सातारा :
वाई पोलीस ठाण्यातील सामूहिक अत्याचार गुन्ह्यात लाच मागितल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बिपीन चव्हाण व पोलीस हवालदार उमेश गहीण यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. या कारवाईने जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांवर कारवाई केली असली तरी खरा सुत्रधार कोण हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण व पोलीस हवालदार गहीण यांना लाच मागण्यास कुणी पाठबळ दिले. याच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी डोळ्यावर पट्टी बांधून अधिकारी व कर्मचारी यांना पाठीशी घातले का? याची चौकशी पोलीस अधीक्षक तुषार दोशी करणार का? असा सवाल लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून होत आहे.
पोलीस ठाण्यात टाचणी जरी पडली तरी पोलीस अधीक्षकांच्या आधी पोलीस निरीक्षकांना खबर असते. परंतु वाई पोलीस ठाण्याच्या बाबतीत वेगळे चित्र दिसत आहे. याच पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बिपीन चव्हाण व पोलीस हवालदार उमेश गहीण यांनी सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यास आलेल्या तरूणीची तक्रार दाखल न करता थेट तिच्या मोबाईलमध्ये असलेल्या पुरुषांचे फोन नंबर घेतले. त्यांना अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत मारहाण करून पैसे उकळले. यातील एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करताच थेट कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईने पुन्हा पोलीस दलातील हप्तेखोरी चव्हाट्यावर आली आहे. एकीकडे पोलीस अधीक्षक दोशी यांनी पदभार स्वीकारताच महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात ठोस पावले उचलणार, दोषारोपपत्र तात्काळ दाखल करणार असे सांगून महिलांना सुरक्षितेचे आश्वासन दिले. परंतु या आश्वासनाला पोलीस उपनिरीक्षक चव्हाण व पोलीस हवालदार गहीण यांनी तडा देऊन मनमानी कारभार सुरू असल्याचे दाखवून दिले.
- लाचखोरीला पाठबळ कुणाचे?
प्रत्येक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे सर्वेसर्वा असतात. परंतु वाई पोलीस ठाण्याचे सर्वेसर्वा नक्की कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. जितेंद्र शहाणे हे पोलीस निरीक्षक असतानाही पोलीस ठाण्यात काय घटना घडतेये हे त्यांना कळले का नाही. फक्त सामूहिक अत्याचाराच्या गुन्ह्यातच नव्हे तर इतर गुन्ह्यातही लाचेची मागणी होत असणारच असा अंदाज अनेकांकडून वर्तविला जात आहे. या इतर गुन्ह्यातील खाबुगिरीला पोलीस निरीक्षक शहाणेंनी वेळीच पायबंद घातला असता तर सामूहिक अत्याचाराच्या गुन्ह्यात लाच मागण्याचे धाडस चव्हाण व गहीण यांनी केले नसते. परंतु याला नकळत पोलीस निरीक्षक शहाणेंचे पाठबळ असल्याची चर्चा होत असल्याने पोलीस अधीक्षक दोशी त्यांच्यावर काय कारवाई करणार याकडे सगळ्याचे लक्ष वेधले आहे.








