निरोगी भारतासाठी महत्त्वपूर्ण योगदान ः पंतप्रधान, आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदन
जिनिव्हा, नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतातील आशा वर्कर्सना ‘डब्ल्यूएचओ’द्वारे (जागतिक आरोग्य संघटना) ‘ग्लोबल हेल्थ लीडर्स पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. देशाच्या ग्रामीण भागात थेट आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल आणि कोरोनाकाळात साथीच्या आजारावर लगाम घालण्यात सक्रिय भूमिका निभावल्याबद्दल सर्व दहा लाख महिला आशा स्वयंसेविकांना गौरवित करण्यात येणार आहे. या सन्मानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी त्यांचे अभिनंदन करत आशा वर्कर्सनी निरोगी भारताच्या योगदानात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनीही आशा स्वयंसेविकांच्या कामाचे कौतुक केले.
डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस ऍधानोम गेब्रेयसस यांनी रविवारी जागतिक आरोग्याच्या प्रगतीसाठी उत्कृष्ट योगदान, प्रादेशिक आरोग्य समस्यांबाबत नेतृत्व आणि वचनबद्धता दाखविण्यासाठी सहा पुरस्कारांची घोषणा केली. याप्रसंगी आशा वर्कर्सच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच आशा कर्मचाऱयांच्या संपूर्ण टीमला डब्ल्यूएचओ महासंचालकांद्वारे ग्लोबल हेल्थ लीडर्स पुरस्काराने सन्मानित केल्याने आनंद झाला, असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले.
भारतात ‘मान्यताप्राप्त सोशल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट वर्कर्स’ची (आशा) संख्या 10 लाखाहून अधिक आहे. या आशा स्वयंसेविकांना आरोग्य व्यवस्थेशी जोडण्यात आले असून ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्यसेवा मिळवून देण्यात त्या महत्त्वाची भूमिका निभावतात. सदर महिला आरोग्य कर्मचारी बालसंगोपन, महिलांची आरोग्य काळजी आणि लसीकरण मोहीमेतही सक्रिय सहभाग नोंदवतात.









