कथित खलिस्तानी जनमत संग्रह प्रस्ताव संमत : 7 हजार खलिस्तान समर्थकांची हजेरी
वृत्तसंस्था/ ओटावा
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना जी-20 शिखर परिषदेनंतर विमानातील तांत्रिक बिघाडामुळे काही काळ भारतातच थांबावे लागले होते. याचदरम्यान कॅनडातील सरे शहरात आणखी एक भारतविरोधी खलिस्तानी रेफरेंडम म्हणजेच जनमत संग्रहाची अनुमती देण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे भारताकरता वाँटेड दहशतवादी गुरपतवंत पन्नू या जनमत संग्रहावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकी देताना दिसून आला. पन्नू हा शिख फॉर जस्टिस या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे.
गुरपतवंत पन्नूने पुन्हा एकदा जाहीरपणे भारताच्या विभाजनाचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विदेशमंत्री डॉ. एस. जयशंकर आणि गृहमंत्री अमित शाह यांना पन्नूकडून धमकाविण्यात आले आहे. खलिस्तान जनमत संग्रह कार्यक्रम 10 सप्टेंबर रोजी व्हँकुव्हरमध्ये गुरुद्वारात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी 50-75 हजारांच्या आसपास लोक पोहोचणार असल्याचा अनुमान होता, परंतु कार्यक्रमात केवळ 5-7 हजार लोकच उपस्थित राहिले. यामुळे या कथित जनमत संग्रहाला पूर्णपणे अपयशी ठरविण्यात येत आहे.
खलिस्तानचा मुद्दा चर्चेत
जी-20 परिषदेनंतर खलिस्तान मुद्द्यावर ट्रुडो यांनी भूमिका मांडली आहे. मागील काही वर्षांमध्ये पंतप्रधान मोदींशी खलिस्तानच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे. आम्ही नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करतो. शांततापूर्ण निदर्शनांचा सर्वांना अधिकार आहे. याचबरोबर आम्ही हिंसेला विरोध करतो आणि कुठल्याही प्रकारच्या द्वेषभावनेला आम्ही थारा देणार नाही. काही लोकांचे कृत्य पूर्ण कॅनडाची मानसिकता दर्शवित नाही. आम्ही कायद्याचा आदर करतो असे ट्रुडो यांनी म्हटले आहे.
शासकीय शाळेत आयोजनाचा प्रयत्न
कथित जनमत संग्रह खलिस्तान रेफरेंडम कॅनडाच्या एका शासकीय शाळेत आयोजित करण्यात येणार होता. परंतु शाळा व्यवस्थापन आणि सरकारच्या हस्तक्षेपानंतर तेथील आयोजन रद्द करण्यात आले होते. पंतप्रधान ट्रुडो हे नवी दिल्लीत जी-20 परिषदेसाठी पोहोचल्यावर कॅनडात या रेफरेंडमच्या आयोजनाला अनुमती देण्यात आली होती.
कॅनडात दिसला दहशतवादी
गुरपतवंत सिंह पन्नू हा दहशतवादी या कार्यक्रमात जाहीरपणे सहभागी झाला आहे. मागील काही काळापासून पन्नू हा अमेरिकेत होता आणि तेथूनच भारतविरोधी व्हिडिओ जारी करत होता. पन्नूने पुन्हा एकदा या जनमत संग्रहात पोहोचून ‘बाल्कनायजिंग इंडिया’ (भारताला तोडण्याच्या )चे आवाहन करत एक प्रक्षोभक भाषण केले आहे. पन्नूसोबत यावेळी सुरक्षारक्षकांचे एक पथक होते. अशा स्थितीत भारतविरोधी दहशतवाद्याला कॅनडाने सुरक्षा प्रदान केली आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.









