अध्याय अकरावा
बाप्पा म्हणाले, प्रत्येकाला त्याच्या प्रारब्धानुसार जन्म व कर्मे लाभतात. वाट्याला आलेली कर्मे हीच प्रत्येकाची कर्तव्ये असून ती उत्तम प्रकारे पार पाडणे हाच त्याचा स्वधर्म होय. ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने अनुकूल पार्श्वभूमी लाभते. तिचा स्वीकार करून मिळालेलं कर्म आवडीने करून जो ते ईश्वराला अर्पण करेल त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. प्रारब्धानुसार वाट्याला आलेलं कर्म करण्यासाठी आवश्यक ते कौशल्य ईश्वराने प्रत्येकाला जन्मजात दिलेलं असतं किंवा ते प्राप्त करण्याचा मार्गही तो दाखवत असतो. म्हणून प्रत्येक भक्तानं, स्वत:च्या डोक्यानं वेगळं काहीही न करता प्राप्त परिस्थिती स्वीकारून ईश्वराने दिलेलं कर्म करावं आणि ते ईश्वराला अर्पण करावं म्हणजे तो कर्मबंधनातून मुक्त होत जातो. जिवंतपणीच मोक्षस्थिती अनुभवतो आणि अंती त्याचा आत्मा ईश्वरस्वरूपात विलीन होतो.
भक्तीचा हा सुलभ म्हणजे सहजी आचरण्यासारखा राजमार्ग असून याचा जो भक्त स्वीकार करेल त्याचे आयुष्य विनाकटकटीचे, साधे व सोपे होऊन जाईल. त्याने कोणत्याही अपेक्षेविना केलेली कामे हीच ईश्वराची आराधना असते. जे काम वाट्याला येईल ते ईश्वराचेच काम असल्याने त्यात श्रेष्ठ-कनिष्ठ, उच्च-नीच असा कोणताही भेदभाव ईश्वर करत नाही. प्रत्येकाची अशी मानसिकता तयार व्हावी या उद्देशाने मी गणेशगीता सांगितली आहे. मी पहिल्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे आत्म्याचं परमात्म्याशी मिलन हा सर्वोत्तम योग असून प्रत्येकानं हा उत्तम योग साधण्याचा प्रयत्न करावा अशी माझी इच्छा आहे. सर्वांनाच आपापला उद्धार करून घेण्याचा सारखाच अधिकार ईश्वराने प्रत्येकाला दिलेला आहे. बाप्पांना वरेण्या राजाला जे जे काही सांगायचं होतं ते ते सर्व आता सांगून झालेलं असल्याने ते पुढील श्लोकात म्हणतायत की, राजा माझी तुझ्यावर कृपा आहे म्हणून हा उत्तम योग तुला सांगितला. पुढील भागात बाप्पांनी केलेल्या उपदेशाचा शेवटचा श्लोक आपण अभ्यासूयात.
इति ते कथितो राजन्प्रसादाद्योग उत्तमऽ ।
सांगोपांगऽ सविस्तारोऽ नादिसिद्धो मया प्रिय ।। 35 ।।
अर्थ- हे प्रिय राजा, या प्रकारे मी प्रसन्न झाल्यामुळे अंगे व उपांगे यासह, विस्तारयुक्त व अनादिसिद्ध असा उत्तम योग मी तुला सांगितला.
विवरण- बाप्पा म्हणाले, उत्तम योग नक्की कशाला म्हणतात इथून मी सुरवात केली होती आणि तो साधण्यासाठी काय काय करायला हवं ते ते सर्व मी तुला सविस्तर सांगितलं. ‘मी आणि माझं’ ह्यावर प्रत्येक माणसाचा जोर असतो पण गणेशगीतेच्या अभ्यासानं मीपणा विसरुन केवळ तू आहेस आणि हे सर्व तुझं आहे असा ईश्वराविषयीचा विचार बळकट व्हायला हवा. हा विचार बळकट होण्यासाठी प्रपंच, प्रारब्ध आणि उपाधी यातून मुक्त होणं आवश्यक आहे. माउली म्हणतात, मी माझे ऐसी आठवण । विसरले ज्याचे अंत:करण । पार्था तोचि संन्यासी जाण । निरंतर। माउलीचे सांगणे नेहमी लक्षात ठेवावे. असा मनुष्य कायम समाधीत असतो.
सकाळी उठल्यापासून आपल्याला अनेक गोष्टी दिसत असतात. त्याला अनुसरून आपल्या मनात विचार येत असतात व त्यानुसार आपली प्रतिक्रिया होत असते. इतरही काय करतायत हेही आपल्याला समजत असते. या सर्वाचा परिणाम म्हणून आपल्या चित्तात काम, क्रोध, लोभ वगैरे विकार किंवा दया, क्षमा, शांती, प्रेम आदि भावना निर्माण होत असतात. याला समोर घडणारी गोष्ट समजून घेणे व कृती करणे असे म्हणतात. प्रत्येक माणसाचा स्वभाव किंवा चित्तवृत्ती वेगवेगळी असल्याने प्रत्येकजण समोरची घटना त्याच्या त्याच्या स्वभावानुसार समजून घेऊन त्यावर प्रतिक्रिया देतो. त्यामुळे एकाच घटनेवर निरनिराळ्या प्रतिक्रिया लोक देत असतात.
क्रमश:








