ओमर अब्दुल्ला यांचा केजरीवालांना सवाल : अध्यादेशाविरोधातील पाठिंब्यावरून सुनावले
वृत्तसंस्था/ श्रीनगर
केंद्र सरकारच्या अध्यादेशानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळवण्यात गुंतले असतानाच याप्रकरणी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्यांना कडक शब्दात फटकारले आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आले तेव्हा अरविंद केजरीवाल कुठे होते? असा प्रश्न अब्दुल्ला यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारच्या या निर्णयाच्यावेळी काश्मीर सरकारच्या पाठीशी उभे न राहणारे लोक आता इतर पक्षांचा पाठिंबा मागत आहेत, असे विधानही त्यांनी केले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल केंद्राच्या अध्यादेशाबाबत विरोधकांना एकत्र करण्यात गुंतले आहेत. मात्र, ओमर अब्दुल्ला यांच्या पक्षाकडून त्यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता मावळली आहे. अब्दुल्ला यांनी काही राजकीय नेते गरजेच्या वेळी आमचे दरवाजे ठोठावतात, असे म्हटले आहे. 2019 मध्ये जेव्हा 370 हटवण्यात आले, तेव्हा हे लोक (केजरीवाल) कुठे होते? असा थेट प्रश्न अब्दुल्ला यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे. काश्मीरमध्ये लोकशाहीची हत्या होत असताना हे लोक गप्प राहिले. फक्त टीएमसी, डीएमके आणि डाव्या पक्षांनी आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला. त्यांच्याशिवाय आम्हाला कोणीही साथ दिली नाही, असेही ते पुढे म्हणाले.
अध्यादेशाबाबत आपचे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांची भेट घेतली आहे. यापैकी बहुतांश पक्षांनी त्यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, आता ओमर अब्दुल्लांनी केजरीवालांना कडक शब्दात फटकारल्याने त्यांचे समर्थन मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. त्याचवेळी काँग्रेसने याप्रकरणी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.