प्रशासन की चालकाची बेपर्वाई, मृत्यु बाबत हळहळ, शोक, चर्चा, नाराजी आणि तर्कवितर्कही
प्रतिनिधी /वास्को
झुआरी पुलावरून कार नदीत कोसळून चौघांच्या झालेल्या मृत्यूने सबंध गोव्यातील जनतेला बसलेला धक्का आणि व्यक्त झालेली हळहळ काल दुसऱया दिवशीही दिसून आली. मात्र, या भिषण अपघाताला जबाबदार कोण? शासनाची तोकडी सुरक्षा की चालकाचा बेदरकार निष्काळजीपणा याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे. मयतांचा वाढदिवस साजरा करतानाच्या उत्साहातील एक व्हिडियो शुक्रवारी व्हायरल झाल्याने या चर्चेनेही वेगळेच वळण घेतलेले आहे. दरम्यान, अपघातातील चारही मयतांचे मृतदेह शवचिकित्सेनंतर शुक्रवारी त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.
बुधवारी मध्यरात्रीनंतर झुआरी नदीत कोसळलेली कार गुरूवारी दुपारी चारही मृतदेहांसह बाहेर काढण्यास यश आल्यानंतर ते दृष्य प्रत्यक्ष आणि विविध वृत्त वाहिन्यांच्या माध्यमांतून पाहून संबंध गोव्यात शोककळा पसरली. अशा प्रकारचा भिषण अपघात गोव्याने कधी पाहिला नव्हता. त्यामुळे गुरूवारी सकाळी पसरलेल्या या अपघाताच्या वृत्ताने गोव्यातील लोकांना धक्काच बसला. ध्यानीमनी नसताना घडलेल्या या अपघातामुळे लोटलीतील मयतांचे कुटुंबीय हादरले आहेत. शवचिकित्सेनंतर शुक्रवारी दुपारपर्यंत चारही मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. मयत महिला प्रिंसिला प्रुझ हिच्यावर शुक्रवारी दुपारी लोटलीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रिंसिला या राजकीय क्षेत्रात होत्या तसेच त्या कलाकारही होत्या. हरहुन्नरी व्यक्ती म्हणून त्या परीचित होत्या. अनेकांनी तीच्या भिषण मृत्यूबाबत शोक व्यक्त केला.
चालकाची बेपर्वाई की प्रशासनाचा निष्काळजीपणा
या भिषण अपघाताबाबत काल दुसऱया दिवशीही हळहळ व्यक्त होताना दिसून आली. हळहळ आणि शोक व्यक्त करतानाच या अपघाताबाबत अनेक तर्कविर्तक व्यक्त होऊ लागलेले आहेत. या अपघाताला जबाबदार कोण, प्रशासनाचा सुरक्षेबाबतचा निष्काळजीपणा की वाहतुकीतील आजकालची बेदरकार, बेपर्वा व निष्काळजीवृती असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. दारूच्या नशेत तर हा अपघात घडलेला नसावा ना या मुद्दय़ाकडेही या अपघाताची चर्चा वळलेली आहे. वाढदिवस घरीच उत्साहात साजरा करतानाचा एक व्हिडियोही समाज माध्यमांवर वायरल झालेला असून त्या व्हिडियोनेही लोकांच्या मनामध्ये नकारार्थी भावना निर्माण केलेल्या आहेत. अपघातामुळे धक्का बसलेल्या आणि हळहळ व्यक्त करणाऱया लोकांमध्ये नाराजीही पसरलेली आहे. मध्यरात्री वाढदिवस साजरा केल्यानंतर त्याच आवेषात नको त्या वेळी भरधाव घराबाहेर पडण्याची कृतीच त्या चौघांच्या जीवावर बेतल्याच्या प्रतिक्रीया आता उमटू लागलेल्या असून मध्यरात्रीनंतर रस्त्यांवरून धावणाऱया वाहनांवर कडक नियंत्रण ठेवण्याची मागणी लोकांमधून व्यक्त होत आहे. अशाच प्रकारे कार नाल्यात कोसळण्याचा प्रकार झुआरी पुलावरील घटनेला चोवीस तास उलटल्यानंतर वास्को दाबोळीतील महामार्गावरही शुक्रवारी पहाटे घडला आहे. युवकांची ही बेदरकार वाहतुक सुदैवाने या कारमधील चारपैकी एकाही युवकाच्या जीवावर बेतलेली नाही. अशा प्रकारच्या अपघातांना जबाबदार कोण हा प्रश्न त्यामुळेच उपस्थित झालेला आहे.
