खेड :
मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यावर पक्षाने केलेल्या बडतर्फीच्या कारवाईनंतर ‘राज’कारण पुरते ढवळून निघाले आहे. वैभव खेडेकर समर्थक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सदस्यत्व राजीनामा अस्त्रही उगारले आहे. ‘आपला सेनापती जिकडं, आपण पण तिकडंच..!’ अशा भावनाही मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त करत वैभव खेडेकरांची साथ न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ‘सुरूवात एका नव्या राजकीय अध्यायाची, जनतेच्या हिताची ही पोस्टही लक्ष वेधून घेत असून याद्वारे भाजप पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटत असल्याच्या समजातून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार वैभव खेडेकर यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत बडतर्फीची कारवाई करण्यात आली. या बडतर्फीनंतर लगोलगच खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत अतीव दुःख झाल्याची भावना व्यक्त करताना राजसाहेब आपण फार घाई केली, २० वर्षे पक्षासाठी जीवाचे रान केले, तरीही बडतर्फीने ‘निष्ठे’चे प्रमाणपत्रच दिले, अशी भावना व्यक्त करताना ते भावुक ही झाले. बडतर्फीचे पत्र अपेक्षितच नव्हतं. पण या पत्राने कौटुंबिक संबंधांसह इंजिनलाही ‘ब्रेक’ लागला. मात्र आता पुढील निर्णय घ्यावाच लागेल, असे स्पष्ट करताना भाजप पक्षप्रवेशावर खेडेकर यांनी शिक्कामोर्तब केले.
‘वैभव साहेब जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी अंतिम असेल’ असेही समर्थकांचे म्हणणे आहे. लवकरच..! सुरूवात एका नव्या राजकीय अध्यायाची, जनतेच्या हिताची, ही पोस्टही चर्चेचा विषय बनली आहे.
- ‘राज’कीय समीकरणे बदलणार
वैभव खेडेकर व त्यांचे समर्थक ४ सप्टेंबर रोजी भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यांच्यासमवेत कोण कोण प्रवेश करतात, याची उत्सुकताही शिगेला पोहचली आहे. वैभव खेडेकर यांच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर ‘राज’कीय समीकरणे देखील पुरती बदलणार आहेत.
- खेड मनसे तालुकाध्यक्षांचा राजीनामा
वैभव खेडेकर यांच्या बडतर्फीनंतर पदाधिकाऱ्यांकडून एकामागोमाग एक पदाचे राजीनामे दिले जात आहेत. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष चेतन धामणकर यांच्यासह अंगीकृत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच राजीनामे दिले आहेत. मनसेचे तालुकाध्यक्ष नीलेश बामणे यांनीही पदाचा राजीनामा देत पक्षाची साथ सोडत वैभव खेडेकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठवडाभरातच नेमके ‘राजकीय चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.








