देशात महिलांवर होत असलेल्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. एका बाजूने आंतरराष्ट्रीय पातळीवर देश आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या दिमाखात पुढे जात आहे व दुसऱ्या बाजूने आपली सामाजिक स्थिती पार बिघडत जाते आहे आणि त्यातून प्रश्न उभा राहतो आहे. देश नेमका कुठे चालला आहे? ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता: यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला क्रिया:’. ‘मनुस्मृति’ हा अत्यंत प्राचीन ग्रंथ. त्यातील विचार आजच्या युगात खटकणारे वाटतात परंतु स्त्रियांच्या बाबतीत यत्र नार्यस्तु, या श्लोकात म्हटलेले आहे, जिथे महिलांचा आदर होतो, तिथेच देवता वास्तव्य करीत असतात. जिथे आदर होत नाही, तिथे सर्व काही व्यर्थ आहे. देशातील विविध भागांमध्ये महिलांवर अत्याचार होत असलेल्या बातम्या व त्याची दृश्ये सध्या सोशल मीडियावरून प्रसारित होत आहेत. मणिपूर येथे गेले दोन महिने ज्या प्रकारे हिंसाचार होत आहे, तो या देशासाठी कलंक आहे. देशातील सामाजिक स्वास्थ्य बिघडवून टाकण्यासाठी जातियवादी शक्तींनी क्रूर अशा पद्धतीचे वर्तन केलेले आहे. आतापर्यंत 150हून अधिक माणसे मणिपूरमध्ये मरण पावली. तिथे ज्या गंभीर घटना घडल्या, त्यातील महिलांचा क्रूर छळ, नग्न अवस्थेतील धिंड, एका महिलेला रस्त्यावर हात बांधून ठेवून लाथा-बुक्क्यांनी दिलेला मार व नंतर सर्वांसमक्ष गोळी घालून ठार करणे वगैरे वगैरे जे व्हिडीओ प्रसारित झाले, त्यातून हे असले क्रूर कृत्य करणारी माणसे या देशातच जन्माला आलेली आहेत का? असा प्रश्न पडतो. महिलांवरील होणारे अत्याचार, त्यांच्या तोंडून निघणारी आर्त किंकाळी व त्यांचे रडणे, हे सर्व पाहिल्यानंतर तळपायाची आग मस्तकाला भिडल्याशिवाय राहणार नाही. यातील क्रूरकर्म्यांना सार्वजनिक फाशी दिल्याशिवाय समाजात सुधारणा होणार नाही. मंगळवारी महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दौऱ्यावर असताना दुसऱ्या बाजूने संभाजीनगरात एका युवतीला तिचा प्रियकर बेदम मारीत असल्याचा व ती जोरजोरात रडते आहे, अशा पद्धतीचा व्हिडीओ प्रसारित होत होता. दोन आठवड्यांपूर्वी पं. बंगालमध्ये एका महिलेची विवस्त्र धिंड काढण्यात आली. मध्य प्रदेशात महिलांवर वाढत चाललेले अत्याचार, राजस्थानमध्ये तर महिलांवर होत असलेल्या अत्याचारांनी सीमा पार केलेली आहे. महिलांना विविध भूमिका बजावयाच्या असतात. ती एक मुलगी असते, बहीण, पत्नी, मैत्रीण, मावशी, आई, आजी बनते. विविध भूमिकांतून ती संचार करीत असते. एक स्त्री, संपूर्ण घराचा डोलारा सांभाळते. नवऱ्याची सेवा, मुलांची सेवा, घरची सर्व कामे करण्यात तिचा दिवस जातो. स्वत:साठी ती काय करते? या समाजात महिला या फार त्यागी असतात. म्हणूनच म्हटलेले आहे, जिथे स्त्रिया सुखी असतात, देवता तिथे नांदत असतात. ज्या ठिकाणी स्त्रिया दु:खी असतील, तिथे कोणीही नांदू शकत नाही. आपल्या देशाला फार मोठी परंपरा व संस्कृती आहे. आईला ‘मातृ देवो भव’ असे म्हटलेले आहे. संपूर्ण जगाला मार्गदर्शन करता येण्याजोगे संस्कार आपल्याकडे आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा सुविचार या देशातील संत महात्म्यांनी जगाला दिला. ‘ओम शांती’ मंत्र जगाला भारताने दिला. संपूर्ण जगाला तत्त्वज्ञान सांगण्याची ताकद व क्षमता भारतीय संस्कृती व परंपरेत आहे. जिथे महिलांना, स्त्रियांना देवता मानलेले आहे, त्या देशात सध्या महिलांचा होत असलेला अनन्वित छळ, हे काय दर्शविते आहे? आपल्या देशाचे नाक कापले जात आहे. राजकीय पातळीवर अनेक पक्ष या घटनांचे भांडवल करून आपली पोळी भाजून घेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मणिपूर