सिंह हा वनाचा राजा असतो, अशी मान्यता आहे. तथापि, छत्तीसगमधील एका वनप्रदेशात वनाचा राजा सिंह नव्हे, तर नागसाप मानला जातो. या राज्यातील कोरबा जिल्ह्यातील पसरखेत येथे हे वैशिष्ट्यापूर्ण वन आहे. नागराज किंवा किंग कोब्रा हा अलिकडच्या काळात दुर्मिळ बनत चाललेला एक अतिविषारी साप आहे. या वनात त्याचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. तो छत्तीसगड राज्याच्या सरगुजा आणि रायगढ येथील वनप्रदेशांमध्येही आढळून येतो. याची सरासरी लांबी 18 फूट इतकी असते. भारतातील कोणत्याही अन्य राज्यांमध्ये इतक्या मोठ्या लांबीचे नागराज आढळून येत नाहीत. त्यामुळे त्याला वनराज असे येथे संबोधले जाते..
या नागराजाचे वास्तव्य या वनप्रदेशात लक्षावधी वर्षांपासून आहे, असे असले तरी त्याच्या अभ्यासाला प्रारंभ 1836 मध्ये करण्यात आला. त्यापूर्वी या प्रकारच्या सापांना ऑफियोफॅगस हन्ना या प्रजातीतील मानण्यात होते. तथापि, नंतरच्या काळात त्यांच्या डीएनएचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासावरुन ही सर्पप्रजाती स्वतंत्र असल्याचे आढळून आले. याच्या चार प्रजाती आहेत. त्यांची नावे नॉर्दर्न, सुंडा, वेस्टर्न घाट आणि लूनोज अशी आहेत. या चारही प्रजाती जवळपास समानच असल्या, तरी लांबी, रंग आणि विषाची तीव्रता यांच्या संदर्भात त्यांच्यात भिन्नत्व आहे. नागराज या प्रकारात मोडणारा हा सर्प अत्यंत विषारी असून कोणत्याही सजीव प्राण्याचा तो चावला, तर त्याचा मृत्यू काही मिनिटांमध्ये होतो. माणसाला तो चावल्यास उपचार करण्यास वेळही मिळत नाही, एव्हढे या नागराजाचे विष तीव्र आहे. हे नागराज भारताव्यतिरिक्त अन्य देशांमधे फारसे आढळत नाहीत असे संशोधकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ते भारताचे आणि छत्तीसगड राज्याचे वैशिष्ट्या म्हणून ओळखले जातात. त्यांना पाहण्यासाठी या वनप्रदेशात पर्यटकांनी गर्दी जमते. वस्तुत: अशी गर्दी वाघ, सिंह किंवा हत्ती अशा प्राण्यांना बघण्यासाठी होत असते. पण या वनात असे मोठे आणि आकर्षक प्राणी असतानाही येथे गर्दी जमते ती या नागराजाचे दर्शन घेण्यासाठी असते. त्यामुळेच त्याला या वनप्रदेशाचा राजा असेच संबोधण्याची पद्धती आहे.
आजही या नागराजाची सर्व रहस्ये उलगडलेली नाहीत. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन केले जात आहे. सध्या गोवा नेचर या संस्थेचे काही संशोधक आणि प्राणीप्रेमी या नागराजावर संशोधन करीत असून भारत सरकारने 1973 च्या सूचीनुसार या नागराजाला अग्रकम दिला आहे. तसेच संरक्षित प्रजाती म्हणून मान्यता मिळालेली आहे. छत्तीसगड पर्यटनाचा आधार अशी त्याची ख्याती आहे.









