अध्याय सत्रावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, उत्तम स्वभावाची दहा लक्षणे असतात. त्याचे वर्णन मी तुला सांगतो. मन आदिकरून ज्ञानेंद्रियांचा कल बाह्य गोष्टींनी भुलून जाण्याकडेच असतो. त्यांना विवेकाने आवरून आत्मस्वरूपात स्थिर करावे लागते. वैराग्याच्या सामर्थ्याने आणि गुरुवचनाच्या विश्वासाने आत्मस्वरूपात ऐक्मय होईपर्यंत आंतरवृत्तीत स्थिर असावे लागते. गुरुवचन हेच मुख्य धरून त्यातच बुद्धीला निमग्न करून सोडणे आणि मनालाही तल्लीन करणे ह्याचेच नांव ‘शम’ हे लक्षात ठेव. आता दमाचे निरूपण ऐक. विषयप्रकृती बलवत्तर असते आणि कर्मेंद्रियांचे बंड दांडगे असते म्हणून वेदविधीच्या द्वारे देहाच्या निर्वाहापुरते इंद्रियांना जेवणखाण द्यावयाचे, हा ‘दमगुण’ होय. त्यात ‘शम’ हा मुख्य राजा आहे व ‘दम’ वगैरे त्याच्या प्रजा आहेत असे समजावे. आता तिसरा जो ‘तपोनियम’ तोही ऐक. शमाने ज्ञानेंद्रियांना शांती आणि दमाने कर्मेद्रियांना शांती प्राप्त होते. व्रतादिकांच्या योगाने शरीरशोषण करणे ह्याचे नाव ‘तप’ पण ते प्रारब्धानुरूप घडत असते. वस्तुतः हृदयामध्ये श्रीहरीचे सत्स्वरूप चिंतन करणे हेच सर्व तपामध्ये श्रे÷ तप होय. ज्याचे ‘मन’ सदासर्वदा आत्मस्वरूपाचाच विचार करीत राहते त्यालाच ‘तपोनि÷’ म्हणतात. आता शौचाचा म्हणजे पवित्रतेचा विचार ऐक. त्यामध्ये दोन प्रकार आहेत. शरीरावर बाह्य मळ असतात, त्यांचे क्षालन मृत्तिका व जल इत्यादिकांनी करावे आणि आत्मज्ञाननि÷sने अंतःकरणांतील मल धुऊन काढावेत. उद्धवा ! ह्याप्रमाणे अंतर्बाह्य निर्मलपणा मिळवणे हेच शौचाचे मुख्य लक्षण होय. आता संतोषाचेही संपूर्ण लक्षण सांगतो. ज्या सुखाची प्राप्ती होताच दुःखे निखालस मावळून जातात, तेच खरे व शाश्वत सुख होय. माझ्या भक्तीने अंतःकरणात स्वाभाविक सुख प्राप्त होते आणि त्यामुळे संपत्ती किंवा विपत्ती आली तरी सर्वत्र समभाव होत असल्याने संतोषच उत्पन्न करते. आता शांतीचे निरूपण ऐक. माझा निजबोध हृदयात ठसला म्हणजे अंतःकरणांतील कामक्रोध नाहीसे होतात. कोणी अपराध केला तरी त्याचे त्यांना काही विरुद्ध असे वाटतच नाही.
उलट आश्चर्य हे की, तो अपकाऱयाला उपकारी होतो. त्याच्या अंतःकरणात विकार म्हणून उत्पन्नच होत नाही, तीच खरी ‘शांती’ होय. अशा प्रकारची सदासर्वकाल परिपूर्ण शांती असणे हे ब्राह्मणाचे सहावे लक्षण होय. आता आर्जवाचे लक्षण ऐक. त्यात अगदी अंतःकरणातील खूणच सांगतो. आई जरी कुरूप असली, तरी तिच्या ममतेत काही कुरूपता नसते किंवा सोन्याचा नाग केला, तर सोने काही कधी साप होत नाही. त्याप्रमाणे कुटिलाशी कुटिलपणानेच वागले पाहिजे, असे शिकवू लागले तरीसुद्धा ज्याच्या मनामध्ये कुटिलपणा येत नाही, तेच खरोखर ‘आर्जव’ म्हणजे ऋजुता (सरळपणा) होय. गाईला तेवढे गोड व्हावे आणि वाघाला कडू व्हावे असा भेद गंगोदकात नाही. त्याप्रमाणेच आर्जवाची गोष्ट आहे. ते ऐक्मयभावनेने कुटिलापाशीही गोडच होऊन राहते. ह्याचे नाव आर्जव आणि हेच ब्राह्मणाचे सातवें अद्भुत लक्षण होय. अरण्य, उद्यान आणि गंगेचे उदक ह्या सर्वांना पृथ्वीच जशी आधारभूत आहे, त्याप्रमाणे उद्धवा ! साऱया लक्षणांचे उत्पत्तीस्थान माझी भक्तीच आहे असे समज. सारी पिके उत्पन्न व्हावयाला आधारभूत जशी पृथ्वी, त्याप्रमाणे इतर सर्व लक्षणांची उत्पत्ती भक्तीमधूनच होते.
विषयाचा स्वार्थ सोडून देऊन जो जिवाभावापासून मजवर भाव ठेवतो, तोच माझा भक्त होय. भक्त म्हणावयाचे आणि धनार्जन करावयाचे, हेच भक्तीला मुख्य विघ्न आहे. उद्धवा ! धनलोभी म्हटला की तो निखालस अभक्त म्हणून समजावा. अंतःकरणात माझी भक्ती नाही आणि जो दांभिकतेने माझी भक्ती करितो तो आंधळय़ा गरुडपक्ष्याप्रमाणे आकाशात भरारी मारतो पण बसण्याचे ठिकाण त्याला समजत नाही. जेथे माझी भक्ती असते तेथे मी जाती किंवा कुळ पहात नाही. मी माझ्या भक्तांना भक्तीनेच त्वरित वश होतो.