प्रकरणी मणिपूर राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे कान उपटलेले आहेत. न्यायालये देखील अलीकडे सरकारवर जणू काही काठी हाणण्यासाठीच बसलेली असावीत परंतु मुद्दा आहे, तो अशा घटना घडतातच कशा? घटना घडल्यानंतर पोलिसांना फार उशीरा माहिती मिळते. म्हणजे ठराविक व्यक्ती हे असले हीन प्रकार करतात आणि इतर मंडळी त्याकडे डोळेझाक करून बसतात. यातून समाज किती निर्ढावलेला आहे, याची प्रचिती येते. मणिपूर प्रकरणाने देशाची आतापर्यंतची सर्वांत मोठी बदनामी झालेली आहे. महिलांवरील अत्याचाराची परिसीमा मणिपूर घटनांनी गाठली. हे सर्व प्रकार अत्यंत दुर्दैवी तर आहेच परंतु घटनेस जबाबदार असणाऱ्या मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असू द्या, कठोरातील कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. महिलांची विवस्त्र अवस्थेत धिंड काढणाऱ्या या नागरिकांच्या मनात बिचाऱ्या महिलांची काय अवस्था झाली असेल, याचा विचार कसा आला नाही? महिलांना बेदम मारहाण करणाऱ्यांच्या मनात थोडी देखील माया, ममता का राहिली नाही? का समाज एवढा कठोर बनतो आहे? मणिपूर प्रकरणाने संपूर्ण जगात भारताची जी बदनामी होते आहे, त्यातून देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो आहे. आपला देश प्रत्येक सजीवांमध्ये देव पाहतो आहे. 33 कोटी देवतांचा संचार हा झाडापेडांत, प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये आपण पाहतो. आपल्यावर जे वैदिक संस्कार झालेले आहेत, ते जगात इतर कोणत्याही देशात होऊ शकत नाहीत. महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस देशात होत असलेली वाढ अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे. आज महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावूनच नव्हे तर त्या एक पाऊल पुढे टाकून गेलेल्या आहेत. अशा परिस्थितीत महिलांचे कार्य व त्यांचे महत्त्व लक्षात घेऊन समाजाने त्यांना फार मोठा मान देणे चालूच ठेवले पाहिजे. देशात सध्या ज्या पद्धतीने महिलांचा अनन्वित छळ होतो आहे, ते पाहता आपले सामाजिक स्वास्थ्य पूर्णत: बिघडलेले दिसते आहे. ‘विचार संपले की, विकार सुरू होतात’ त्यानुसार वाटते, हे विकार गंभीर परिस्थिती निर्माण करून ठेवील. मुळात विविध सोशल माध्यमांतून महिलांची होणारी बदनामी, महिलांवर होत असलेल्या टीकेवर निर्बंध लागू करण्यापासूनची सुरुवात केली पाहिजे. अशा प्रकारांना वेळीच वेसण घालणे जरुरीचे असून याकरीता राज्यस्तरावर उपाय योजले जायला हवेत.
समाज बदलतो आहे, हे ठीक आहे. काळानुरुप त्याने बदलले पाहिजे परंतु बदलले पाहिजे, याचा अर्थ त्याचे बिघडले पाहिजे, असा थोडाच आहे! महिलांबद्दलचा आदर कमी होणे, ही एक विकृती आहे. एका महिलेकडे पाहताना ती एक माता आहे, या अनुषंगाने पाहणे आवश्यक असते व ज्या व्यक्तीला आपल्या आईबद्दल आदर नसेल तर ती व्यक्ती समाजात काही चांगले करून दाखविणार नाही. अलीकडच्या दोन-तीन महिन्यात दररोज महिलांवरील अत्याचार, महिलांच्या किंकाळ्या, महिलांची धिंड, बलात्कार करून खून, सामूहिक बलात्कार, सर्वांसमक्ष बेदम मारणे आणि महिलांचे रुदन, त्यांच्या किंकाळ्या हे सारे देशाला प्रगतीकडे नव्हे तर अधोगतीकडे नेत आहे. देश पुढे नेण्यास आपले नेते समर्थ जरी असले तरी समाजात होणारे बदल, बिघडत जात असलेली नवी पिढी, त्यांच्यासमोर कोणताही आदर्श राहात नाही. यातून आपल्या देशासमोर अंतर्गत फार मोठे आव्हान उभे राहात आहे. संस्कारक्षम शिक्षण व मार्गदर्शनाची गरज निर्माण झालेली आहे. मणिपूरमध्ये जे झाले ते देशातच नव्हे जगात कुठे होऊ नये. महिलांचा होत असलेला छळ देशाला घातक ठरणारा आहे.








