचा रस्ता म्हणून जरंडेश्वर नाका ते सैनिकनगर या रस्त्याकडेही पाहिले जाते. या रस्त्यावरुन अनेकदा वादंग निर्माण झालेला आहे. पालिकेच्यावतीने अनेकदा हा रस्ता करण्यात आलेला आहे. आताही हा रस्ता रुंद करण्याचे काम पालिकेने घेतले असून रस्ता १८ मीटर रुंदीचा दाखवण्यात आलेला आहे, असे सांगितले जात आहे. त्यानुसार रस्ता रुंदीकरण करताना दोन्ही बाजूकडून आमच्या बाजूकडे रुंदीकरण करायचे नाही, असा पवित्रा घेत काम करणाऱ्या कामगारांनाच काम बंद पाहण्याची भाषा वापरली जात असल्याचे समजते. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून हे काम ठप्प झालेले आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूस भराव टाकून रुंदीकरण करण्यात येत आहे. त्यामध्ये काही मध्येच पोल येत आहेत. काही बंगल्याचे बोर्ड अडथळा ठरत आहेत. यावरुन हे काम चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी सातारा पालिकेच्यावतीने प्रयत्न सुरु आहेत. परंतु या कामाला नेमका कोणाचा खो आहे, अशी चर्चा सातारा शहरात सुरु आहे.








