नातेवाईकांचा डॉक्टर-वैद्यकीय पथकावर आरोप : बिम्स प्रशासन कचाट्यात : गेल्या वर्षभरात दहा बाळंतिणींचा मृत्यू
बेळगाव : सुलभ प्रसूतीसाठी उत्तर कर्नाटकात नामवंत असलेल्या काही रुग्णालयांपैकी बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्थेचा (बिम्स) उल्लेख नेहमीच करण्यात येत असतो. मात्र, अलीकडील काही दिवसांत बिम्समध्ये गर्भवती, बाळंतिणी व नवजात बालकांच्या मृत्यूच्या घटनांमुळे बिम्सला काळीमा लागली आहे. बिम्समधील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर आरोप होत असल्याने सर्वच हतबल झाले आहेत. राज्यातील सर्वात मोठा जिल्हा अशी बेळगाव जिल्ह्याची ओळख असल्याने येथे वैद्यकीय सुविधाही उत्तमरीतीने असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे बेळगाव जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्र, गोवा व सीमाभागातूनही वैद्यकीय उपचारांसाठी रुग्ण बिम्सकडे येत असतात. अलीकडच्या दिवसात बिम्समध्ये बाह्यारुग्णांची संख्याही वाढली आहे. बिम्समधील प्रसूती विभाग तर कायमच भरलेला असतो. बाळंतपणासाठी गर्भवती अधिक प्रमाणात दाखल होत असल्याने प्रसूती विभागातील खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे. मात्र, अतिरक्तदाब, कमी रक्तदाब, इन्फेक्शन, रक्तहीनता यासारख्या तक्रारी असलेल्या गर्भवती बिम्समध्ये प्रसूतीसाठी दाखल होत असल्याने त्यांची प्रसूती घडविणे बिम्समधील डॉक्टरांना अनेकदा आव्हानात्मक ठरते.
प्रसूतीकाळात मृत्यू झाल्यास रुग्णाचे नातेवाईक डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दोष देत राहतात. त्यामुळे बिम्समधील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना टीकेला सामोरे जातच वैद्यकीय सेवा द्यावी लागत आहे. गर्भवतींवर उपचार करण्यासाठी डॉक्टर व त्यांचे पथक अनेकदा कचरतही असते. मात्र, प्रसूती घडविणे ही त्यांची जबाबदारीच असते. बिम्समध्ये गेल्या वर्षभरात दहा, सहा महिन्यांत चार बाळंतिणींचा मृत्यू झाला आहे. यापैकी काही बाळंतिणींनी गर्भावस्थेत खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. पण तेथील वैद्यकीय खर्च वाढल्यामुळे सरकारी रुग्णालयात म्हणजेच बिम्समध्ये प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. ही बाब सामोरी आली आहे किंवा अनेक गर्भवती रक्तहीनता, रक्तदाब, इन्फेक्शन यासारख्या तक्रारी असताना प्रसूतीसाठी दाखल झालेल्या असतात. त्यांच्यावर प्रसूती घडवित असताना काहीवेळा डॉक्टर हतबल ठरत असतात. प्रसूती घडली, गर्भवतीने अपत्याला जन्म दिला, मात्र बाळंतिणीचा मृत्यू झाला, असे प्रकार बिम्समध्ये घडले आहेत. गर्भवतींवर उपचार करणे डॉक्टरांना जोखमीचे असताना दुर्दैवाने मृत्यू झाल्यास नातेवाईक, डॉक्टर व वैद्यकीय पथकावर खापर फोडतात, अशी तक्रार बिम्सच्या प्रसूती विभागातून होत आहे.
बिम्सच्या माता-बालक उपचार विभागात वर्षभरात 7,543 प्रसूती
बिम्सच्या माता-बालक उपचार विभागात गेल्या वर्षभरात 7,543 प्रसूती घडविण्यात आल्या आहेत. यापैकी 3499 गर्भवतींवर नैसर्गिक प्रसूती व 4044 गर्भवतींवर शस्त्रक्रियेद्वारे (सिझेरियन) प्रसूती घडविण्यात आली आहे. बिम्समध्ये गेल्या वर्षभरात प्रसूती घडविण्यात आलेल्या महिलांमध्ये परजिल्ह्यातील महिलांचाही समावेश आहे.
डॉक्टर-वैद्यकीय कर्मचारी दखल घेत नाहीत…
गर्भवतींना प्रसूतीसाठी बिम्सकडे वेळेत घेऊन आले तरी तेथील डॉक्टर असोत किंवा वैद्यकीय कर्मचारी दखल घेत नाहीत. प्रसूतीच्यावेळी गर्भवतीवर कोणते उपचार करणार, याची माहिती देत नाहीत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच आतापर्यंत काही गर्भवतींचा मृत्यू झाला आहे. बिम्सचे प्रशासन व आरोग्य खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे, अशी जनतेची मागणी आहे.
नागरिकांनी सत्य परिस्थिती जाणून घेणे महत्त्वाचे…
बिम्सच्या प्रसूती विभागात डॉक्टरांसह 20 कर्मचारी कार्यरत आहेत. बाळंतपणासाठी गर्भवतींना दोन दिवस अगोदर घेऊन आल्यास त्यांची वैद्यकीय तपासणी करून बाळंतपण सुलभपणे घडवून आणणे डॉक्टरांना शक्य होते. मात्र, काही गंभीर समस्या असल्यास त्यावर उपचार करून प्रसूती घडविणे डॉक्टरांना अनेकदा आव्हानात्मक ठरते. गर्भवतींना प्रसूतीच्यावेळी कोणताही अपाय होऊ नये यासाठी डॉक्टर प्रयत्नशील असतात. प्रसूती घडवून आणण्यासाठी प्रयत्नांची शिकस्तही करत असतात. पण काहीवेळेला यश येत नाही. मात्र, नातेवाईक बिम्स प्रशासन व डॉक्टरांवर दोष देत राहतात. नागरिकांनी सत्य परिस्थिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे, असे बिम्समधील डॉक्टरांचे म्हणणे आहे.









