दहावीच्या इंग्रजी माध्यम पेपर तपासणीचे काम मराठी-कन्नड शिक्षकांच्या माथी
प्रतिनिधी/ बेळगाव
शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. लाखो रुपयांचे डोनेशन भरून पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यम शाळेत प्रवेश घेतात. परंतु, या इंग्रजी माध्यमाच्या पेपरची तपासणी मात्र मराठी व कन्नड विषयाचे शिक्षक करत आहेत. यामुळे पेपर तपासणीची प्रक्रिया योग्य प्रकारे होईल का? शिक्षकांना भाषेचे अधिकचे ज्ञान नसतानाही त्यांच्यावर पेपर तपासणीचे काम लादले जात असल्याने शिक्षण विभागाविरोधात नाराजीचा सूर उमटत आहे.
दहावी परीक्षेच्या पेपर तपासणीला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली. सध्या मराठी माध्यम विद्यार्थ्यांचे पेपर तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. अद्याप कन्नड माध्यमातील काही विषयांचे मूल्यमापन बाकी आहे. इंग्रजी माध्यमाच्या उत्तरपत्रिकांची संख्या दहा हजारांच्या आसपास आहे. परंतु, पेपर तपासणी करणाऱ्या शिक्षकांची संख्या अत्यल्प आहे. तसेच विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक पेपर तपासणीसाठी इच्छुक नसतात. त्यामुळे हे काम आता मराठी व कन्नड विषयाच्या शिक्षकांना करण्याची सूचना शिक्षण विभागाकडून केली जात आहे.
केवळ तोंडी आदेश
इंग्रजी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासण्याच्या तोंडी सूचना मराठी व कन्नड माध्यमाच्या शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. जिल्हाशिक्षणाधिकारी, नोडल ऑफिसर, तसेच इतर अधिकाऱ्यांकडून शिक्षकांना तोंडी आदेश देण्यात येत आहेत. काही शिक्षकांनी याबाबत लेखी आदेश द्या, अशी मागणी केली. परंतु, शिक्षण विभागाने लेखी आदेश टाळत केवळ तोंडी आदेश दिले आहेत.
खासगी व विनाअनुदानित इंग्रजी माध्यम शाळांच्या शिक्षकांनी पेपर तपासणीकडे दरवर्षीप्रमाणे दुर्लक्ष केले आहे. एक पेपर तपासण्यासाठी 21 ते 25 रुपये भत्ता दिला जातो. परंतु, जर पुनर्मूल्यांकनावेळी गुणांमध्ये वाढ झाल्यास त्या शिक्षकाला 500 रुपयांचा दंड भरावा लागतो. ही प्रक्रिया अत्यंत किचकट असल्यामुळे खासगी व विनाअनुदानित शिक्षक पेपर तपासणीपासून दूर रहात आहेत. त्यामुळे त्यांचे काम मराठी व कन्नड माध्यमाच्या शिक्षकांना करावे लागत आहे.
मराठी-कन्नड शिक्षकांवर सूचनावजा सक्ती
मराठी व कन्नड माध्यमाच्या शिक्षकांना एका मर्यादेतच इंग्रजीचे ज्ञान आहे. परंतु, पूर्णपणे इंग्रजी माध्यमाच्या उत्तरपत्रिका त्यांच्या हातात सोपविण्यात येत आहेत. मागीलवर्षी इंग्रजी माध्यमाच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम हे ऐच्छिक करण्यात आले होते. परंतु, यावर्षी मात्र सूचनावजा सक्ती केली जात असल्याने शिक्षकांमधून नाराजी आहे. तसेच पेपर तपासणी करताना इतर माध्यमांच्या शिक्षकांकडून चुका होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.









