(भाग-2)
गेल्या लेखामध्ये उल्लेख केलेली श्रेया..अगदी कंटाळून, मला ‘स्पेस’ हवी आहे याचा आग्रह धरत माहेरी निघून आली होती. परंतु ही ‘स्पेस’ म्हणजे स्वत:साठी काढलेला ‘अर्थपूर्ण अवकाश’ न राहता त्याची परिणती नात्यामध्ये ‘अंतर’ वाढण्यात झाली होती.
केवळ श्रेयाच नव्हे तर अलीकडच्या काळात अनेक तऊण तऊणींमध्ये वेगवेगळ्या संकल्पनांबाबत वैचारिक गोंधळ पहायला मिळतो.
‘लग्न हवे आहे कुणाला’ असा थेट प्रŽ अनेक मुले मुली विचारतात. खरोखरच पोळी भाकरी शिळी व्हावी इतके नाते पटकन् शिळे होते का? की कसलेच उत्तरदायित्व नको म्हणून अनेक तऊण तऊणी हे नातेच नको म्हणताना दिसतात? विवाहसंस्था आणि त्या अनुषंगाने उपस्थित होणारे असंख्य प्रŽ आज सर्वांनाच अस्वस्थ करत आहेत.
मुळातच ‘स्पेस’ या संकल्पनेचा पगडा आणि पाश्चात्यांसारखी जशीच्या तशी ही संकल्पना इथे उतरवणे शक्मय आहे का याचा प्रामाणिक विचार होणे गरजेचे आहे.
पाश्चात्य देशातील समाजरचना, व्यक्तीस्वातंत्र्याच्या कल्पना, त्यांनी त्यानुसार आखलेल्या तिथल्या सीमारेषा अगदी सुस्पष्ट आहेत. त्याबाबत तिथे कुणाला काही वाटतही नाही. कारण ते वर्षानुवर्षे त्यानुसारच जगत आले आहेत. तिथे जसे फार कुणी कुणामध्ये अडकत नाही, हस्तक्षेप करत नाही तसेच मला का विचारले नाही ..म्हणून दु:खीही होत नाही.
इथे कौटुंबिक नात्यांचे तर सोडाच परंतु समजा आपण प्रवासाला निघालो आहोत. बसस्टॉपवर थांबलो आहोत आणि बस यायला खूप उशीर झाला. पहा, आपल्या तिथेच गप्पा सुरू होतात. तुम्ही कुठचे? काय? इथपासून अगदी बोलता बोलता आपण त्यांच्या कुटुंबापर्यंत जाऊन पोहोचतो. खरंतर या गोष्टींचा आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय उपयोग असतो? परंतु ते अगदी सहजी घडते. उलट त्यात एखादा माणूस गप्पांमध्ये सहभागी झालाच नसेल तर, काय रे बाबा नुसता मख्खच होता नाही तो..बोलायला काही पैसे पडतात का? काय एकएक माणसं असतात नाही? अशी शेरेबाजीही आपण करतो. म्हणजेच एकमेकांशी बोलणे, ओळख करून घेणे, आस्थेने विचारपूस करणे हे पहातच आणि तसे करतच आपण लहानाचे मोठे झालो आहोत.
इतकेच कशाला एखाद्या ओळखीच्या व्यक्तीने, शेजाऱ्याने अडचणीप्रसंगी आपल्याला हाक मारली नाही तरी आपण दुखावले जातो. निदान मला सांगायचे तरी..मला जी मदत होईल ती मी केली असती, असे आपण सहज म्हणून जातो. हे का होते?कारण आपण हे पहातच लहानाचे मोठे झालो आहोत.
इथली समाजरचना, वैचारिक, भावनिक देवाणघेवाण, संकल्पना या वेगळ्या आहेत. आपल्याला एखादे धाकटे भावंड असेल तर..ए दादा झालास ना तू? किंवा ताई झालीस ना तू? असे वागायचे नाही आता किंवा मुलं झाल्यावर बाबा झालास ना तू? किंवा आई झालीस ना तू? आता थोडे बदलायला हवे असे अगदी सहजतेने म्हटले जाते.
व्यक्ती म्हणून तसा स्वतंत्र विचार न करता, समाज आणि समाजात कसे वागायचे याचे बाळकडू आपल्याला सुऊवातीपासून मिळत असते. त्यामुळे प्रथम समाज आणि नंतर आपण अशा पद्धतीनेच वाटचाल सुरू असते. त्यामुळे पाश्चात्यांसारखी ‘स्पेस’ची संकल्पना अगदी जशीच्या तशी उतरवू पहाल तर इथे ठेचकाळून घायाळ होण्यापलीकडे आणि नात्यामध्ये दुरावा निर्माण होण्यापलीकडे हाती काहीच लागणार नाही हे लक्षात घ्यायला हवे.
अनेक तऊण जोडप्यांच्याबाबतीत अनेक संकल्पनांबाबत वैचारिक गोंधळ आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अनेक समस्या, नाते तुटण्याच्या दिशेने होणारा प्रवास हे चित्र सर्रास पहायला मिळते. याबाबतीत काही मुद्दे लक्षात घेणे फार गरजेचे आहे.
‘स्पेस’ म्हणजे असा अर्थपूर्ण ‘अवकाश’ जो खऱ्या अर्थाने जाणिवा समृद्ध करेल, नाते समृद्ध करेल.ज्या वेळामध्ये ‘अवकाशामध्ये’ आपण स्वत:मध्ये डोकावून पहायला शिकू त्या वेळात आपल्या अशा छंदांची जोपासना करता येईल जे आपल्याला सकारात्मकतेच्या दिशेने वाटचाल करायला उपयुक्त ठरतील. ‘अवकाशा’मध्ये आपले आत्मभान, स्वविषयक जाणीव, विकास कसा होईल हे पहायला हवे. त्या वेळात आपली बलस्थाने, उणिवा कोणत्या याकडेही लक्ष द्यायला हवे. ज्या उणिवा असतील त्यावर कशा पद्धतीने काम करता येईल याचा विचार आणि तदनुसार कृती यावरही विचार व्हायला हवा. आपली बलस्थाने बदलू शकतात याचेही भान येणे आवश्यक आहे. अगदी उदाहरण देऊन सांगायचे तर..लग्न झाल्यानंतर सुऊवातीच्या काळात पाहुणे येणार म्हटल्यावर तारांबळ उडणे, चार अधिक माणसे येणार म्हटल्यावर टेन्शन येणे हा त्यावेळेचा ‘तिचा’ वीकनेस असू शकतो. परंतु बाहेरील कोणतीही कामे झपझप करणे, उत्तम ड्रायव्हिंग, खूप गाडी चालवणे ही तिची त्यावेळेची बलस्थाने असू शकतात. वयाच्या पन्नाशीला हे चित्र उलटही असू शकते..आता ‘तिला’ दहा माणसे आली तरी विशेष फरक पडत नाही. चार पदार्थ अधिक बनवत ती सज्ज असते परंतु हे ट्रॅफिक नको वाटू लागते. ड्रायव्हिंग आता पूर्वीसारखे शक्मय होत नाही. म्हणजे इथे स्टेंग्थ आणि वीकनेसिसची अदलाबदल पहायला मिळते. असे जेव्हा होते तेव्हाही उदास न होता, तुलना न करता त्याचा स्वीकार आणि शक्मय त्या बदलासाठी प्रयत्न हा दृष्टिकोन ठेवणे आणि त्यादृष्टीने सजग होणे हेही या ‘स्पेस’मधे पहायला हवे. तसेच त्यामधे आपले पास्टबुक चाळणे, एखाद्या गोष्टीचे आपण लावलेले अर्थ, तो दृष्टीकोन योग्य होता का हे तटस्थपणे तपासणे आणि त्यातून सुधारणेच्या दिशेने वाटचाल करणेही अपेक्षित आहे. येणारे विचार न्याहाळणे, तपासणे, साक्षी होण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्या धारणा, मूल्ये काय आहेत, तसेच माझ्या जोडीदाराच्या धारणा, मूल्ये काय आहेत त्यासाठी आपण एकमेकांना किती सहकार्य करतो आहोत याचाही प्रामाणिक विचार आवश्यक आहे.
अशा पद्धतीने आपण स्वत:साठी ‘अवकाश’ काढत स्वत:मध्ये डोकावू लागलो तर खऱ्या अर्थाने आपल्या सोबत दुसऱ्याच्या स्पेसचेही भान राहील. स्त्री, पुऊष आणि विविध भूमिकापलीकडचे ‘माणूसपण’ जपले जाईल आणि नात्यामधे ‘अंतर’ निर्माण होण्याऐवजी नात्याची विण अधिक घट्ट होईल. दुसऱ्यासाठी भक्कम भावनात्मक आधार बनत आपल्या भावना, धारणा, मूल्ये याचे भान आणि त्या जोपासताना अधिक सजगतेच्या दृष्टीने आपली वाटचाल होईल हे मात्र खरे!
-अॅड. सुमेधा संजीव देसाई








