रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य : वाहनधारक-विद्यार्थीवर्गाचे हाल : प्रशासनाचे दुर्लक्ष
वार्ताहर/किणये
प्रशासनामार्फत ग्रामीण भागाच्या विकासाकरिता अनेक योजना राबविल्या जातात. अलीकडच्या काळात ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी विशेष निधी मंजूर करण्यात येत आहे. रस्ते विकासाची कामे तालुक्याच्या काही भागात जोमाने सुरू आहेत. मात्र मंडोळी ते खादरवाडी या संपर्क रस्त्यासाठी प्रशासनाकडून निधी मंजूर होत नाही का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. कारण गेल्या चार वर्षापासून या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. प्रशासनाचे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागातील मंडोळी-खादरवाडी हा संपर्क रस्ता अनेक गावांसाठी महत्त्वाचा आहे. या रस्त्यावर रोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मात्र खड्डेमय रस्त्यामुळे वाहनधारक अक्षरश: वैतागून गेलेले आहेत. प्रशासनाचे अधिकारी या रस्त्याकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. या रस्त्याला वाली कोण? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.
संपर्क रस्त्यावर खड्डेच खड्डे
खादरवाडी, मंडोळी, हंगरगा, सावगाव, बेनकनहळळी, बोकनूर, यळेबैल, बेळगुंदी, बेळवट्टी, राकसकोप आदी गावातील वाहनधारकांची या रस्त्यावर रोज वर्दळ असते. तसेच या भागातील दूध संकलन केंद्राची वाहने या रस्त्यावरून ये-जा करीत असतात. राकसकोप-बेळगुंदी भागातील बहुतांशी तरुण मुद्दाम येथील कारखान्यांमध्ये कामाला जातात. या भागातील सदर कामगार वर्ग उद्यमबागला मंडोळी-खादरवाडी या संपर्क रस्त्यावरूनच येतात. खादवाडी येथे मराठा मंडळची शाळा आहे. या भागातील विद्यार्थी या शाळेला येतात. मात्र त्यांनाही खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागतो आहे.
मंडोळी-सावगाव पुलावरील रस्ता खराब
मंडोळी गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून हंगरगे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही खड्डे पडलेले आहेत. मंडोळी-सावगाव या संपर्क रस्त्यावरील पुलाच्या ठिकाणी रस्ता धोकादायक बनला आहे. या पुलाच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. किरकोळ अपघाताच्या घटनाही घडलेल्या आहेत.
रस्त्याची त्वरित दुरुस्ती करा
सहा वर्षांपूर्वी मंडळी ते खादरवाडी रस्त्याचे डांबरीकरण केले होते. मात्र अवघ्या दोन वर्षातच रस्त्यावर खड्डे पडले. तेव्हापासून रस्त्याची दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. दुरुस्तीसाठी कोणीही पुढाकार घेत नाही याची खंत वाटत आहे. वाहनधारकांसाठी हा महत्त्वाचा संपर्क रस्ता आहे. मंडोळी व खादरवाडी गावातील नागरिकांच्या या रस्त्याच्या आजूबाजूलाच शेतजमिनी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रोज शिवारात जावे लागते. खड्ड्यांमुळे शेतकरी वर्गालाही या रस्त्यावरील वाहतूक अवघड बनली आहे. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी.
– आप्पाजी दळवी, मंडोळी










