ऑनलाईन टीम/तरुण भारत
भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीर मुद्द्यावरून आजही वाद सुरु आहे. तसेच चीनही भारताच्या काही भागावर आपला हक्क सांगत आहे. काही देशांनी अनेक वेळा भारताचा हा भूभाग हा पाकिस्तान आणि चीनमध्ये दाखल्याचे आपण पहिले आहे. पण भारताच्या आक्षेपानंतर ते पुन्हा भारतामध्ये दाखले गेले. पण आता पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटनेने जम्मू काश्मीर हा पाकिस्तानचा तर अरुणाचल प्रदेश हा चीनचा भूभाग असल्याचं दाखवलं जात असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे खासदार शंतनू सेन यांनी केला आहे.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे खासदार शंतनू सेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना रविवारी एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये जागतिक आरोग्य संघटनेसंदर्भात सेन यांनी एक तक्रार मोदींकडे केलीय. जागतिक आरोग्य संघटनेच्या कोव्हिड-१९ डॅशबोर्डमध्ये जम्मू काश्मीर हा पाकिस्तानचा तर अरुणाचल प्रदेश हा चीनचा भूभाग असल्याचं दाखवलं जात असल्याचा आरोप सेन यांनी केलाय.
सेन यांनी पत्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार ते स्वत: जागतिक आरोग्य संघटनेचा हा डॅशबोर्ड पाहताना ही गोष्ट लक्षात आल्याचं म्हटलं आहे. “मी जेव्हा या साईटवरील निळ्या भागावर क्लिक केलं तेव्हा आपल्या देशातील कोव्हिड-१९ बद्दलची माहिती दाखवण्यात आली होती. मात्र मला धक्का बसला जेव्हा मी वेगळ्या रंगाच्या भागावर क्लिक केलं. या ठिकाणी आपल्या जम्मू काश्मीर राज्यावर क्लिक केलं तेव्हा पाकिस्तानची माहिती दाखवण्यात आलेली. असंच चीनसंदर्भातील माहितीबद्दलही या साईटवर दिसून आलं,” असा उल्लेख सेन यांनी मोदींना पाठवलेल्या पत्रात केलाय.