मध्यंतरी एक विनोद प्रसिद्ध झाला होता. उच्चविद्याविभूषित, अधिकारपदावर असलेली व्यस्त स्त्राr घरात काम करणाऱ्या बाईला म्हणते, ‘प्लीज, तू आज माझ्यावतीने जिममध्ये जाऊन व्यायाम करून येशील का? मला अजिबातच वेळ नाही.’ हे ऐकून आपल्याला हसू येते, परंतु ही हसण्यावारी नेण्याची गोष्ट नाही. पाश्चात्य विचारवंत आल्बेर कामू यांनी पूर्वीच असं म्हणून ठेवलंय की पुढे काळ असा येईल की लोक आपल्या नोकरांकडूनही प्रेम करून घेतील. थोड्याफार प्रमाणात ते सत्यात उतरलं आहे. काळाची गती सांभाळताना मोठ्या शहरात पालक मुलांना मुले झोपेतून उठण्यापूर्वीच ‘डे केअर सेंटर’ या अत्याधुनिक, तथाकथित प्रेमळ संस्थेत आणून ठेवतात आणि घरी रात्री पेंगुळलेल्या अवस्थेत नेतात. वीकेंडला आई-बाबांच्या डोक्याला, अर्थात मेंदूला विश्रांती हवी म्हणून आई-बाबा पूर्ण वेळ दोन दिवस संस्थेत मुलांना ठेवून निश्चिंतपणे थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. आजी-आजोबांचेही तेच. नातवंडंविरहित परदेशस्थ मुलांचे आई-वडील जिथे भरपूर पैसे घेऊन प्रेम विकत घेता येते तिथे आयुष्याचा उत्तरार्ध कसाबसा काढत असतात. काळजी, उपचार, मनोरंजन यांचा सुकाळ असणाऱ्या उसन्या प्रेमाच्या अनेक संस्थांना कलियुगामध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामी श्रीरामांना म्हणाले असावेत… ‘कल्याण करी रामराया, देवराया’.
जेव्हा विज्ञान आणि संपत्ती एखाद्या संकटसमयी हात टेकतात तेव्हा त्या विश्वचालक परमात्म्याची आठवण होते. ज्योतिष जाणून घेण्यासाठीही पावले वळतात. आरोग्य असो वा भीषण संकट तेव्हा माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा कस लागतो. परमात्म्याची करुणा लाभावी म्हणून उपासना, प्रार्थना, सेवा जेव्हा एखाद्या व्यक्तीला कुणी परमार्थ क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती सांगते तेव्हा आणखी घोर संकटात पडल्यासारखे वाटते. त्यासाठी अनेक पळवाटा सापडतात. पैसा जवळ असतोच. मग प्रार्थना, अनुष्ठान, यज्ञ यासाठी कुणा सात्विक व्यक्तीची निवड करतात आणि संपत्तीच्या जोरावर कुणीतरी दुसरेच यजमानांच्यावतीने अनुष्ठान करीत परमात्म्यावर प्रेम करतात. आधुनिक काळाचा महिमा असा आहे की घरबसल्या तीर्थक्षेत्री आपल्यासाठी चाललेल्या अनुष्ठानाचे छायाचित्रण बघता येते तेव्हा माणूस कृतकृत्य होतो. आयुष्यामधल्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी जेव्हा दुसऱ्याकडून करून घेतल्या जातात तेंव्हा आपण स्वत:चे फार मोठे नुकसान करून घेतो आहे हे कळतसुद्धा नाही हे केवढे दुर्दैव.!
आचार्य ओशो रजनीश असे म्हणतात की माणसाचे शरीर, त्याचे प्राण हे काही विशिष्ट श्रम करण्याकरताच निर्माण झाले आहेत. दुर्दैवाने माणसाने श्रमावर फुली मारली आहे. त्यामुळे त्याच्या अंतरंगातील ऊर्जा आणि चेतना जागृत होण्याची शक्यता मावळली आहे. अतिशय श्रम करून शरीरावर बळजबरी करू नये. मात्र निरामय स्वास्थ्यासाठी आणि तजेलदार जीवन जगण्यासाठी स्वत:च्या शरीराला योग्य असे श्रम करायलाच हवेत. महर्षी विनोबा भावे हे जेव्हा पहिल्यांदा महात्मा गांधींना भेटले तेंव्हा महात्माजी स्वयंपाकघरात भाजी चिरत होते. भाजी चिरण्याचे, स्वयंपाक करण्याचे काम एक राष्ट्रनेता करतो हे विनोबाजींसाठी नवीन होते. ते म्हणतात, बापूंच्या या पहिल्या दर्शनातच मला श्रमाचा पाठ मिळाला. बापूंनी त्यांच्या हातात चाकू दिला आणि त्यांनाही भाजी चिरायला बसवले. ते म्हणतात, ही मला मिळालेली पहिली दीक्षा होती.
