सभागृह अस्तित्वात नसल्याने सर्व अधिकार अधिकाऱ्यांना : निधी खर्चाचा तपशीलच नसल्याने नाराजी
बेळगाव : तालुका पंचायतला समांतर फंड, स्टॅम्पड्युटी व इतर फंड राज्य सरकारकडून देण्यात येतो. मात्र मागील दीड-दोन वर्षांपासून सभागृहच अस्तित्वात नसल्याने आलेला फंड गेला कुठे? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून विचारला जात आहे. राज्य सरकारकडून आलेला फंड हा अधिकाऱ्यांनीच खर्च केला आहे की, यामध्ये काही गैरप्रकार झाला आहे? याबाबत अधिकाऱ्यांनीही कोठेच वाच्यता केली नाही. दरम्यान मागील पाच वर्षांमध्ये तालुका पंचायतच्या कार्यालयाचा दोन वेळा विकास करण्यात आला आहे. यापूर्वीचे तत्कालीन तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी निडोणी यांनीही कार्यालयासाठी 19 लाख रुपये खर्चून विविध कामे केली होती. तर आताही तालुका पंचायत कार्यालयाला तब्बल 29 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत याला जवळपास 50 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र समस्या अजूनही तशाच आहेत. त्यामुळे नेमका निधी गेला कोठे? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
ता. पं. मधील कारभाराकडे गांभीर्याने पहा
जर आणखीन काही रक्कम खर्च करण्यात आली असती तर नवीन इमारत उभी राहिली असती. मात्र सरकारी काम आणि बारा महिने थांब, अशीच अवस्था झाली. तालुका पंचायतच्या कारभाराला आता तर चाप बसविण्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे तालुका पंचायतमधील कारभार सध्या अलबेल सुरू आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. बेळगाव तालुका पंचायतमध्ये आलेला निधी नेमका कोठे खर्च करण्यात आला? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
माहिती देण्यास टाळाटाळ
समांतर फंड म्हणून दरवर्षी राज्य सरकारकडून ता. पं. ला 1 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात येतो. स्टॅम्पड्युटी म्हणून 70 ते 80 लाख रुपये निधी देण्यात येतो. मात्र यावेळी स्टॅम्पड्युटी केवळ 35 लाख आला. तर 15 वित्त आयोगातून 2 कोटी 50 लाख रुपये आले आहेत. मागील दोन वर्षांपासून सरकारकडून हा निधी आला असला तर तो कोठे खर्च करण्यात आला? असा सवाल आता उपस्थित होत आहे. दरम्यान सध्या तरी सभागृह अस्तित्वात नसल्याने हा निधी खर्च करण्याचा अधिकार ता. पं. कार्यकारी अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे यातील अधिक तर निधी खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी निधी खर्च करण्यात आला तर याची माहिती देण्यासही टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे नेमका निधी गेला कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे.
चौकशीची मागणी
तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील विकासकामे राबविण्यावर निधी खर्च केला पाहिजे. मात्र यातील काही निधी तालुका पंचायत कार्यालयातील डागडुजी करण्यात खर्च करण्यात आला. मात्र अजूनही काही काम निकृष्ट दर्जाचे झाले असून यामध्ये काही गैरप्रकार झाला आहे का? याचा विचार करण्याची गरज आहे. दरम्यान उर्वरित निधी एक तर राखीव ठेवला पाहिजे. मात्र त्यामधीलही काही निधी खर्च झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे याबाबत आता चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
तालुका पंचायतीचे काम स्टॅम्पड्युटी निधीतून
बेळगाव तालुका पंचायतीचे काम स्टॅम्पड्युटी निधीतून करण्यात आले आहे. याला जवळपास 30 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर 15 व्या वित्त आयोगातून 2 कोटी 50 लाख रुपये निधी आला आहे. मात्र त्याचा आराखडा अजून तयार करण्यात आला नाही. लवकरच आराखडा तयार करून कामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
– ता. पं. कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर









