कोल्हापूर :
जिह्याचे आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) ताब्यात ठेवण्यासाठी विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्ताधारी आणि विरोधी आघाडीने कंबर कसली आहे. आमदार हसन मुश्रीफ यांनी गोकुळमधील राजकारणात पाच वर्षे बदल नाही, आमदार सतेज पाटील यांच्यासोबतचा फॉर्म्युला कायम राहील, असे स्पष्ट केले आहे. मात्र, नव्या मंत्रिमंडळात भाजप–शिवसेना कोट्यातून मंत्री कोण होणार? पालकमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, यावरच गोकुळ दूध संघाचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.
मागीलवेळी गोकुळमध्ये दिवंगत पी. एन. पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता होती. गोकुळच्या त्यावेळच्या सत्तासंघर्षात आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, प्रा. संजय मंडलिक विरोधी आघाडीची धुरा सांभाळली. हे तिघे नेते गोकुळ मल्टिस्टेट करण्याच्या मुद्यावर एकत्र आले होते. जिह्याचे आर्थिक सत्ताकेंद्र ताब्यात ठेवणे, या एकाच उद्देशाभोवती गोकुळची निवडणूक लढली गेली. 2019 च्या महाविकास आघाडी शासन काळात कॅबिनेट मंत्री म्हणून हसन मुश्रीफ तर राज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून सतेज पाटील यांची वर्णी लागली. याचा थेट परिणाम गोकुळच्या निवडणुकीवर झाला होता. सत्ताधारी आघाडीला बाजूला करुन सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी गोकुळमध्ये एकतर्फी सत्ता स्थापन केली.
गोकुळमध्ये सत्तांतर होऊन तीन वर्षे झाली. या काळात जिह्यातून अंदाजे 1 हजार नवीन दूध संस्थांची नोंदणीसाठी मागणी दुग्ध विभागाकडे आली आहे. शासनाकडे नोंदणी झाल्यानंतर संबंधित दूध संस्था मतदानाच्या तारखेपूर्वी दूध संघाकडून तीन वर्षे मान्यता मिळाली पाहिजे. त्यामुळे या नव्या संस्थांची नोंदणी होऊ नये, यासाठी राज्यातील बड्या नेत्यांच्या आदेशानुसार नवीन नोंदणी थांबली होती. गोकुळमध्ये 300 दूध संस्था नवीन मतदार सभासद झाल्यानंतर सत्तेचे होकायंत्र हव्या त्या दिशेला वळू शकते. संघाचे शासनाचे लेखापˆrक्षण पूर्ण झाले असले त्याचा अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही. प्रकरण न्यायप्रविष्ठ होते. लेखापरीक्षण हा मुद्दा अडचणीचा होऊ नये, यासाठी गोकुळच्या कारभाऱ्यांचा प्रयत्न राहील. तर याआधारे गोकुळवर प्रशासक आणण्याचे स्वप्न विरोधी आघाडीचे असू शकते.
राज्य मंत्रिमंडळात आमदार हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार राजेंद्र पाटील–यड्रावकर ही नावे चर्चेत आहेत. आमदार विनय कोरे यांची गोकुळबाबतची भविष्यातील भूमिका अद्याप स्पष्ट नाही. आमदार मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांच्यासोबतच फॉर्म्युला पाच वर्ष राहणार असल्याचे जाहीर केले आहे. तर आमदार सतेज पाटील यांना विधानसभा निवडणुकीतील राजकारणामुळे विरोध म्हणून प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर, राजेंद्र पाटील यड्रावकर, चंद्रदीप नरके यांची भूमिका गोकुळमध्ये विरोधाची राहू शकते. त्यास खासदार धनंजय महाडिक आणि माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांचे पाठबळ असेल. त्यामुळे गोकुळच्या राजकारणात मंत्रिमंडळात कोण? कोल्हापूरचा पालकमंत्री कोण असणार ? याला मोठे महत्व येणार आहे.
चेअरमनपदासाठी फिल्डींग
विश्वास पाटील यांना पहिले दोन वर्षे चेअरमनपदाची संधी आघाडीने दिली. 10 मे 2023 रोजी विश्वास पाटील राजीनामा देऊन, त्यांच्या जागी अरुण डोंगळे यांची निवड झाली. मे महिन्यांत अरुण डोंगळे यांची दोन वर्षाची मुदत संपणार आहे. शेवटचे वर्ष निवडणुकीचे वर्ष असल्याने या पदावर तितकाच दमदार व्यक्ती असावा, असा प्रयत्न असेल. चेअरमनपदाची खांदापालट करायची ठरली तर काठावरचे बहुमत असल्याने सत्ताधारी आघाडीला रिस्क घ्यावी लागणार आहे. त्यामुळे अरुण डोंगळेंना मुदतवाढ मिळणार? की अनुभवी ज्येष्ठ संचालक असलेल्या विश्वास पाटील यांच्याकडे धुरा सोपवणार? की बदलत्या राजकारणात नवी समीकरणे जोडावी लागणार असल्याने डॉ. चेतन नरके यांना संधी मिळणार? किंवा याशिवाय नवीन तगडा चेहरा पुढे येणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.








