शोधमोहीम थंडावली; भीती कायम : प्राण्याविषयी तर्क-वितर्क
बेळगाव : अनगोळ परिसरात बिबट्यासदृश प्राण्याच्या पायांचे ठसे आढळून आले होते. मात्र संबंधित प्राण्याचा शोध घेण्यात वनखात्याला अपयश आले आहे. दरम्यान शोधमोहीम थंडावली आहे. अखेर हा बिबट्यासदृश प्राणी गेला कोठे? याबाबत आता नागरिकांमधून तर्क-वितर्क लावले जात आहेत. वनखात्याने निष्काळजीपणे न राहता पुन्हा मोहीम तीव्र करून परिसराची पाहणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे. अनगोळ येथील एसकेई सोसायटीच्या प्लॅटीनम मैदानात सलग चार दिवस बिबट्यासदृश प्राण्याच्या पायाचे ठसे उमटले होते. त्यामुळे वनखात्याने तातडीने दाखल होऊन शोधमोहीम हाती घेतली होती. दरम्यान ड्रोनच्या साहाय्याने पाहणी केली. मात्र त्यावेळी या प्राण्याविषयी कोणताचा पुरावा हाती लागला नाही. त्यामुळे वनखात्याला निराशेने माघारी परतावे लागले. मात्र हा प्राणी पुन्हा आढळून आल्यास गोंधळ उडणार आहे. सद्यस्थितीत वनखात्याने मोहीम थांबविली आहे. मात्र नागरिकांतून उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.
वनखात्याने म्हणावी तशी मोहीम राबविली नाही. केवळ औपचारिकता म्हणून परिसरात पाहणी केली. मात्र पुन्हा याठिकाणी बिबट्यासदृश प्राणी आढळून आल्यास किंवा एखाद्यावर हल्ला झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. गतवर्षी बिबट्याने रेसकोर्स परिसरात तब्बल महिनाभर तळ ठोकला होता. त्यामुळे शहरवासीय आणि वनखात्याचीदेखील झोप उडाली होती. पुन्हा शहरात बिबट्यासदृश प्राण्याच्या पायांचे ठसे दिसल्याने जनता धास्तावली आहे. अनगोळ येथील बिबट्यासदृश प्राण्याच्या शोधमोहिमेत वनखात्याला संबंधित प्राण्याची विष्टा किंवा इतर कोणताच पुरावा हाती लागला नाही. त्यामुळे वनखात्याने शोधमोहिमेत ढिलाई केली आहे. मात्र पायांचे ठसे दिसून आलेला वन्यप्राणी अखेर गेला कोठे? हा प्रश्न निर्माण झाला आहे.