झुआरी पुलावरील वाहतुकीच्या असुरक्षेततेवर शिक्कामोर्तब
निष्काळजीपणे आणि बेदरकारपणे आणि काही वेळा मध्यप्राशन करून वाहने हाकण्याने वारंवार अपघात घडत असतात हे सत्य असले तरी प्रशासकीय निष्काळजीपणावरही काही कडवट प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. झुआरीचा सध्या वापरात असलेला पुल कमकुवत असल्याचे गोव्याला माहित आहे. या पुलाचे कठडे किती असुरक्षीत आहेत याची कल्पना यापूर्वीही छोटय़ा अपघातांनी आली होतीच. आता कार कोसळून चौघांचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रश्न अधिक गहन बनलेला आहे. या पुलावरील रस्त्याची स्थितीही ओबडधोबड असून चार चाकी आणि दुचाकी वाहनांना या पुलावर धक्क्यावर धक्के खात अंतर कापावे लागते. काही वेळा वाहने या धक्क्यांमुळे वेगळीकडे वळत असतात व उसळीही घेत असतात. या पुलाची सद्यस्थिती पाहता हा पुल वाहतुकीसाठी असुरक्षीतच असल्याचे जाणवत आहे. प्रशासनाला या स्थितीचे फारसे गांभीर्य असल्याचे दिसत नसल्याने जनतेमधून येता जाता नाराजी व्यक्त होत असते. रात्रीच्या वेळी या पुलावर पोलीस गस्त असायला हवीत. या पुलाखालीच पोलीस स्थानक आहेत. त्यामुळे नियंत्रण ठेवणे सहज शक्य आहे. मात्र, झुआरीवरील या पुलावरील वाहतुकीला अती स्वातंत्र मिळालेले असल्याचे दिसून आलेले आहे. कडक नियंत्रण असते तर बुधवारी मध्यरात्री घडलेला तो भिषण अपघात कदाचित घडलाही नसता.
वाहतुक कोंडीमुळेही पुलाला धोका, मार्ग काढण्याची गरज
या पुलावर वाहतुक कोंडीची समस्याही नित्याचीच झालेली आहे. गुरूवारी अपघातामुळे या पुलावर वाहतुक नियंत्रीत ठेवताना पोलिसांच्या नाकी नऊ आले. या पुलावर एकाच वेळी अनेक वाहनांची गर्दीही धोकादायक मानले जात आहे. तरीही वाहतुक कोंडीच्या प्रसंगी या पुलाला वाहतुकीचा वाहनांचा ताण मोठय़ा प्रमाणात सहन करावा लागतो. गुरूवारी वाहतुक नियंत्रणात ठेवण्यासाठी कसरत करावी लागलेल्या वाहतुक पोलिसांना त्या अपघाताने निर्माण केला ताण कमी झाल्याने शुक्रवारी दुपारपर्यंत हायसे वाटले. मात्र, संध्याकाळी पाचच्या सुमारास वेर्णापासून आगशीपर्यंत वाहतुक कोंडी झाल्याने पोलिसांवरील ताण वाढला आणि लोकांनाही तासभर रस्त्यावरच तिष्ठत राहवे लागले. सध्या झुआरीवरील नवीन पुलाच्या कामामुळे तसेच काही वेळा पुलावरील छोटय़ा छोटय़ा अपघातांमुळेही गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर वाहतुक कोंडी होत आहे. या समस्येवरही मार्ग काढण्याची गरज व्यक्त होत आहे.
सरकार सुरक्षेची काळजी घेत आहे, प्रत्येकाने जीवाची काळजी घेणेही तितकेच महत्वाचे
राज्याचे वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांनी शुक्रवारी दुपारी झुआरी पुलावरील अपघाताविषयी प्रतिक्रीया व्यक्त करताना प्रत्येकाने जर स्वताच्या जीवाची काळजी घेत वाहने चालवल्यास भिषण अपघाताला सामोरे जाण्याची वेळ येणार नसल्याचे स्पष्ट करून सरकार आपल्यापरीने सुरक्षेची काळजी घेत असून वाहन चालकानीही जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले. झुआरी पुलावरून कार कोसळण्याची घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून आपल्याला अतीव दुख होत आहे. मानवी जीवन मौल्यवान आहे. प्रत्येकाने काळजी घ्यावी हाच योग्य तोडगा आहे. सरकार सर्व ती काळजी घेत आहे. गोव्यातील रस्त्यांवर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून वाहतुक खाते आणि पोलीस खात्याच्या समन्वयाने अडीच कोटी रूपये खर्चून सीसीटीव्हीची गस्त ठेवण्यात येणार आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहतुकीत शिस्त आणि वेगावर नियंत्रण राहिल. झुआरीचा नवीन पुल येत्या डिसेंबरपर्यंत खुला करू. त्यानंतर वाहतुकीची समस्या राहणार नाही. कोविडच्या समस्येमुळेच पुलाचे काम लांबणीवर पडले. सुरक्षेबाबत कोणतीच तडजोड नको म्हणूनच या कामासाठी अधिक वेळ देण्यात आलेला आहे. सुरक्षा महत्वाची आहे असे मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले.









