वृत्तसंस्था/ ब्रिस्टॉल
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने यजमान आयर्लंडचा दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 असा एकतर्फी पराभव करत त्यांचा व्हाईटवॉश केला. या मालिकेतील शनिवारी येथे झालेल्या दुसऱया आणि शेवटच्या सामन्यात द. आफ्रिकेने आयर्लंडवर 44 धावांनी विजय मिळविला.
या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून द. आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली. द. आफ्रिकेने 20 षटकात 6 बाद 182 धावा जमविल्या. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल खेळताना आयर्लंडचा डाव 18.5 षटकात 138 धावात आटोपला. द. आफ्रिकेचा पार्नेल याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
द. आफ्रिकेच्या डावामध्ये सलामीच्या हेन्ड्रिक्सने 40 चेंडूत 6 चौकारांसह 42, मार्करेमने 10 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 27, क्लेसनने 16 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 39, कर्णधार डेव्हिड मिलरने 20 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 32 धावा जमविल्या. प्रिटोरियसने 7 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 17 धावा जमविल्या.
द. आफ्रिकेच्या डावात 9 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. आयर्लंडतर्फे डिलेनीने 2 तर मॅकब्रिने, ऍडेर, मॅपेथी आणि लिटल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. हेन्ड्रिक्सने सलामीच्या गडय़ासाठी डी कॉकसमवेत 42 धावांची भागीदारी केली. त्यानंतर द. आफ्रिकेची 12.3 षटकात स्थिती 4 बाद 85 अशी होती. क्लेसन आणि मिलर यांनी 28 चेंडूत पाचव्या गडय़ासाठी 71 धावांची भागीदारी केली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना पार्नेलच्या भेदक गोलंदाजीसमोर आयर्लंडचा डाव 18.5 षटकात 138 धावात आटोपला. कर्णधार स्टर्लिंगने 16 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारासह 28, टेक्टरने 31 चेंडूत 3 चौकारांसह 34, कॅम्फरने 17 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 19 आणि दहाव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या मॅपेथीने 19 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 32 धावा जमविल्या. आयर्लंडच्या डावात 5 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. द. आफ्रिकेच्या वेन पार्नेलने 30 धावात 5 तर प्रिटोरियसने 31 धावात 3, एन्गीडी आणि शम्सी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
द. आफ्रिका 20 षटकात 6 बाद 182 (हेन्ड्रिक्स 42, डी कॉक 7, मार्करेम 27, क्लासन 39, मिलर नाबाद 32, प्रिटोरियस 17, डिलेनी 2-24, मॅकब्रिने, ऍडेर, मॅपेथी, लिटल प्रत्येकी 1 गडी), आयर्लंड 18.5 षटकात सर्वबाद 138 (स्टर्लिंग 28, टेक्टर 34, कॅम्फर 19, मॅपेथी 32, पार्नेल 5-30, प्रेटोरियस 3-33, एन्गीडी 1-14, शम्सी 1-30).









