अध्याय आठवा
भगवद्गीतेमध्येही विश्वरूपदर्शन हा अध्याय आहे. त्याआधी भगवंतांनी दहाव्या अध्यायामध्ये स्वत:च्या अनेक विभूती अर्जुनाला सांगितल्या आणि शेवटी म्हणाले, अधिक काय सांगू अरे, ही सर्व चराचर सृष्टी ही माझीच विभूती आहे आणि ही सृष्टी निर्माण करण्यासाठी माझ्या सामर्थ्यातला फारतर एखादा अंश खर्ची पडला असेल. हे ऐकल्यावर अर्जुनाला भगवंताच्या अचाट आणि अफाट अशा दिव्य सामर्थ्याची कल्पना आली पण आता तो तेव्हढ्यावर थांबायला तयार नव्हता. त्याला भगवंताच्या सामर्थ्याचा प्रत्यय घ्यायचा होता. अर्थात ज्याच्या सामर्थ्याचा त्याला प्रत्यय घ्यायचा होता ते केव्हढे आणि किती प्रमाणात असेल ह्याची कल्पना नसल्याने त्याने हे धाडस केले होते. त्याने भगवंताकडे मला विश्वरूप दर्शन दाखव असा हट्ट धरला. अर्जुन भक्तराज होता. त्याच्या अनन्यतेमुळे त्याच्याइतके भगवंतांना अन्य काहीच प्रिय नसल्याने त्यांनी त्याला लगेच विश्वरूपदर्शन दाखवायला सुरवात केली. पण अर्जुनाला काहीच दिसेना, त्यामुळे त्याचा चेहरा कोराच होता. तो कोरा चेहरा बघितल्यावर भगवंतांच्या लक्षात आले की, याच्या मानवी डोळ्यांना दिव्य, अलौकिक असे विश्वरूप दिसू शकणार नाही. याला ज्ञानचक्षु देण्याची गरज आहे. मग त्याप्रमाणे त्यांनी अर्जुनाला ज्ञानचक्षु प्रदान केले.
इथेही वरेण्यराजाला विश्वरूप पाहण्यात येणाऱ्या अडचणीची बाप्पांना कल्पना होती. तिचे निवारण करावे म्हणून ते म्हणाले, राजा तुझ्या निरपेक्ष भक्तीवर मी प्रसन्न आहे म्हणून विश्वरूप पाहण्यासाठी आवश्यक असे ज्ञानचक्षु मी तुला देतो. ह्या अर्थाचा ज्ञानचक्षुरहं तेऽ द्य सृजामि स्वप्रभावतऽ । चर्मचक्षुऽ कथं पश्येन्मां विभुं ह्यजमव्ययम् ।। 4 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. ह्यावरून आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेऊयात की, देवाकडून काहीतरी मागण्याची इच्छा करून त्यांची भक्ती करणाऱ्या भक्तापेक्षा देवाला निरपेक्षतेने त्यांची भक्ती करणारा भक्त जास्त प्रिय असतो. ह्याचं कारण असं की, बऱ्याचवेळा भक्ताची मागणी ही प्रापंचिक अडचणी निवारण व्हाव्यात अशा स्वरुपाची असते. त्यादृष्टीने देवाने आपल्यावर कृपा करावी अशी त्यांची इच्छा असते. अर्थात देव हे जाणून असतो की, ह्याच्या प्रापंचिक मागण्या कितीही पूर्ण केल्या तरी आता पुरे असे त्याला वाटणार नसल्याने ह्याचे समाधान कधीच होणार नाही. त्याउलट ह्याने कायम समाधानी राहण्याचे वरदान मागितले तर ह्याचे कायमचे भले होईल. म्हणून त्याला निरपेक्ष भक्त अत्यंत प्रिय असतो. केवळ त्याच्या प्रेमापोटी त्यांची भक्ती करणाऱ्या भक्ताला पुढील काळात कोणती अडचण येऊ शकेल हे हेरून देव त्याला मदत करण्यासाठी तत्पर असतो. म्हणून आपण सर्वजण मनात कोणतीही इच्छा, अपेक्षा न ठेवता देवावर मनापासून प्रेम करून त्याचे स्मरण करत राहूयात आणि आपल्या अडीअडचणीला तो धावून येईल अशी खात्री बाळगूयात.
सूत मुनींना, व्यास मुनी ही गणेशगीता सांगत आहेत हे आपल्याला माहीत आहेच, येथून पुढील विश्वरूपाबद्दल सांगताना व्यास मुनी सुताना म्हणाले, ततो राजा वरेण्यऽ स दिव्यचक्षुरवैक्षत ।
ईशितुऽ परमं रूपं गजास्यस्य महाद्भुतम् ।। 5 ।।
अर्थ- व्यास म्हणाले, दिव्य चक्षु प्राप्त झाल्यावर वरेण्यराजा परमेश्वर गजाननाचे अत्यंत अद्भुत असे श्रेष्ठ रूप पाहू लागला.
दिव्य चक्षु किंवा ज्ञानचक्षु क्वचितप्रसंगी ईश्वर प्रदान करत असतात. मोठमोठ्या ऋषीमुनींनी इतकंच काय देवांनाही ज्ञानचक्षूंची प्राप्ती होत नाही कारण त्यांना त्यांच्या देहबुद्धीचा विसर पडलेला नसल्याने त्यांचा अहंकार ज्ञानचक्षु मिळवण्यात आडवा येतो.
क्रमश:








