संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे कौतुकोद्गार, आशियाई खेळांत पदके जिंकलेल्या संरक्षण दलांच्या जवानांसाठी रोख बक्षिसे जाहीर
नवी दिल्ली/
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत पदके जिंकलेल्या संरक्षण दलाच्या जवानांसाठी रोख बक्षिसे जाहीर केली आणि म्हटले की, रणांगण असो वा क्रीडांगण समर्पण, शिस्त, परिश्रम आणि देशासाठी काही तरी करण्याची इच्छा यामुळे सैनिक नेहमीच कामगिरी करून दाखवितो. सैनिकामध्ये एक खेळाडू असतो आणि खेळाडूमध्ये एक सैनिक असतो, असे त्यांनी येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात बोलताना सांगितले.
सिंह यांनी असेही म्हटले की, खेळाडूंच्या कामगिरीने झपाट्याने वाढणाऱ्या आणि सामर्थ्यशाली ’नव्या भारता’ची प्रतिमा प्रतिबिंबित केली आहे. त्यांनी देशाच्या संरक्षण दलांतील पदकविजेते, इतर सहभागी खेळाडू आणि साहाय्यक कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. हे सारे हांगझाऊ येथे झालेल्या 19 व्या आशियाई क्रीडास्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय तुकडीचा भाग होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या एकूण 76 खेळाडूंशी आणि ‘सपोर्ट स्टाफ’शी संरक्षणमंत्र्यांनी संवाद साधला आणि खेळांतील उत्कृष्ट प्रदर्शनाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
संरक्षण मंत्रालयाच्या वतीने सिंह यांनी 16 वैयक्तिक पदके (3 सुवर्ण, 6 रौप्य आणि 7 कांस्य) आणि आठ सांघिक पदके (2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 कांस्य) जिंकून ज्यांनी देशाचे नाव उज्ज्वल केले आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुन्हा एकदा आपले कौशल्य सिद्ध केले त्या संरक्षण दलाच्या जवानांना रोख बक्षिसे जाहीर केली. त्यानुसार, सुवर्णपदक विजेत्यांना 25 लाख ऊपये, रौप्यपदक विजेत्यांना 15 लाख ऊपये आणि कांस्यपदक विजेत्यांना 10 लाख ऊपयांचे पारितोषिक दिले जाईल. 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या आशियाई खेळांत एकूण 88 जवानांनी 18 क्रीडाप्रकारांत भाग घेतला. यात तीन महिलांचाही समावेश राहिला.
राजनाथ सिंह यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या, पण पदक जिंकू न शकलेल्या खेळाडूंच्या प्रयत्नांचेही कौतुक केले. त्यांनी त्यांना ‘फ्लाइंग शीख’ मिल्खा सिंग यांची आठवण करून दिली ही पदके आणि कामगिरी देशातील तऊणांना खेळांत पुढे येण्यासाठी प्रेरणा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या समारंभाला ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ जनरल अनिल चौहान, हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, नौदलाचे उपप्रमुख व्हाइस अॅडमिरल संजय जसजित सिंग आणि संबंधित दलांच्या क्रीडा नियामक मंडळांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.









