ऑनलाईन टीम / तरुण भारत :
डीएचएफएल आणि येस बँक कर्ज गैरव्यवहारप्रकरणी गुरुवारी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना मुंबई CBI ने अटक केली.
कोण आहेत हे अविनाश भोसले?
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि पुणे, मुंबई, कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध असलेल्या ABIL ग्रुपचे मालक अशी त्यांची ओळख. महाराष्ट्रातील प्रत्येक राजकारण्यांशी जवळचे संबंध असलेले आणि काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांचे ते सासरे. अविनाश भोसले ही कोणी साधीसुधी व्यक्ती नाही. अमेरिकेतल्या व्हाईट हाऊससारख्या भल्या मोठ्या बंगल्यात राहणारी आणि स्वतःच्या मालकीची तीन हेलिकॉप्टर असलेली ही व्यक्ती…
रिक्षाचालक ते प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक
अविनाश भोसले यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील तांबवे. वडिलांच्या नोकरीच्या निमित्तानं ते अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरला गेले. त्यांचे वडील जलसंपदा विभागात अभियंता म्हणून कामाला होते. दरम्यानच्या काळात अविनाश भोसले रोजगाराच्या शोधात संगमनेरमधून पुण्यात आले. पुण्यात आल्यावर त्यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. रास्ता पेठ भागात ते भाड्याच्या घरात राहायचे होते. काही दिवसानंतर त्यांनी रिक्षा भाड्यानं देण्याचा व्यवसाय सुरू केला. पुढे भोसलेंची ओळख बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी झाली. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील काहींच्या माध्यमातून त्यांना रस्त्याची कंत्राटं मिळू लागली. 1979 मध्ये त्यांनी ABIL ग्रुपची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी बांधकाम क्षेत्रात आपले पाय मजबूत करण्यास सुरुवात केली. शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये 1995 साली कृष्णा खोरे विकास महामंडळाची कामं मिळाल्याने त्यांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने वळण मिळाले. पुण्यातील बाणेरमध्ये भोसलेंचा व्हाईट हाऊस हा भलामोठा बंगला आहे. या बंगल्याच्या टेरेसवर हेलिपॅड असून, भोसलेंच्या मालकीची तीन हेलिकॉप्टरदेखील आहेत. अनेक राजकीय पक्षांचे पुढारी आपल्या प्रचारासाठी हे हेलिकॉप्टर वापरतात. राजकारण्यांना वापरासाठी हेलिकॉप्टर पुरवणं, ही अविनाश भोसले यांची अभिनव कल्पना असल्याचं जाणकार सांगतात.
अविनाश भोसले यांची 40.34 कोटींची संपत्ती ईडीने मागील वर्षी जप्त केली होती. तसेच व्यावसायिक भागीदारांवर देखील छापे टाकण्यात आले होते. डीएचएफल आणि येस बँक कर्ज गैरव्यवहारप्रकरणी भोसले यांच्यावर सीबीआयनं ही कारवाई केली. दरम्यान, भोसले यांचेवर सीबीआयनं अटकेची कारवाई करण्यापूर्वी 30 एप्रिल रोजीही त्यांच्या निवस्थानावर छापे टाकल्याची प्राथमिक माहिती आहे.








