विटा / सचिन भादुले :
शहरातील वाहन पार्किंगची समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. रस्त्यावरच वाहने पार्किंग होत असल्याने वाहतूकीची कोंडी नित्याची झाली आहे. शहरात आल्यावर वाहने लावायची कोठे? असा प्रश्न वाहनधारकांना पडत आहे. पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांचा बैठकांचा फार्स सुरू आहे. शहरातील वाहनतळाची समस्या सुटणार कधी? असा सवाल वाहनधारक आणि नागरिक उपस्थित करत आहेत.
विटा शहर खानापूर, आटपाडी, तासगांव आणि कडेगांव तसेच सातारा जिल्ह्यातील खटाव, माण तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. याच विटा शहरातून खानापूर तालुक्याचा कारभार चालतो. पोलिस, महसूल, कृषी अशा अनेक आस्थापनांची विभागीय कार्यालये शहरात आहेत. अतिरिक्त जिल्हा न्यायालय आहे. आता उपजिल्हा रुग्णालय मंजूर होत आहे. शहराच्या मुख्य चौकातच बीसपेक्षा अधिक शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे याठिकाणी दररोज हजारो लोकांची कामानिमित्त येजा असते.
याशिवाय शहरात येणाऱ्या दुचाकी, चारचाकी बाहनांची संख्याही मोठी आहे. बिटा शहरातून विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्ग आणि सांगली – भिगवण राज्यमार्ग गेला आहे. या महामार्गावरून दररोज दुचाकीसह चारचाकी अवजड वाहने धावत असतात. शहरात मुळातच रस्ते अरूंद आहेत. अत्यंत तोकड्या जागेत मोजके पार्किंग असल्याने शहरात येणारी वाहने लावायची कोठे?, हा प्रश्न वाहनधारकांना पडत आहे.
शासकीय मध्यवर्ती इमारतीमागे महसुलच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली चारचाकी वाहने लावली आहेत. ती सडून चालली आहेत. ती वाहने तेथून हटवून तेथे दुचाकी पार्किंग केले तर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्यावर लागणारी वाहने त्याठिकाणी पार्किंग होवून वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. मात्र मध्यवर्ती इमारतीमागील सडलेली वाहने काढली जात नाहीत. शिवाय जुन्या नगरपालिका इमारती समोर आणि पंचमुखी गणपती मंदीरामागे असणाऱ्या बाहनतळावर बेशिस्त पार्किंग आहे. तिथे शिस्त लावण्याची गरज आहे. व्यापारी संकुलाच्या तळघरात दुचाकी पार्किंग व्यवस्था आहे, पण लोकांची मानसिकता होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून विनोद कॅफेकडे जाणाऱ्या मार्गावर तर चालणे मुश्किल होते.
- बैठकांचे सत्र मात्र फलनिष्पत्ती नाही
मध्यंतरी नगरपरिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल, मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील व गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील यांची पार्किंग संदर्भात एक बैठक झाली. मात्र त्यावर अद्यापही कार्यवाही झाली नाही. शहरात असणाऱ्या पार्किंगच्या आरक्षित जागा खुल्या करणे गरजेचे आहे. मात्र त्या खुल्या केल्या जात नसल्याचे चित्र आहे. आरक्षित जागा खुल्या केल्या तर तेथे वाहनांची पार्किंग व्यवस्था होवून वाहने ये-जा करण्यासाठी रस्ते खुले होतील व वाहतूक कोंडी सुटेल. वाढत्या वाहनामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. अधिकाऱ्यांनी पार्किंगबाबत अनास्था न दाखवता आरक्षित जागा खुल्या कराव्यात, पार्किंग करण्यासाठी अन्य ठिकाणी जागा उपलब्ध करून वाहनतळ करावे अशी मागणी होत आहे.








