कोल्हापूर / सुधाकर काशीद :
कोल्हापूर शहरात पोलीस ठाणे असले तरीही प्रत्येक पोलीस ठाण्यात रात्री गुन्हेगारांना ठेवण्याची पुरेशी सुविधा नसल्याने गुन्हेगारांचा रात्रीचा मुक्काम राजारामपुरी किंवा गांधीनगर या ठिकाणच्याच पोलीस कोठडीत ठरलेला आहे. आणि बहुतेक गुन्हेगारांचा पूर्व इतिहास व त्यांची मानसिकता पाहता रात्रीच्या वेळी या गुन्हेगारांना ठेवण्याची जबाबदारी व त्यांच्यावरचा बंदोबस्त म्हणजे अक्षरश: ‘डोळ्यात तेल घालून बंदोबस्त..’ या वाक्यप्रचाराचा क्षणाक्षणाला अनुभव पोलिसांना घ्यावा लागत आहे. कारण पोलीस कोठडीत ठेवलेल्या संशयित आरोपीला रात्रीत काही झाले तर ड्युटीवरचा पोलीस आणि तेथील अधिकारी सस्पेंड हा फॉर्म्युला ठरलेलाच असतो आणि त्यामुळे आरोपीपेक्षाही रात्रीच्या बंदोबस्तावरचा पोलीस रात्रभर चिंतेत असतो.
एखाद्या गुह्यात संशयिताला अटक केली जाते. त्याला पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडी न्यायालयाच्या आदेशानुसार दिली जाते. उदाहरणच द्यायचे झाले तर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एखादा गुन्हा घडला आणि आरोपी अटक झाला की त्याला न्यायालयासमोर उभे केले जाते. न्यायालय गुह्याचे स्वरूप पाहून त्या आरोपीला तीन दिवस, पाच दिवस असा पोलीस कोठडीत ठेवायचा आदेश देते, देते किंवा जामीनवर त्याची मुक्तता करते. या पोलीस कोठडीच्या कालावधीत पोलीस गुन्हेगाराकडून सर्व माहिती काढतात.
रात्रीच्या वेळी मात्र लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात न ठेवता राजारामपुरी किंवा गांधीनगर या पोलीस कोठडीतच त्याला ठेवतात. याला कारण म्हणजे त्या आरोपीची सुरक्षा महत्त्वाची असते. कारण पोलीस कोठडीत आरोपी असला की त्याच्याकडून माहिती काढण्यासाठी ‘पट्टा’ ठरलेलाच असतो. त्यानंतर त्याला रात्री मुक्कामासाठी राजारामपुरी किंवा गांधीनगर ठाण्यात आणले जाते. कारण तेथे अधिकाधिक आरोपींना रात्री ठेवण्याची सोय आहे. देखरेखीसाठी पोलीस बंदोबस्त सशस्त्र आहे.
पण या कोठडीत गुन्हेगाराला ठेवताना तेथील बंदोबस्त प्रमुख अक्षरश: आरोपीचे कपडे काढून त्याच्या अंगावर काही मारहाणीच्या खुणा आहेत का, हे पाहतो. कारण रात्री या मारहाणीमुळे आरोपीला काय झाले तर त्याची सारी जबाबदारी पोलीस कोठडीवर बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांच्यावरच येते, हा झाला एक भाग. पण आरोपीचीही मानसिकता थोडी विचित्र असते. काही आरोपी कोठडीच्या दरवाज्यावर डोके आपटून घेतात. काहीजण टोकदार छोट्या वस्तूने अंगावर जखमा करून घेतात. काहीजण कोठडीतले जेवण खाल्ल्यानंतर मुद्दाम उलट्या करतात. व ते आपल्याला काहीतरी होतंय, हे ओरडून–ओरडून सांगत असतात. अशावेळी बंदोबस्तावरच्या पोलिसांना खूप खबरदारी घ्यावी लागते. कारण आरोपीला कोठडीत काही झाले तर त्याची पूर्ण जबाबदारी बंदोबस्तावरच्या पोलिसांवरच येते. पहिल्यांदा सस्पेंडची ऑर्डर तर ठरलेलीच असते. आरोपीने तक्रार केली, गुन्हा दाखल झाला तर गुन्हेगार बाजूला आणि बंदोबस्तावरील पोलिसालाच चौकशीला तोंड द्यावे लागते. मानवाधिकार समितीच्या चौकशीला तोंड द्यावे लागते. या सर्व फेऱ्यात पोलिसांच्या वाट्याला नको इतक्या त्रासाची वेळ येते.
पोलीस कोठडीतल्या आरोपींना रात्रीच्या वेळी ठेवण्याची सोय गांधीनगर राजारामपुरी आणि मुरगुड येथेच आहे. तेथे सीसीटीव्ही आहेत. पण बंदोबस्तावरच्या पोलिसांना प्रत्येक आरोपीवर लक्ष ठेवावेच लागते. आजारी किंवा विचित्र मानसिकतेच्या आरोपीवर विशेष लक्ष ठेवावे लागते.
अनेक वेळा गुन्हेगार डाराडूर झोपलेला असतो आणि पोलीस मात्र कधी सकाळ होईल, कधी बंदोबस्तावरची ड्युटी संपेल, या काळजीत रात्रभर असतो. कारण गुन्हेगारांची मानसिकता कोणत्या क्षणी काय होईल आणि कशी होईल, याचा अंदाज कोणालाच येत नाही. विशेषत: गाजलेल्या किंवा राज्यभर चर्चेचा विषय झालेला गुन्हेगारांच्या बाबतीत अतिशय काटेकोरपणे बंदोबस्त करावा लागत आहे.








