बुलकमध्ये अॅड. देवदत्त परुळेकरांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान
प्रतिनिधी/ बेळगाव
साने गुरुजींच्या 125 व्या जयंतीनिमित्त मंगळवार दि. 24 डिसेंबर रोजी लोकमान्य ग्रंथालयात ‘साने गुरुजी समजून घेताना’ कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम मराठी विकास संस्थेतर्फे बृहन्महाराष्ट्र संस्थांना अर्थसाहाय्य योजनेंतर्गत सादर करण्यात आला. संत साहित्याचे गाढे अभ्यासक हभप अॅड. देवदत्त परुळेकरांनी साने गुरुजींच्यावर अप्रतिम विचार मांडले. प्रारंभी साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. लोकमान्य ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष जगदीश कुंटे यांनी पुस्तक देऊन वक्त्यांचे स्वागत केले. किशोर काकडे यांनी प्रास्ताविकासह पाहुण्यांची ओळख करून दिली.
देवदत्त परुळेकरांनी साने गुरुजींचा जीवनपट उलगडताना साने गुरुजींचे बालपण, आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेताना सोसलेल्या हालअपेष्टा, पंढरीनाथ अथवा पांडुरंग सदाशिव सानेंचे शाळेतल्या शिक्षकाच्या नोकरीमुळे साने गुरुजी कसे झाले? याची माहिती दिली. हॉस्टेलचे रेक्टर म्हणून काम करताना त्यांनी मुलांची केलेली सेवा आणि तेव्हा चालवलेले छात्रालय दैनिक, आईला मुलांचे करताना लाज वाटते का? असे सांगत मुलांवर केलेले संस्कार हे आजही आवश्यक आहेत.
मिठाच्या सत्याग्रहासह साने गुरुजींचा गांधी, विनोबा भावेंसह राजकीय प्रवास, कारागृहात असताना शामची आईसारखे लिहिलेले जगप्रसिद्ध पुस्तक व अन्य साहित्याचा तपशील परुळेकरांनी उदाहरणांसह दिला. साने गुरुजींची प्रचंड स्मरणशक्ती, कष्ट घेण्याची सवय, प्रामाणिकपणा, कारागृहात वास्तव्य, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे आंदोलन, अन्य आंदोलने, उपोषणे आणि केवळ पन्नास वर्षांचे लाभलेले आयुष्य तरीही 115 हून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आणि आजही त्यांची 35 पुस्तके अप्रकाशित आहेत, हे सारे अचंबित करणारे आहे. साने गुरुजींना रडकं साहित्य लिहिणारे म्हणून टीका झाली. पण त्यांनी सभा गाजवल्या, शेतकऱ्यांची आंदोलने उभी केली, चूक करणाऱ्या आपल्याच सरकारलाही जाब विचारला आणि स्वत:च मृत्यूला सामोरे गेले. साने गुरुजी समजून घेताना शामची आईसह चिनी संस्कृती, केलेली भाषांतरे आणि भारतीय संस्कृतीसारखे उत्कृष्ट साहित्य वाचणे गरजेचे आहे. संत साहित्याचा धागा त्यांनी पकडला होता, असे परुळेकर म्हणाले.