जिथे वर्षभर पाऊस पडत नाही, दुष्काळ असतो तिथे पाण्याची भीषण टंचाई असते. आठ ते दहा किलोमीटर चालून तलावातून डोक्यावर दोन-तीन हंडे घेऊन बायका मोठ्या कष्टाने पाणी भरतात तेंव्हा त्यांना पाण्याच्या एका थेंबाचेही मोल असते. मोठ्या शहरांमध्ये 25 ते 30 मजले असलेल्या इमारतींमध्येही भरपूर मुबलक पाणी मोठमोठ्या पाईपने वर चढवले जाते. सदनिकांमध्ये जागोजागी नळ असतात. मुक्त हस्ते पाण्याचा वापर सुरू असतो. काटकसर कशी ती नाहीच. कारण ते पाणी त्यांना श्रमाविना मिळते. इंग्रज राजवट सुरू झाली तेव्हा शहरांमध्ये नळ आले. नदी, विहीर, तलाव यातून पाणी आणण्याचे कष्ट संपले तेव्हा जुन्या पिढीने विरोध केला. जात्यावर बसून ओव्या गाणाऱ्या बायका म्हणतात, ‘मुंबईच्या बायका आहेत आळशी, नळ नेले चुलीपाशी इंग्रजांनी.’ ‘मुंबई शहरात घरोघरी नळ, पाण्याचे केले खेळ इंग्रजांनी.’ खरेच… पाण्याचे खेळच होतात आजकाल. बाबा आमटे यांच्या आनंदवनात मूकबधिर अंधअपंग, व्याधीग्रस्त सारे जण जिवापाड श्रम करून नवनिर्मिती करत असतात. ते बघितल्यावर निरोगी व संपूर्ण अवयव योग्य स्थितीत असणाऱ्या व्यक्तीला स्वत:चीच लाज वाटते व ती व्यक्ती सजग होते. आनंदवनात कामाच्या ठिकाणी एक पाटी लावली आहे. ‘श्रम ही श्रीराम है हमारा।’ हा संस्कार मनामनांवर ठसायलाच हवा.
विटेवर भक्तांसाठी तिष्ठत उभ्या असणाऱ्या विठुरायाला कष्टकरी जिवांचा जास्त लळा आहे. विठुरायापाशी असणारी संतांची मांदियाळी म्हणजे विठ्ठलाचे नाम घेत हातावरती पोट असणारी मंडळी आहेत. ‘कांदा मुळा भाजी। अवघी विठाई माझी।।’ असे म्हणणारे सावता माळी सांगतात की ‘सावता म्हणे केला मळा । विठ्ठलपायी गोविला गळा ।।’ दिवसभर ते मळ्यात श्रम करीत असत. संत नामदेव महाराजांचा शिंपी कामाचा व्यवसाय होता. त्यांनी विठ्ठलनामाचा झेंडा पंजाबमध्ये रोवला. त्यांचे वीस वर्षे तिथे वास्तव्य होते. भागवतधर्माच्या प्रचारासाठी त्यांनी पदभ्रमण केले. महाराष्ट्र सारस्वतकार म्हणतात, ‘चौदाव्या शतकाच्या प्रारंभी इस्लामचे आक्रमण उत्तर हिंदुस्थानात चांगलेच होऊ लागलेले असावे. अशा परिस्थितीत भागवतधर्माचा झेंडा उत्तरेकडे नाचवणारे नामदेव हे पहिले संत होत.’ परमार्थातील शिंपीकाम त्यांनी सांगितले आहे. शिखांच्या पवित्र ‘गुरू ग्रंथसाहिबा’मध्ये नामदेवांचे एक पद आहे. ‘मन मेरे गजू, जिव्हा मेरी कामी, मपी मपी काटऊ, जमकी फासी’. मनरूपी गज अन जिव्हारुपी कात्री या साधनांनी आपण मायेचा पाश कापत चाललो आहोत. संत चोखामेळा हे तर मजूर काम करत असत. मंगळवेढा येथे बांधकाम करीत असताना दरड कोसळली त्यात संत चोखामेळा गाडले गेले. संत नामदेव महाराज म्हणतात, ‘कुसू कडाडिले अकस्मात । तयाखाली बहू चूर झाले। चोख्याने अर्पिले प्राण देवा?’ हे विठूमाऊलीला कळताच माऊलीने नामदेवांना आदेश दिला. ‘देव म्हणे नाम्या । त्वा जावे तेथे । त्याच्या अस्थि घेऊन याव्या?’ संत नामदेवांना मोठा प्रश्न पडला की संत चोखामेळ्याचे शरीर ओळखायचे कसे? कारण दबल्यामुळे शरीराची ओळख पुसून गेली. संत नामदेवांनी विठ्ठलाला विचारले की ‘नामा म्हणे देवा । अस्थि कैशा ओळखाव्या?’ तेव्हा विठुरायाने सांगितले की त्याच चोखामेळाच्या अस्थी आहेत की ‘विठ्ठलनाम जयामध्ये निघे.’ संत नामदेवांनी चोखामेळ्याच्या विठ्ठल विठ्ठल म्हणणाऱ्या अस्थि आणताच विठोबाने त्या आपल्या पीतांबरामध्ये घेतल्या. संत नामदेव महाराज म्हणतात, ‘देवाचे अंचळी उठिला गजर। विठ्ठलनाम अंबर गर्जतसे?’ चोखामेळ्याच्या अस्थिंना विठ्ठलाच्या महाद्वारी समाधी दिली. राही, रखुमाई, सत्यभामा यांनी त्यांना ओवाळले. विठुरायाला कष्टकरी, श्रमजीवी भक्तांचा अभिमान आहे. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असे म्हणणाऱ्या संत जनाबाईंना तो काम करू लागतो. ‘जनी जाय शेणासाठी, उभा राहे तिच्या पाठी’. जनाबाईंना धुणे धुऊ लागणारा, मोट उचलून डोईवर घेणारा विठ्ठल. ‘असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी’ असे म्हणणाऱ्या आळशी लोकांची भलामण तो कधीही करत नाही. प्रामाणिकपणे कष्ट करून, नामस्मरण करीत भाजीभाकरी खाणाऱ्या भक्तांचे श्रम हलके करण्यासाठी तो सदैव त्यांच्या पाठीशी उभाच असतो.
– स्नेहा शिनखेडे