हेस्कॉमच्या वीज ग्राहक तक्रार निवारण बैठकीत सवाल
बेळगाव : न्यायालयाच्या आदेशानुसार हेस्कॉमकडून अनधिकृत वसाहतींमधील घरांना वीजकनेक्शन बंद केले आहे. परंतु, शहरातील जुन्या घरांनाही एनओसी नसताना मीटर देणे बंद केले आहे. अनेक घरांमध्ये भाऊबंदकी तसेच छोट्या हिश्शांमुळे त्यांचे भाग करणे कठीण असल्याने किमान जुन्या घरांना तरी हेस्कॉमने नवीन मीटर द्यावेत, अशी मागणी तक्रार निवारण बैठकीत करण्यात आली. रेल्वेस्टेशन समोरील हेस्कॉम कार्यालयात झालेल्या बैठकीला कार्यकारी अभियंता मनोहर सुतार उपस्थित होते. त्यांच्यासमोर ग्राहक तसेच कंत्राटदार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारी मांडल्या. महानगरपालिकेने बिल्डींग सीसी तसेच इतर कागदपत्रे दिल्यानंतरच हेस्कॉमकडून विद्युत मीटर दिले जात आहे.
अनधिकृत वसाहतींना आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जात आहे. मात्र, यामुळे जुन्या घरांवरही अनेक निर्बंध लादल्याने नागरिकांना वीजकनेक्शन घेताना अनेक अडथळे येत आहेत. मागील तीन महिन्यांपासून कागदपत्रांची पूर्तता करूनच कनेक्शन दिले जात आहे. परंतु, शहरातील जुन्या घरांना एनओसी कोठून आणणार, असा प्रश्न ग्राहकांसमोर आहे. त्यामुळे घरांचा विस्तार करूनही वीज नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे योग्य तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भात आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करू, असे आश्वासन कार्यकारी अभियंता मनोहर सुतार यांनी दिले. बैठकीवेळी काही ठिकाणी वीजयंत्रणा निकामी होत असून नवीन उपकरणे बसविण्याची मागणी केली. बैठकीला साहाय्यक कार्यकारी अभियंता बजंत्री, संजीवकुमार सुखसारे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.









