पंचतारांकित हॉटेलांमध्ये वास्तव्याचे किंवा खाण्यापिण्याचे दर प्रचंड असतात, याची आपल्यापैकी बहुतेकांना माहिती आहे. पंचतारांकित तर सोडाच, पण त्यापेक्षा कमी तारांकित हॉटेलांचे दरही सर्वसामान्यांना परवडण्यासारखे नसतात. तथापि, भारतातील सर्वात महाग हॉटेल कोणते, हा प्रश्न आपल्यापैकी बहुतेकांना कधीना कधी पडलेला असतो. या प्रश्नाचे उत्तर ‘राज पेलेस हॉटेल’ जयपूर हे आहे. हे हॉटेल जसे महाग आहे, तसे इतिहासप्रसिद्धही आहे. या हॉटेलाची निर्मिती इसवीसन 1727 मध्ये करण्यात आली होती. म्हणजेच हे हॉटेल साधारणत: 300 वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात आहे. त्या दृष्टीने ते भारतातले सर्वात जुने हॉटेल असण्याचीही शक्यता आहे. याचे मूळ नाव ‘चोमू हॉटेल’ असे होते. वास्तविक, हे हॉटेल म्हणजे एक ‘राजप्रासाद’ आहे. येथे एका राजघराण्याचे वास्तव्य अनेक दशके होते. 1996 मध्ये राजकुमारी जयेंद्र कुमारी यांनी या राजमहालाचे रुपांतर पूर्ण पंचतारांकित हॉटेलमध्ये केले होते. या हॉटेलात 50 अलिशान कक्ष आहेत. ते ऐतिहासिक वास्तूशैलीमधील आहेत.
पूर्वीच्या संस्थानिकांनी उपयोगात आणलेल्या अनेक महागड्या सोन्याचांदीच्या वस्तू या कक्षांमध्ये ग्राहकांच्या उपयोगासाठी उपलब्ध आहेत. या हॉटेलात अमिताभ बच्चन आणि अॅलन पेज यांच्यासारख्या जगप्रसिद्ध व्यक्तींनी वास्तव्य केले आहे. यातील एका कक्षाचे चोवीस तासांच्या वास्तव्याचे दर 37 हजार रुपये इतके आहेत. कुटुंबासाठी वास्तव्याच्या ‘सूट’चे दर प्रतिदिन 4 लाख रुपये ते 5 लाख रुपयांच्या घरात आहेत. या हॉटेलात एक कक्ष असा आहे, की ज्याचा दर एका रात्रीसाठी 15 लाख रुपये इतका कल्पनातीत आहे. आता या कक्षात कोण वास्तव्य करेल आणि का करेल, हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येणारच. पण ज्याअर्थी तो कक्ष आहे, त्याअर्थी कोणीना कोणी, केव्हाना केव्हा तेथे वास्तव्य करीत असणारच. तर अशा प्रकारे, एका ऐतिहासिक राजप्रासादामधून रुपांतरीत करण्यात आलेले हे हॉटेल भारतातील सर्वात महाग असणे, हे काही आश्चर्य मानता येणार नाही. अर्थात, राजस्थानात अनेक ऐतिहासिक राजप्रासादांची रुपांतरे अशा प्रकारे पंचतारांकित हॉटेलांमध्ये करण्यात आली आहेत. पण हे हॉटेल त्यांच्यापेक्षाही विशेष मानले जात आहे.









