स्पॉटबॉईज, नाऊ नो एनी शूटिंग. प्लीज पॅकअप. हे वाक्य नेहमीच फिल्म सिटीमध्ये दिग्दर्शकाकडून बोललं जातं. काल हेच वाक्य पाकिस्तानचा कर्णधार आणि पाकिस्तानचे कोच यांनी संघाला उद्देशून जर ड्रेसिंग रूम ाध्ये बोलले असेल तर त्यात नवल नाही. आता खऱ्या अर्थाने पाकिस्तानवर बोजा बिस्तरा गुंडाळण्याची वेळ आलीय. पाकिस्तानात टीव्ही फोडले जात आहेत. टीव्हीवर चाकूने वार केले जात आहेत. पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमं, यूट्यूबर्स शिव्यांची अक्षरश: लाखोली वाहत आहेत. याला जबाबदार कोण? याचे उत्तर ना रिझवान कडे, ना त्यांच्या प्रशिक्षक आकिब जावेदकडे. मागील काही सामने बघून मला तर हाच प्रश्न पडला आहे की पाकिस्तान संघाला नेमकं झालंय तरी काय? ना त्यांच्याकडे कुठलाही अॅग्रेसिव्हपणा, ना त्यांच्या देहबोलीत सकारात्मकता.
पाकिस्तानचा खेळ आजकाल क्लब दर्जाचा झालाय. मी ज्यावेळी मुंबईत कामानिमित्त जातो त्यावेळी माझं पहिलं पाऊल शिवाजी पार्कला तर दुसरे पाऊल मरीन लाईन्स येथे असलेल्या पोलीस ग्राउंड मैदानावरती जाते. येथे बरेच आंतरक्लब क्रिकेट सामने होतात. पाकिस्तानी क्रिकेट संघापेक्षा येथील क्लब क्रिकेट कितीतरी चांगलं, असं दुर्दैवाने म्हणावे लागते. अशीच टुकार आणि सुमार दर्जाची कामगिरी भविष्यात चालू राहिल्यास आणि अशातच आयसीसीने पाकिस्तान क्रिकेटसाठी ‘नियम आणि अटी लागू’ असं म्हटलं तर नवल वाटून घेऊ नका. (तुम्ही यजमान होता म्हणून तुम्हाला या स्पर्धेत संधी मिळाली अन्यथा विंडीज, श्रीलंका, झिंबाब्वेसारखे हात चोळत बसला असता) एवढी खराब कामगिरी पाकिस्तान संघ करत आहे. न्यूझीलडकडून झालेल्या पहिल्या सामन्यातील मानहानिकारक पराभवातून पाक संघ काहीतरी धडा घेईल असं वाटलं होतं. परंतु पहिल्याच सामन्याची जवळपास री या सामन्यात त्यांनी ओढली. हा पराभव म्हणजे मागच्या पराभवाचा पार्ट 2 होता. मागच्या सामन्यात नाणेफेक जिंकत पहिल्यांदा क्षेत्ररक्षण, या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी एवढाच काय तो फरक. काल भारताने खऱ्या अर्थाने एक स्वप्नवत विजय मिळवला. ज्या विजयात विराट कोहलीचे शतक होतं. आणि ते शतक सजलं होतं ते कव्हर ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, पूल या क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ फटक्यांनी. एक काळ क्रिकेटमध्ये कव्हर ड्राईव्ह म्हटलं की इंग्लंडचा डावखुरा डेव्हिड गॉवर आठवायचा. ज्यांनी ज्यांनी त्यांचा कव्हर ड्राईव्ह मैदानातून बघितला त्या सर्व क्रिकेट रसिकांचे उपाशीपोटी पोट भरायचं, एवढं सौंदर्य त्यांच्या कव्हर ड्राईव्ह फटक्यात होतं. परंतु आजकाल भारतीय क्रिकेट संघाकडे या फटक्याचं पेटंट आहे का? असा प्रश्न पडतो. 80 च्या दशकात सुनील गावसकर. 90 ते 2010 पर्यंत सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड. त्यानंतर विराट कोहलीने या फटक्यावर घट्ट पकड बसवली. बघता बघता काही वर्षातच तो कव्हर ड्राईव्हचा बादशहा बनला. आजकाल त्याच्याच पावलावर पाऊल शुभमन गिल टाकताना दिसतोय. आज जर स्वर्गीय लतादीदी जिवंत असत्या आणि जर त्यांनी कोहलीची फलंदाजी बघितली असती तर क्रिकेटमधील फलंदाजीतील सा रे ग म मधील वरचा ‘सा’ अनुभवला असता. असो.
1990 च्या दशकात ज्यावेळी भारतीय संघ वारंवार पराभूत होत होता त्यावेळी भारताचे तत्कालीन प्रशिक्षक बिशनसिंग बेदी निराश होऊन म्हणाले होते की, भारतीय संघाला आता अरबी समुद्रात बुडवा. अर्थात हे धारिष्ट्या पाकिस्तानबाबत कोण दाखवणार? बिचारा इम्रान खान स्वत: तुऊंगात आहे. हा सामना जर तुऊंगातून त्यांनी टीव्हीवरून बघितला असेल तर ढसाढसा रडला असेल. शेवटी यशाचे वाटेकरी हे सर्वच असतात. अपयशाचे वाटेकरी कोण? हा प्रश्न पाकिस्तानचे कोच, ट्रेनिंग स्टाफ, निवड समिती आणि सरते शेवटी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांनी स्वत:ला विचारला पाहिजे. बऱ्याच वर्षानंतर आयसीसीने तुम्हाला एक चांगली संधी दिली होती. थोड्याफार प्रमाणात का होईना देशाच्या आर्थिक परिस्थितीत बदलाव करण्याची. परंतु ही सुवर्णसंधी पाकिस्तानने गमावली. शेवटी भारताने पुन्हा एकदा बाप, बाप ही होता है, हे सिद्ध केलं. काल सामना संपल्यानंतर पुन्हा एकदा गजाभाऊंचा फोन आला. ते म्हणाले, एक गाळलेली जागा भरायची आहे. ते म्हणाले सालाबादप्रमाणे यंदाही फुल्या फुल्या म्हणत ते थांबले. मी लगेच उत्तरलो यंदाही भारताकडून पाकिस्तानचा दाऊण पराभव. काल बऱ्याच जणांनी भारताच्या विजयासाठी देव पाण्यात ठेवले होते. मीही एक त्यातलाच होतो. अखेर देव पावलाच!









